You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फोटोग्राफी येण्याआधी भारताचं रुप कसं होतं? पाहा 11 ऐतिहासिक चित्रं
- Author, सुधा जी. टिळक
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
फोटोग्राफी ही कला साम्राज्यसत्तेची दृश्यभाषा बनण्यापूर्वीच्याही खूप आधी, एक इंग्रज महिला भारतात भेटलेल्या लोकांची चित्रं विलक्षण कुतूहल आणि अचूकतेनं रेखाटत होती.
एमिली इडन असं तिचं नाव.
एमिली या एक प्रतिभावान कलाकार आणि लेखिका होत्या. त्या ब्रिटनमधील अत्यंत प्रभावशाली अशा एका राजकीय कुटुंबातील होत्या.
1830 च्या दशकात, भारताचे गव्हर्नर-जनरल असलेले त्यांचे बंधू जॉर्ज इडन (ऑकलंडचे पहिले अर्ल) यांच्यासोबत त्यांनी उत्तर भारतात प्रवास केला.
या प्रवासातच त्यांनी राजपुत्र, सेनापती आणि दरबारी यांच्यासोबतच सेवक, परिचारक, प्रवासी, फकीर, अफगाण व शीख सरदार तसेच अकाली योद्धे, पहाडी समाज आणि अगदी शाही प्रवासांत सोबत असणाऱ्या प्राण्यांचीही चित्रे रेखाटली.
त्यांच्या या अत्यंत व्यापक दृष्टीमुळेच त्या त्यांच्या समकालीन अनेक कलाकारांपासून वेगळ्या ठरल्या.
त्यांची दोन डझनांहून अधिक रेखाचित्रे 1844 मध्ये 'पोर्ट्रेट्स ऑफ द प्रिन्सेस अँड पीपल ऑफ इंडिया' या नावानं प्रकाशित झाली.
आता ती रेखाचित्रं दिल्लीतील डीएजी (DAG) इथे आयोजित करण्यात आलेल्या 'प्रिन्सेस अँड पीपल' या प्रदर्शनाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत.
कला इतिहासकार मेरी ॲन प्रायर यांनी आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये, इडन यांच्या मूळ रेखाचित्रांवरून बनवलेल्या हस्त-रंगीत लिथोग्राफची संपूर्ण प्रकाशित मालिका एकत्र आणण्यात आली आहे.
मार्च 1836 मध्ये इडन कलकत्त्यात (आताचे कोलकाता) पोहोचल्या. इथं त्यांचं स्वागत एका अपरिचित जगानं केलं.
घराची ओढ आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेताना होणारी ओढाताण यामुळे, त्यांनी तीन आठवडे कोणतंही रेखाटन केलं नाही किंवा दोन महिने कोणतंही चित्र पूर्ण केलं नाही.
मात्र, त्यांच्यासोबतच्या लोकांमुळे त्यांचा उत्साह टिकून राहिला.
यामध्ये त्यांचा पुतण्या विल्यम, बहीण फॅनी, दासी, एक आया, आचारी, वैयक्तिक सेवक, डॉक्टर आणि विविध पाळीव प्राणी यांचा समावेश होता.
चित्रकार तितक्याच आकर्षक लेखिका
भारतात पोहोचण्यापूर्वीच, नवीन लोक, संस्कृती आणि जीवनशैली यांच्याशी आलेल्या संपर्कामुळे त्यांचा दृष्टिकोन विस्तारू लागला होता, असं कला इतिहासकार आणि लेखिका मेरी ॲन प्रायर नमूद करतात.
"लोक आणि ठिकाणांमधील विविधतेमुळे एमिली यांच्या कलासृजनाला प्रेरणा मिळाली आणि त्यात सुधारणा झाली. तसेच, त्यांच्या उपजत कुतूहलाने नेहमीच काहीतरी वेगळं व असामान्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या रेखाटनांतून व चित्रांमधून आपल्या निरीक्षणांची अत्यंत बारकाईने नोंद केली." किल्ले, चर्च आणि इंग्लंडमधील निसर्गदृश्ये यांच्याऐवजी, इडनने आपला मोर्चा अनोळखी लोक, विविध वेशभूषा, वास्तुकला आणि अपरिचित निसर्गदृश्यं यांच्याकडे वळवला.
