You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
1 सेंटीमीटरपेक्षाही लहान ट्युमरमुळे 16 वर्षीय मुलाचं 6 महिन्यांत 40 किलो वजन कसं वाढलं?
- Author, आंद्रे बिएरनथ
- Role, बीबीसी ब्राझीलसाठी, लंडन
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
अॅथलेटिको-पीआर या फुटबॉल संघाचा चाहता आणि मुआय थाईचा (एक प्रकारचं मार्शल आर्ट) सराव करणाऱ्या 16 वर्षीय गुस्तावो दि ऑलिव्हेरा याच्या शरीरात अतिशय वेगाने आणि नाट्यमय बदल घडू लागले. वाढत्या वयात वजन वाढणं सामान्य असलं तरी त्याच्या बाबतीत परिस्थिती वेगळी होती.
2025 च्या सुरुवातीला त्याचं वजन 70 किलोपेक्षाही कमी होतं. पण त्याच वर्षाच्या शेवटी त्याचं वजन 113 किलोपर्यंत पोहोचलं.
या अचानक झालेल्या बदलामागे कवटीच्या तळाशी असलेला एक लहानसा सौम्य (बेनाइन) ट्युमर कारणीभूत होता.
या ट्युमरमुळे शरीरातील कॉर्टिसोल या अत्यंत महत्त्वाच्या हार्मोनचं संतुलन पूर्णपणे बिघडलं होतं. आणि या ट्युमरचा शोधही जवळपास योगायोगाने लागला होता.
घोट्यावर आला काळानिळा डाग
गुस्तावोच्या आई सिलमारा दि ऑलिव्हेरा या रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतात. त्यांना जून 2025 मध्ये मुलाच्या तब्येतीबाबत काहीतरी बिनसलं असल्याचं लक्षात आलं.
गुस्तावोला काही दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी घरी असलेल्या यंत्राद्वारे त्याचा रक्तदाब तपासण्याचा निर्णय घेतला.
त्यात रक्तदाब सामान्य नसल्याचं दिसून आलं.
"आम्हाला सुरुवातीला वाटलं की यंत्रच बिघडलं असावं," सिलमारा सांगतात.
"पण त्याचवेळी त्याचं वजनही वाढत होतं आणि त्याची भूक खूपच वाढली होती. तो एकावेळेस तीन-तीन जेवणाएवढं अन्न खायचा."
डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर कुटुंबानं त्याच्या आहारात काही बदल केले. गुस्तावो आधीपासूनच नियमित व्यायाम करत होता आणि आठवड्यातून तीन वेळा मुआय थाईचे वर्गही घेत होता.
"पण आम्ही त्याच्या खाण्यावर जितकं नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, तितकं त्याचं वजन वाढत गेलं," त्याची आई सांगते.
गुस्तावोची प्रकृती आणखी खालावत गेली. अखेर एका अनपेक्षित घटनेमुळे तो पुन्हा डॉक्टरांकडे गेला. सप्टेंबर 2025 मध्ये मुआय थाईच्या सरावादरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली.
त्याच्या त्वचेवर मोठा काळानिळा डाग पडल्यामुळे त्याची आई त्याला आपत्कालीन उपचार विभागात घेऊन गेली.
"त्याचा एक्स-रे काढण्यात आला, पण कोणतंही फ्रॅक्चर आढळलं नाही," सिलमारा सांगतात.
मात्र, गुस्तावोची एकूण शारीरिक अवस्था पाहून तेथील डॉक्टरांनी त्याला आणि त्याच्या आईला दुसऱ्या दिवशी अधिक सखोल तपासणीसाठी पुन्हा येण्यास सांगितलं.
दुर्मीळ आजाराचं निदान
यानंतर त्यांना पराना राज्यातील प्रसिद्ध बालरुग्णालय पेक्वेनो प्रिन्सिपे हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं.
