'सेक्स, डावपेच आणि सत्तेचा खेळ', होमरच्या 'ओडिसी'ची कथा घडवण्यात महिलांची भूमिका किती महत्त्वाची?

    • Author, डेझी डन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यांचा ' द ओडिसी' हा चित्रपट रिलीज होत आहे. होमर नावाच्या महाकवीने लिहिलेल्या ओडिसी या महाकाव्यावर हा चित्रपट आधारित आहे.

साधारण 2800 वर्षांपूर्वी लिहिलेल्या महाकाव्यावर आता चित्रपट बनत आहे. परंतु, ही केवळ एका शूर योद्ध्याची कथा नाही.

या कथेचा नायक ओडिसियस असला, तरी त्याच्या प्रवासात भेटणाऱ्या महिला, अप्सरा, जादूगार स्त्रिया आणि देवता यांच्या युक्त्या, डावपेच आणि मोहपाशामुळेच ही कथा पुढे सरकते. त्यामुळे ओडिसियस हा केवळ पराक्रमी नायक न वाटता, तो एक सामान्य माणसासारखाच वाटू लागतो.

'द ओडिसी' हे प्राचीन महाकाव्य ट्रोजन युद्धानंतर आपल्या इथाका या राज्यात परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रीक योद्धा ओडिसियसची कथा सांगते.

सुमारे 10 वर्षे चाललेल्या या प्रवासात त्याला अनेक संकटांचा आणि धोक्यांचा सामना करावा लागतो. ही कथा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यांनी आता चित्रपटाच्या रूपात साकारली असून, त्यात मॅट डेमनसह अनेक दिग्गज कलाकार भूमिका साकारत आहेत.

याचा मुख्य नायक पुरुष असला, तरी द ओडिसीच्या कथेत महिलांचे वर्चस्व दिसून येते. आपल्या राज्यात परतण्याच्या ओडिसियसच्या प्रवासात त्याला भेटणाऱ्या महिला, अप्सरा आणि देवता यांच्या युक्त्या, आकर्षण आणि निर्णयांमुळे प्रत्येक टप्प्यावर कथेची दिशा बदलत जाते.

त्यामुळे ओडिसी ही केवळ शौर्याची कथा नाही, तर कामवासना, डावपेच आणि सत्तेसाठीचा संघर्ष अशी कथा आहे, जी आजही तितकीच प्रभावी आणि समर्पक वाटते.

ओडिसी हे महाकाव्य सुरुवातीपासून नाही, तर थेट मध्यातून सुरू होते. ओडिसियस 7 वर्षांपासून कॅलिप्सो अप्सरेसोबत ओगिजिया बेटावर अडकलेला असतो आणि समुद्रकिनारी बसून आपल्या राज्यात परतण्याची आस धरत रडत असतो.

ट्रोजन युद्धात पराक्रम गाजवणारा हा योद्धा इथे मात्र पूर्णपणे असहाय वाटतो. इतकंच नव्हे, तर त्याची त्या बेटावरून मुक्तता करण्यासाठी देवतांनाही एकत्र येऊन निर्णय घ्यावा लागतो.

परंतु, ओडिसियस केवळ कॅलिप्सोमुळेच अडकलेला नसतो, तर तो स्वतःच्या मनाशीही संघर्ष करत असतो. आजच्या काळात पाहिलं, तर ट्रोजन युद्धातील अनुभवांमुळे त्याला मानसिक धक्का (पीटीएसडी) बसला असावा, असं आजच्या वाचकालाही वाटू शकतं.

त्यामुळे त्याला घरी परतण्याचा निर्णय घेणं कठीण जातं. तरीही कॅलिप्सोचा त्याच्यावर असलेला प्रभावही तितकाच मोठा असतो.

ओडिसियस स्वतः कॅलिप्सोला सांगतो की, त्याची पत्नी पेनेलोप सुंदर असली तरी ती एक सामान्य मानवी स्त्री आहे, त्यामुळे तिच्या सौंदर्याची तुलना कॅलिप्सोशी होऊ शकत नाही.

ओडिसियसच्या दीर्घ अनुपस्थितीतही त्याची पत्नी पेनेलोप मात्र निष्क्रिय राहिली नाही. तिच्याशी लग्न करून इथाकाचा राजा बनण्याची इच्छा (सुटर्स) असलेले 108 जण राजवाड्यात येतात. परंतु, पेनेलोप आपल्या शौर्याने आणि चातुर्याने त्यांना टाळत राहते.

ती आपले सासरे लेअर्टिस यांच्यासाठी दिवसा अंत्यसंस्काराचे वस्त्र विणते, पण रात्री तेच वस्त्र पुन्हा उसवून टाकते. त्यामुळे तिचं काम कधीच पूर्ण होत नाही आणि लग्नाचा निर्णयही पुढे ढकलला जातो.

