'6 महिन्यांची मेहनत पाण्यात'; गणेशोत्सवाला 2 महिने असताना पेणचे मूर्तिकार कसे संकटात आले?

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

"सहा महिन्यांपासून मूर्ती बनवत होतो. पाचशे मूर्ती ऑर्डरनुसार तयार केल्या होत्या. दोन महिन्यांत त्या ग्राहकांना द्यायच्या होत्या. पण या पुरात सगळं वाहून गेलं. आता आमच्याकडे मूर्ती नाहीत, साचे नाहीत आणि साहित्यही नाही. लोकांना मूर्ती तरी कशा देणार? पुढे काय करायचं, हेच कळत नाही."

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील तांबडशेतमधील मूर्तिकार दिलीप म्हात्रे पुरात वाहून गेलेल्या गणेशमूर्तींकडे पाहत आपल्या मनातील वेदना व्यक्त करत होते.

गणेशोत्सवाला अवघे दोन महिने शिल्लक असताना रायगड जिल्ह्यातील पेण, हमरापूर, कलवे आणि आसपासच्या बारा गावांमध्ये आलेल्या महापुरामुळे शेकडो गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये पाणी शिरले.

तयार झालेल्या आणि अंतिम टप्प्यात असलेल्या लाखो गणेशमूर्ती, त्यासाठी लागणारा कच्चा माल, साचे आणि अनेक महिन्यांची मेहनत पुराच्या पाण्याखाली गेली.

गणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळाच्या माहितीनुसार, यंदा या भागात तयार करण्यात आलेल्या सुमारे बारा लाख गणेशमूर्तींपैकी जवळपास तीन लाख मूर्तींचे नुकसान झाले आहे.

मूर्तींसह कच्चा माल, साचे आणि इतर साहित्य मिळून प्राथमिक अंदाजे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले असून सुमारे अडीचशे मूर्ती कार्यशाळांना पुराचा फटका बसला आहे.

या नुकसानाचा फटका केवळ मूर्तिकारांनाच बसलेला नाही, तर हजारो कारागीर, रंगकाम करणारे कामगार, वाहतूकदार आणि या उद्योगावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या अर्थकारणालाही बसला आहे.

प्रशासनाने नुकसानग्रस्त कार्यशाळांचे पंचनामे सुरू केले असून मदतीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे.

गणपतीच्या गावात नेमकं काय घडलं?

पाच आणि सहा जुलै रोजी रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. हजारो घरांसह शेती आणि गणेशमूर्ती कार्यशाळांनाही या पुराचा मोठा फटका बसला.

पेण-हमरापूर परिसर हा महाराष्ट्रातील गणेशमूर्ती निर्मितीचे प्रमुख केंद्र मानला जातो. येथून महाराष्ट्रासह देशभर आणि परदेशातही गणेशमूर्ती पाठवल्या जातात. दिवाळीनंतरच बहुतांश कार्यशाळांमध्ये पुढील गणेशोत्सवासाठी मूर्तीनिर्मितीला सुरुवात होते.

माती आणि पीओपीच्या मूर्ती तयार करण्यासाठी साचा तयार करणे, घडण, वाळवण, रंगकाम आणि सजावट अशा प्रक्रिया पार पडतात. एक गणेशमूर्ती तयार होण्यासाठी साधारण आठवडाभर लागतो. छोट्या कार्यशाळांमध्ये एका हंगामात साधारण हजार मूर्ती तयार होतात, तर मोठ्या कार्यशाळांमध्ये लाखो मूर्ती घडवल्या जातात.

हमरापूर विभागात एक फूट ते दहा फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. साधारण एक फूट मूर्तीची किंमत पाचशे ते आठशे रुपये, दोन फूट मूर्तीची आठशे ते पंधराशे रुपये, तीन फूट मूर्तीची पंधराशे ते तीन हजार रुपये, चार फूट मूर्तीची तीन हजार ते साडेचार हजार रुपये, तर पाच आणि सहा फूट मूर्तींची किंमत पाच हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपेक्षाही अधिक असते. विशेष ऑर्डरवरील मोठ्या मूर्तींची किंमत लाखोंमध्येही जाते.

'मूर्ती नाहीत... ग्राहकांना काय उत्तर द्यायचं?'

तांबडशेत येथील मूर्तिकार दिलीप म्हात्रे सांगतात, "यापूर्वी पावसामुळे गावात पाणी साचायचं. पण यंदा आलेला महापूर आम्ही कधीच पाहिला नव्हता. पाणी इतक्या वेगाने वाढले की मूर्ती सुरक्षित स्थळी हलवायलाही वेळ मिळाला नाही. कारखान्यात पाणी शिरले आणि सगळ्या मूर्ती वाहून गेल्या."

त्यांनी तयार केलेल्या सुमारे पाचशे मूर्ती विविध ग्राहकांसाठी होत्या.