त्या काळातील आपली अवस्था आठवत गुस्तावो म्हणतो, "मी रस्त्यावर चालूही शकत नव्हतो. काहीही करू शकत नव्हतो. मला सतत असं वाटायचं की मी मरून जाईन. मला श्वास घेणंसुद्धा कठीण झालं होतं."
रुग्णालयात त्याच्यावर अनेक तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टर विविध प्रकारच्या शक्यतांचा विचार करून तपासत होते.
सुमारे एका महिन्यानंतर, म्हणजे ऑक्टोबर 2025 च्या मध्यात, आरोग्यतज्ज्ञांना अखेर या गूढ आजाराचं कारण सापडलं.
गुस्तावोला कुशिंग्स डिसिज (Cushing's Disease) हा दुर्मीळ आजार झाला होता.
आंतरराष्ट्रीय अंदाजानुसार, दरवर्षी सुमारे 10 लाख मुलांमागे या आजाराचं फक्त एक नवीन प्रकरण आढळतं.
"डॉक्टरांनी निदान सांगितलं तेव्हा सगळं काही स्पष्ट झालं. जणू संपूर्ण कोडंच सुटलं," सिलमारा आठवतात.
कुशिंग्स डिसिज म्हणजे काय?
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, पिट्युटरी ग्रंथीत (पियुष ग्रंथी) सौम्य ट्युमर तयार झाल्यामुळे कुशिंग्स डिसीज होतो.
पिट्युटरी ग्रंथी मेंदूच्या तळाशी असते आणि ती ACTH नावाचं हार्मोन तयार करते.
हे हार्मोन मूत्रपिंडांच्या वर असलेल्या अॅड्रिनल ग्रंथींना कॉर्टिसोल हे हार्मोन तयार करण्यासाठी उत्तेजित करतं.
कुशिंग्स डिसिज असलेल्या रुग्णांमध्ये कॉर्टिसोलचं उत्पादन खूप जास्त प्रमाणात होतं.
"कॉर्टिसोलच्या या अतिरिक्त प्रमाणामुळे शरीरात अनेक बदल होतात. गुस्तावोच्या बाबतीत आपण पाहिलं की त्याचं वजन खूप वाढलं, सूज आली, चेहरा अधिक गोल झाला आणि छातीच्या भागात चरबी साठली," असं पेक्वेनो प्रिन्सिपे रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. कार्लोस माटोजो सांगतात.
डॉ. माटोजो सांगतात की जवळपास 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अशा आजाराचे फक्त चार रुग्ण पाहिले आहेत.
अशा प्रकरणांमध्ये पिट्युटरीतील ट्युमर काढून टाकणं हाच मुख्य उपचार असतो.
गुस्तावो सांगतो की शस्त्रक्रियेची गरज असल्याचं कळल्यावर तो घाबरला होता.
"सर्जरी म्हटलं की कवटी उघडून ट्युमर काढला जाईल असंच मनात येतं," तो म्हणतो.
मात्र या उपचाराची चांगली गोष्ट म्हणजे यात डोक्यावर कोणतीही चिर द्यावी नाही. संपूर्ण शस्त्रक्रिया नाकपुड्यांमधून, फायबर ऑप्टिक कॅमेरे आणि सूक्ष्म उपकरणांच्या मदतीने केली जाते.
"नाकामागे स्फेनॉइड नावाचं एक पोकळ हाड असतं. त्यातून आत प्रवेश केल्यावर आपण थेट पिट्युटरी ग्रंथीपर्यंत पोहोचू शकतो," डॉ. माटोजो स्पष्ट करतात.
शस्त्रक्रिया आणि पुनर्वसन
गुस्तावोची शस्त्रक्रिया डिसेंबर 2025 मध्ये झाली. ती सुमारे दोन तास चालली आणि यशस्वी ठरली.
त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, त्याची प्रकृती समाधानकारकरीत्या सुधारली. मात्र अशा प्रकरणांमध्ये अपेक्षित असणारे काही दुष्परिणाम त्यालाही जाणवले. त्यात थकवा, सौम्य डोकेदुखी आणि कॉर्टिसोलच्या पातळीतील असंतुलन यांचा समावेश होता.