या महाकाव्यातील हा सर्वात संस्मरणीय प्रसंग मानला जातो. पेनेलोपने या इच्छुकांना किती काळ रोखून धरलं, यावरच ओडिसियसला पुन्हा आपल्या राज्याचा राजा होता येईल की नाही, हे अवलंबून असतं.

ओडिसियसला मदत करणाऱ्या देवतांमध्ये सर्वात महत्त्वाची देवता म्हणजे अथेना. ट्रोजन युद्धातही तिने त्याला मदत केली होती आणि त्याला सुरक्षितपणे इथाकाला परत आणण्यासाठी पुढाकारही घेतला.

नंतर ओडिसियस फेशियन्स लोकांच्या भूमीवर अत्यंत असहाय्य आणि अशक्त अवस्थेत पोहोचतो. तेव्हा अथेना आपल्या युक्तीने त्याची सुटका घडवून आणते. ती त्याचा कमकुवतपणा लपवते आणि त्याचं रूप अधिक तेजस्वी, आकर्षक व प्रभावी दिसेल असं करते.

त्यामुळे सागरीप्रवास करणाऱ्या फेशियन्सचे मन जिंकण्यास मदत होते. फेशियन्स लोक त्याचं आदरातिथ्य करतात, त्याला आश्रय आणि संपत्ती देतात, तसेच सुरक्षितपणे इथाकाला परत जाण्याची व्यवस्थाही करतात.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अथेना जेव्हा जेव्हा ओडिसियस आणि त्याचा मुलगा टेलेमॅकस यांच्यासमोर येते, तेव्हा ती अनेकदा पुरुषाच्या रूपात येते. कधी ती इथाकाचा मित्र असलेल्या मेंटसच्या रूपात दिसते, तर कधी फेशियन्स लोकांच्या पुरुष दूताचं रूप घेते.

अथेनाला हे चांगलंच माहीत असतं की, पृथ्वीवर सत्ता पुरुषांच्या जरी हातात असली, तरी घटनांना कलाटणी किंवा वळण देण्याचं काम महिला आपल्या चातुर्याने, युक्तीने आणि डावपेचांनी करतात.

ओडिसियसला प्रवासात भेटलेल्या पात्रांकडे पाहिलं, तरी हे स्पष्ट होतं. फेशियन्स लोकांच्या प्रदेशात पोहोचल्यानंतर तो आपल्या प्रवासातील अनुभव कथन करतो. कमळ खाणाऱ्या लोकांपासून (लोटस इटर्स) ते एकाक्ष राक्षसांपर्यंत (सायक्लॉप्स) अनेक विलक्षण भेटींची तो कहाणी सांगतो.

या प्रवासात त्याला भेटलेल्या पौराणिक महिला पात्रांच्या कथा मात्र अधिक अस्वस्थ करणाऱ्या आणि थरारक वाटतात. कारण त्या वरकरणी निरुपद्रवी आणि शांत दिसतात.

निरागस चेहऱ्यामागचं रहस्य

ओडिसियसचं जे लोक स्वागत करतात त्यांना तो सहजपणे सांगतो की, पश्चिमेकडील समुद्रातील एका धोकादायक आणि निर्जन खडकाळ बेटावर राहणाऱ्या सायरेन्सचं (ललना) गाणं ऐकण्यासाठी तो खूप उत्सुक होता.

पुढच्या काळातील ग्रीक कथा आणि कलांमध्ये सायरेन्सना पक्ष्यासारख्या स्त्रिया किंवा जलपरींच्या (मर्मेड) रूपात दाखवलं गेलं. परंतु, ओडिसियस त्यांच्या रूपापेक्षा त्यांच्या सुमधुर गाण्याचं वर्णन करतो. कारण त्या गाण्यात पुरुषांवर भुरळ पाडून मृत्यूच्या दिशेने खेचून नेण्याची ताकद असते.

सायरेन्सच्या समोरच्या माळरानावर भूतकाळात त्यांच्या गाण्याच्या मोहात पडून प्राण गमावलेल्या अनेक पुरुषांची हाडं विखुरलेली असतात. तरीही ओडिसियस हे गाणं ऐकण्याचा धोका पत्करतो.

तो आपल्या सहकाऱ्यांना स्वतःला जहाजाच्या खांबाला घट्ट बांधून ठेवायला सांगतो, जेणेकरून गाण्याच्या मोहात पडून तो उडी मारू शकणार नाही. सायरेन्सचा आवाज जितका मधुर असतो, तितकाच तो जीवघेणा असतो.