1836 ते 1842 या काळात, त्या कुतूहलापोटीच त्या अशा एका प्रदेशातून फिरल्या जो एका मोठ्या राजकीय परिवर्तनाच्या उंबरठ्यावर होता. त्यांनी काढलेली रेखाचित्रं महाराजा रणजित सिंह यांच्या दरबाराची एक दुर्मिळ झलक सादर करतात.
महाराजांचे पंजाबमधील राज्य हे उपखंडातील सर्वात शक्तिशाली राज्यांपैकी एक होतं आणि ही चित्रे त्यांच्या राजवटीचा उत्तरार्ध व व्हिक्टोरियन युगाचा प्रारंभ दर्शवतात.
इडन एक कलाकार होत्या तितकीच आकर्षक लेखिकाही होत्या. त्यांच्या ओघवत्या रोजनिशी विनोद आणि निरीक्षणांनी ओतप्रोत भरलेल्या आहेत. यामध्ये व्यक्तींची नावे आणि ठिकाणांची नावे अनेकदा त्यांना जशी ऐकू यायची तशीच लिहिलेली आहेत.
बनारसमध्ये (आताचे वाराणसी) पोहोचल्यावर, इडन यांच्या ग्रुपनं गंगेतून प्रवास केला आणि त्यानंतर ते जवळच असलेल्या रामनगरला गेले. तिथे त्या राजाचे एक निवासस्थान होतं.
तिथल्या दृश्यानं एमिली यांना इतकी भुरळ घातली की त्यांनी लिहिलं: "आम्ही आमची स्टीमर इथेच ठेवणार आहोत आणि त्यातून बाहेर जाऊन चित्रं (स्केचेस) काढणार आहोत."
पण त्यांचा उत्साह काही लगेच निर्माण झाला नाही. सुरुवातीला, इंग्लंड आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक तफावतीमुळे इडनला आपल्या मायदेशी परतण्याची तीव्र ओढ वाटू लागली.
चर्चमध्ये स्त्रिया डोक्यावर 'बॉनेट' (विशिष्ट प्रकारची टोपी) न घालता येत असत. तिथले भुकेले डास, असह्य उकाडा, कुत्रे-कावळे-कोल्हे आणि ब्राह्मणी घारींचा कोलाहल, तसेच दिवसाचा बराचसा वेळ घरातच बंदिस्त राहावे लागणे, या गोष्टींमुळे त्या अस्वस्थ होत असत.
पण जसजसे महिने उलटत गेले, तसतसे त्यांनी मोठ्या प्रमाणावर चित्रनिर्मिती केली. त्यांची चित्रं लवकरच लोकप्रिय झाली आणि त्यांची सिमल्यातील धर्मादाय प्रदर्शनांमध्ये वेगाने विक्री होऊ लागली.
तसेच, भारतातील ब्रिटिश लोकांकडून या चित्रांची प्रशंसा झाली आणि भारतीय कलाकारांनीही त्यांची नक्कल करण्यास सुरुवात केली.
प्रायर यांच्या मते, रीजन्सी आणि व्हिक्टोरियन युगातील कोणत्याही ब्रिटिश महिला कलाकाराने निर्माण केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रांमध्ये इडन यांच्या भारतीय चित्रांचा समावेश होतो.
केवळ आपल्या वनस्पती चित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या शार्लट कॅनिंग आणि नंतर मॅरियन नॉर्थ यांनीच त्यांच्या कामगिरीला टक्कर दिली.
इंग्लंडला परतण्याच्या ओढीने 'इडन' कुटुंब 1842 मध्ये भारत सोडून गेलं. ब्रिटनला परतल्यावरही एमिली यांनी चित्रकला सुरूच ठेवली.