"ऑर्डर दिलेल्या लोकांना आम्ही सांगितले की आता मूर्ती देऊ शकत नाही. आमच्याकडे साचे आणि साहित्य नसल्यामुळे ते नाराज झाले, पण आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही."

मूर्तीनिर्मिती हाच त्यांच्या कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यांच्या कार्यशाळेत सहा जण काम करतात. व्यवसायासाठी त्यांनी बँकेचे कर्ज घेतले आहे. गेली तीस वर्षे मूर्तीकलेवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण सुरू आहे. या पुरात त्यांचे सुमारे 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

"मूर्ती व्यवसाय हेच आमच्या जगण्याचे साधन होते, तेच वाहून गेले. आता पुढे काय करायचे?" हा प्रश्न त्यांना सतावत आहे.

'बुकिंग पूर्ण करणं कठीण'

कलवे येथील मूर्तिकार महेंद्र पाटील गेली पंचवीस वर्षे दीड फूट ते पाच फूट उंचीच्या गणेशमूर्ती तयार करत आहेत.

ते म्हणतात, "दरवर्षी पाणी साचते, पण यंदा महापूर आला. माझ्या हजार मूर्ती आणि बनवण्यासाठी लागणारे साहित्य वाहून गेले. आता मुलाबाळांचे कसे करायचे, हाच प्रश्न आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आल्याने पुन्हा तितक्याच प्रमाणात मूर्ती तयार करणे शक्य नाही."

या पुरात त्यांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

"आता पुन्हा नव्याने काम सुरू केले तरी वेळ निघून जाईल आणि पुन्हा होणारा खर्चही भरून निघणार नाही. शक्य असेल तिथे दुसऱ्या मूर्ती कार्यशाळेतून मूर्ती उपलब्ध करून बुकिंग केलेल्या लोकांना देण्याचा प्रयत्न करू. तेही शक्य नसेल तर ग्राहकांचे पैसे परत करावे लागतील."

"परदेशातील ऑर्डर्सही अडकल्या"

कलवे येथील मूर्ती व्यावसायिक अनिता पाटील सांगतात, "या पुरामुळे केवळ तयार मूर्तींचेच नाही, तर संपूर्ण हंगामाचेच गणित बिघडले आहे. इतक्या मूर्ती भिजल्या आहेत की कोणत्या वाचतील आणि कोणत्या नाहीत हेच समजत नाही. कामगारांचे अनेक दिवस मूर्ती बाहेर काढण्यात आणि कार्यशाळा पूर्ववत करण्यात गेले."

त्यांच्या कार्यशाळेचा विमा आहे. मात्र प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळण्याबाबत त्या साशंक आहेत.

"दहा लाखांचे नुकसान झाले तर दहा हजार रुपये मिळतात, त्याने काय होणार? विमा असला तरी त्याच्या अनेक अटी असतात. प्रत्यक्षात नुकसानभरपाई मिळणे सोपे नसते."

पेणमधून राज्यासह देशभर आणि परदेशात गणेशमूर्ती पाठवल्या जातात. आधीच आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम झाला असताना, आता पुरामुळे परदेशातील काही ऑर्डर्स वेळेत पाठवणे कठीण होणार आहे. काही ऑर्डर्स इतर मूर्तिकारांकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल, असे त्या सांगतात.

तीन लाख मूर्तींचे नुकसान

गणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष सचिन पाटील यांच्या मते, हमरापूर विभागात सुमारे सहाशे मूर्ती कार्यशाळा असून त्यावर थेट आणि अप्रत्यक्षपणे सुमारे छत्तीस हजार लोकांचा रोजगार अवलंबून आहे.

यापैकी सुमारे अडीचशे कार्यशाळांना यंदाच्या पुराचा फटका बसला आहे. या उद्योगाची एका हंगामातील उलाढाल सुमारे ऐंशी कोटी रुपयांची आहे.

छोट्या मूर्तिकारालाही एका हंगामात साधारण दहा ते पंधरा लाख रुपयांचा नफा होऊ शकतो, तर मोठ्या कार्यशाळांची उलाढाल आणि कमाई यापेक्षा अनेक पटींनी अधिक असते. त्यामुळे यंदाचे नुकसान केवळ तीन लाख मूर्तींपुरते मर्यादित नसून संपूर्ण हंगामाच्या उत्पन्नावर परिणाम करणारे आहे, असे सचिन पाटील सांगतात.

मूर्तिकारांच्या मते, पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या किंवा पूर्णपणे भिजलेल्या मातीच्या आणि पीओपीच्या मूर्ती पुन्हा विक्रीसाठी वापरता येत नाहीत.

केवळ किरकोळ नुकसान झालेल्या काही मूर्ती वाळवून किंवा आवश्यक दुरुस्ती करून वापरण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अशा मूर्तींची संख्या अत्यंत कमी असते.