सर्सी हीदेखील एक सुंदर, पण धोकादायक स्त्री होती. तिला पहिल्यांदा पाहिल्यावर ती निरुपद्रवी वाटायची. पण सायरेन्सप्रमाणेच तिच्या मोहक रूपामागे जादुई शक्ती लपलेल्या होत्या.

महाकवी होमरने तिला एक जादूगार स्त्री म्हणून दाखवलं आहे. औषधी वनस्पती आणि जादुई पेयांच्या साहाय्याने ती ओडिसियसच्या सहकाऱ्यांचं रूपांतर डुकरांमध्ये करू शकत होती.

ओडिसियसला प्रवासात भेटलेल्या इतर अनेक गूढ पात्रांप्रमाणे सर्सी ही केवळ अडचणी निर्माण करत नाही, तर त्याला मदतही करते. ती ओडिसियसची प्रेयसी बनते आणि त्याला पाताळलोकात म्हणजेच मृत्यूलोकात (अंडरवर्ल्ड) जाण्याचा मार्गही दाखवते.

तिथे ओडिसियसची भेट टायरेसियस या भविष्यवेत्ताशी होते. इथाकाला सुरक्षितपणे परतण्यासाठी टायरेसियस त्याला महत्त्वाचा सल्ला देतो.

या कथेचा महत्त्वाचा संदेश असा आहे की, राक्षसी स्त्रिया किंवा मोहक अप्सरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्याशी समजूतदारपणे वागणं गरजेचं असतं. ओडिसियसला काही वेळा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांच्या प्रभावाचा स्वीकार करावा लागतो, पण त्यात पूर्णपणे वाहून जाता कामा नये.

प्रवासात भेटणारी प्रत्येक व्यक्ती किंवा पात्र त्याच्या संयमाची, निर्णयक्षमतेची आणि मर्यादा पाळण्याच्या त्याच्या क्षमतेची परीक्षा घेतात. प्राचीन ग्रीक संस्कृतीत या संयमाला आणि संतुलित वागण्याला जास्त महत्त्व दिलं जात होतं.

काही वाचकांना ओडिसियसने सांगितलेल्या साहसकथा काल्पनिक वाटतात. फेशियन्स लोकांनी आपल्याला मायदेशी म्हणजेच इथाकाला पोहोचवावं, यासाठी त्याने या गोष्टी रंगवून सांगितल्या असाव्यात, असंही त्यांना वाटतं.

अशा दृष्टिकोनातून पाहिलं, तर कदाचित ओडिसियसचा खरा संघर्ष राक्षसांशी नव्हता, तर त्याच्या स्वतःच्या मनातील दुर्गुणांशी किंवा विकारांशी होता. हे अंतर्गत संघर्ष बाहेरच्या संकटांपेक्षा अधिक घातक आणि कठीण ठरतात.

ओडिसियसच्या कथा इतक्या रंगतदार, कल्पनारम्य आणि थरारक आहेत की, त्या कितपत खऱ्या आहेत, असा प्रश्न वाचकांना पडतो. पण हाच या महाकाव्याचा मोठा आकर्षणबिंदूही आहे.

यामुळेच ओडिसियस इतर नायकांपेक्षा वेगळा ठरतो. लेखिका एमिली विल्सन यांनी ओडिसीचे भाषांतर केले आहे. एमिली यांनी त्याचं वर्णन एक 'गुंतागुंतीचा माणूस' असं केलं आहे. त्यात त्यांनी तो परिस्थितीनुसार आपली ओळख आणि कथा बदलतो. फसवणूक करण्यात तो तरबेज असल्यामुळे त्याचं व्यक्तिमत्त्व अधिक गुंतागुंतीचं वाटतं.

ओडिसियस बुद्धिमान, कल्पक आणि काही उणिवा असलेला नायक आहे. त्यामुळेच तो प्राचीन ग्रीक कथांमधील सर्वात मानवी वाटणारा नायक ठरतो. महिलांचं आकर्षण आणि फेशियन्स लोकांसारख्या वैभवशाली जगांचा मोह हीच त्याची ताकदही ठरते आणि अनेक संकटांचं कारणही बनते.

त्यामुळेच ओडिसियसची कथा आजच्या वाचकांनाही आपलीशी वाटते.

(डेझी डन या पुरस्कारप्राप्त अभिजात साहित्याच्या अभ्यासक आणि लेखिका आहेत. द मिसिंग थ्रेड आणि होमरवरील लेडीबर्ड एक्स्पर्ट बुक ही त्यांची प्रसिद्ध पुस्तकं आहेत.)

('द ओडिसी' हा चित्रपट 17 जुलैपासून अमेरिका आणि ब्रिटनसह जगभरातील विविध चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)