"शस्त्रक्रियेपूर्वी त्याच्या अॅड्रिनल ग्रंथींवर असामान्य नियंत्रण होतं आणि त्यामुळे कॉर्टिसोलचं उत्पादन जास्त प्रमाणात होत होतं. ट्युमर काढल्यानंतर हा उत्तेजक घटक नाहीसा झाला आणि शरीर काही काळासाठी गोंधळलेल्या अवस्थेत गेलं. त्यामुळे कॉर्टिसोलचं उत्पादन अचानक कमी झालं," डॉ. माटोजो सांगतात.
सध्या गुस्तावोची नियमित तपासणी सुरू आहे. त्याचबरोबर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीही सुरू आहे, जेणेकरून पिट्युटरी आणि अॅड्रिनल ग्रंथींमधील संतुलन पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल.
अतिरिक्त वजन आणि कॉर्टिसोलच्या वाढलेल्या पातळीमुळे त्याच्या यकृत, डोळे, हृदय आणि रक्तदाबावर काही परिणाम झाले होते.
2026 च्या पहिल्या सहा महिन्यातच त्याचं सुमारे 15 किलो वजन कमी झालं.
कुशिंग्स डिसिजच्या दृष्टीने पाहिल्यास सध्या तो रिमिशनमध्ये आहे.
म्हणजेच, ट्युमर पुन्हा निर्माण होतो का हे तपासण्यासाठी त्याला वर्षातून एकदा फॉलो-अप तपासणी करावी लागेल.
निदानात होणारा विलंब
डॉ. माटोजो यांच्या मते, गुस्तावोसारख्या प्रकरणांमुळे डॉक्टरांनी रुग्णांकडे अधिक काळजीपूर्वक पाहण्याची गरज अधोरेखित होते.
"मी विद्यापीठात प्राध्यापक आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास आणि कोणत्याही लक्षणांमागे अनेक आजार दडलेले असू शकतात हे नेहमी लक्षात ठेवण्याचा सल्ला देतो," ते म्हणतात.
"कुशिंग्स डिसिजच्या बाबतीत रुग्णांना योग्य निदान मिळण्यासाठी सरासरी दोन वर्षं लागतात. तोपर्यंत त्यांच्यावर असे उपचार चालू असतात जे परिणामकारक ठरत नाहीत," ते पुढे सांगतात.
सिल्मारा यांच्या मते, असंच काहीसं गुस्तावोसोबतही घडू शकलं असतं.
"जर त्याच्या घोट्याला दुखापत झाली नसती, तर कदाचित आजही आम्हाला त्याला हा आजार असल्याचं समजलं नसतं," त्या म्हणतात.
"आणि हे सर्व त्या आरोग्य कर्मचाऱ्यामुळे शक्य झालं ज्यांनी व्यापक दृष्टीकोन ठेवला. त्यांनी फक्त त्याच्या पायावर उपचार करून दुर्लक्ष केलं असतं, पण त्यांनी तसं केलं नाही," त्या पुढे सांगतात.
काही रुग्णांसाठी लक्षणं सुरू होण्यापासून योग्य निदान मिळेपर्यंतचा हा कालावधी जीवघेणा ठरू शकतो. वजन वाढणं, रक्तदाबातील बदल आणि यकृतासारख्या महत्त्वाच्या अवयवांवरील परिणाम यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.
याच कारणामुळे गुस्तावोने आपल्या आजाराबद्दल खुलेपणाने बोलण्याचा निर्णय घेतला.
"मला आशा आहे की इतरांना माझ्यासारखा त्रास सहन करावा लागणार नाही. वजन वाढणं आणि उच्च रक्तदाब यांसारखी लक्षणं गंभीर होण्यापूर्वीच त्यांच्यावर उपचार होऊ शकतील," तो म्हणतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)