अ‍ॅडव्हान्स बुकिंगचं काय?

बहुतांश कार्यशाळांमधील 50 ते 60 टक्के मूर्ती आधीच बुक झालेल्या असतात. एखादी मूर्ती नष्ट झाल्यास प्रथम दुसऱ्या मूर्तिकाराकडून ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो.

ते शक्य न झाल्यास ग्राहकांना अ‍ॅडव्हान्सची रक्कम परत केली जाते. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आल्याने सर्व ऑर्डर्स नव्याने तयार करणे शक्य नसले तरी शक्य तिथे इतर मूर्तिकारांच्या मदतीने बुकिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मूर्तिकार सांगतात.

नुकसान भरून काढण्याचं मोठं आव्हान

सचिन पाटील सांगतात की, अनेक मूर्तिकार दिवस-रात्र काम करून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यासाठी आर्थिक मदत, मनुष्यबळ, वीजपुरवठा आणि कच्च्या मालाची उपलब्धता आवश्यक आहे.

शासनाकडून पंचनामे सुरू आहेत, मात्र विमा कंपन्यांच्या अटींमुळे अनेकांना अपेक्षित भरपाई मिळत नाही. त्यामुळे अनेक कार्यशाळांसमोर पुन्हा उभे राहण्याचे मोठे आव्हान आहे.

प्रशासन काय म्हणतं?

पेणचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी तानाजी शेजाळ यांनी बीबीसी मराठीला सांगितले की, "नुकसानग्रस्त मूर्ती कार्यशाळांचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे चाळीस कार्यशाळांचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित कार्यशाळांचे पंचनामे पुढील काही दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर शासनाच्या नियमानुसार मदतीसाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल."

यंदाचा पूर वेगळा का ठरला?

मूर्तिकार सांगतात की, दरवर्षी पावसाळ्यात काही प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे कार्यशाळांमध्ये प्लास्टिकचे आच्छादन, पत्र्याची शेड आणि उंच टेबलांवर मूर्ती ठेवण्याची व्यवस्था केली जाते.

मात्र यंदा सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तासांतच महापुराची स्थिती निर्माण झाली.

जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेड आणि प्लास्टिकची आच्छादने उडून गेली. पाणी इतक्या वेगाने वाढले की मूर्ती आणि साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याची संधीच मिळाली नाही.

यापुढे खबरदारी म्हणून कार्यशाळांमध्ये उंच टेबल, अतिरिक्त प्लास्टिक शेड आणि शक्य तिथे घरामध्ये सुरक्षित जागा तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मूर्तिकार सांगतात.

केवळ मूर्तींचंच नाही, तर वर्षभराच्या उत्पन्नाचं नुकसान

अनेक कार्यशाळांमध्ये पुन्हा काम सुरू झाले आहे. ज्या मूर्ती वाचल्या आहेत त्यांच्यावर रंगकाम आणि अंतिम प्रक्रिया सुरू आहे, तर जिथे शक्य आहे तिथे नव्याने मूर्ती घडवल्या जात आहेत.

मात्र गणेशोत्सव जवळ आल्याने वेळ अत्यंत कमी आहे. पैसा, कच्चा माल, मनुष्यबळ आणि वीजपुरवठ्याच्या अडचणींमुळे सर्व ऑर्डर्स वेळेत पूर्ण होतील का, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

काही ग्राहकांच्या ऑर्डर्स इतर मूर्तिकारांकडे वर्ग केल्या जात आहेत, तर काहींना अ‍ॅडव्हान्सची रक्कम परत करावी लागत आहे.

हमरापूर विभागात तयार होणाऱ्या गणेशमूर्तींची मागणी महाराष्ट्रासह देशभर आणि परदेशात आहे. या उद्योगावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.

यंदाच्या पुरात झालेल्या नुकसानीचा फटका केवळ तयार मूर्तींनाच बसलेला नाही, तर संपूर्ण हंगामाच्या उत्पादन क्षमतेला बसला आहे. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी अनेक महिने, कदाचित काहींना अनेक वर्षे लागू शकतात.

गणेशोत्सव जवळ येत असताना पेणमधील कार्यशाळांमध्ये पुन्हा मूर्तीकामाची गजबज आणि रंगांचे फटकारे दिसू लागले आहेत.

मात्र, यंदा त्या प्रत्येक फटक्यामागे एक वेगळी धडपड आहे. कारण या पुरात केवळ तीन लाख गणेशमूर्ती वाहून गेल्या नाहीत.

अनेक मूर्तिकारांच्या सहा ते आठ महिन्यांच्या मेहनतीसह त्यांच्या वर्षभराच्या उत्पन्नाच्या आशाही पाण्यात वाहून गेल्या आहेत.

आता गणेशोत्सवापूर्वी मूर्ती घडवण्याइतकंच, स्वतःचं आयुष्य पुन्हा उभं करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर उभं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)