1838 मध्ये शीख दरबाराला भेट दिल्यानंतर, 'इडन' यांनी महाराजा रणजित सिंग यांचे ज्येष्ठ पुत्र खडक सिंग यांच्या सहकाऱ्यांची रेखाचित्रे काढली. त्यांचे आकर्षक झगे, पगड्या आणि भरतकाम केलेले बूट यांतून त्या विशिष्ट वेशभूषेचे दर्शन घडतं. या वेशभुषेनं या कलाकाराला भुरळ घातली होती. त्या वर्षी लिहिलेल्या पत्रांमध्ये ईडन यांनी शीख लोकांचे वर्णन वारंवार 'आकर्षक' (picturesque) असं केलं असून, त्यांच्या 'सुडौल शरीरयष्टी'ची प्रशंसा केली आहे.
वरील चित्रे कलकत्त्यातील 'गव्हर्नमेंट हाऊस'मधील मुख्य सेवक असलेल्या धुल्लो (डावीकडे) आणि देदार खान (उजवीकडे) यांची आहेत. त्यांच्या हिवाळी गणवेशातील चित्रे इडन यांनी रेखाटली.
लॉर्ड ऑकलंड यांचे वरिष्ठ सेवक असल्याने ते कमरेला खंजीर बाळगत असत, परंतु घराच्या आत मात्र अनवाणी असत.
इडनने अफगाणिस्तानचा पारंपरिक पांढरा सलवार-कमीज आणि पगडी परिधान केलेल्या या पश्तून पुरुषांची रेखाचित्रे काढली. हे पुरुष एका ब्रिटिश अधिकाऱ्यासोबत काबुलहून सिमल्याला आले होते. त्यांनी या भेटीचं वर्णन "दोन अरबांशी" झालेली भेट असं केलं.
भारताच्या प्रवासादरम्यान एचएमएस ज्युपिटर जहाजावर काढलेल्या जलरंगांनी इडन यांनी एक स्केचबुक भरलं. ज्यामध्ये त्यांनी त्या खलाशांची चित्रे काढली ज्यांनी तो कठीण प्रवास सुकर करण्यास मदत केली होती.
अकाली निहंग योद्ध्यांचे 'ईडन' यांनी रेखाटलेले चित्र शीख सैन्यातील या विशिष्ट योद्धा गटाचे दर्शन घडवते. हे योद्धे त्यांच्या उंच पगड्या, निळे झगे आणि पोलादी फेक-शस्त्रांमुळे ओळखले जातात.
इडन यांनी कलकत्त्यातील एका श्रीमंत मुस्लीम विद्यार्थ्याचे (डावीकडे) रेखाचित्र काढले. यात त्यांनी त्या विद्यार्थ्याच्या या आग्रहाची नोंद केली आहे की, त्याची कडी आणि दागिने, ज्यात मोती व पाचूंचा समावेश होता, हे त्याचे स्वतःचे होते. त्याच्या वडिलांचे नव्हते.
उजवीकडे एका सरकारी कर्मचाऱ्याची मुलगी आहे. तिने त्या काळी अपूर्व असलेल्या 'सलवार-कमीज'चा पेहराव केला असून, तिने दागिने, भरतकाम केलेली टोपी आणि हातात खेळण्यातील खुळखुळा धारण केला आहे.
इडन केवळ एक विपुल निर्मिती करणारा कलाकारच नव्हत्या, तर एक विनोदी लेखिकाही होत्या.
मात्र, भारतातील अपरिचित निसर्गदृश्यं आणि तिथल्या लोकांची चित्रं रेखाटण्यासाठी त्यांना जी तीव्र प्रेरणा मिळाली होती, ती आता ओसरली होती. त्यांची नंतरची चित्रे संख्येनं कमी होती आणि त्यांत प्रामुख्याने इंग्लंडमधील ओळखीच्या दृश्यांचंच चित्रण होतं.
एमिली इडन यांचे 1869 मध्ये निधन झाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)