You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पहिल्या महायुद्धात जीव गमावूनही विस्मृतीत गेलेल्या हजारो भारतीय सैनिकांना पहिल्यांदाच मिळाली ओळख
- Author, अलीम मकबूल
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
भारत स्वतंत्र होण्याआधी आणि देशाची फाळणी होण्यापूर्वी इथल्या हजारो सैनिकांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटनच्या बाजूने लढताना आपला जीव गमावला होता. आता कुठे पहिल्यांदाच या सैनिकांना अधिकृतपणे मान्यता मिळत आहे आणि कागदपत्रांमध्ये त्यांच्या नावांची नोंद केली जात आहे.
संशोधकांनी ब्रिटिश भारतीय सैन्यातल्या अशा 9,909 सैनिकांची नावे शोधली आहेत ज्यांची नावे आता 'कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशन'च्या (CWGC) मृत सैनिकांच्या यादीत जोडली जात आहेत.
पहिल्या महायुद्धानंतर लगेचच तयार करण्यात आलेल्या रजिस्टरमधून ही नावे शोधण्यासाठी ब्रिटनच्या स्वयंसेवकांनी पंजाबमध्ये अनेक वर्षे काम केले.
आता त्या सैनिकांच्या वंशजांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, ज्यांच्या पूर्वजांनी सैन्यात सेवा दिली आणि आपले प्राण गमावले.
या सैनिकांनी सैन्यात राहून देशासाठी सेवा केली आणि आपला जीव गमावला आता त्यांच्या पुढच्या पिढीचा म्हणजेच त्यांच्या वंशजांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
'आता सर्व बलिदान जगासमोर आले'
ब्रिटनमधील लेस्टर येथे राहणारे डेंटिस्ट सनी पलाही म्हणतात, "हे वर्तुळ आता पूर्ण झाले आहे. आता मला पूर्वीपेक्षा खूप जास्त समाधान मिळत आहे."
पलाही अनेक वर्षांपासून त्यांच्या पणजोबांबद्दल माहिती शोधत होते. त्यांना फक्त एवढेच ठाऊक होते की त्यांचे पणजोबा पहिल्या महायुद्धात लढायला गेले होते आणि त्यानंतर कधीच परत आले नाहीत.
परंतु संशोधकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की त्यांचे पणजोबा केसर सिंह यांचे नाव नुकत्याच तपासलेल्या रजिस्टर्स सापडले असून आता अधिकृत यादीत त्यांचा समावेश केला जाईल.
सनी पलाही म्हणतात, "याला एका अधिकृत संस्थेने मान्यता दिली आहे जे पूर्वी कधीच घडले नव्हते. आता त्यांची नोंद 'सीडब्ल्यूजीसी' (CWGC) मध्ये करण्यात आली आहे. आता हे सर्व बलिदान जगासमोर आले आहेत."
त्यांचे म्हणणे आहे की, या सन्मानामुळे पहिल्या महायुद्धाशी संबंधित असलेल्या जगभरातल्या लोकांमध्ये आपल्यालाही मानाचं स्थान मिळाल्याचा खूप अभिमान वाटतोय.
14 लाख लोकांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिश इंडियन आर्मीत सेवा दिली
पहिले महायुद्ध: पहिली ठिणगी - आर्च ड्यूकची हत्या-1
पहिले महायुद्ध: पहिली ठिणगी - आर्च ड्यूकची हत्या-2
भारतीय उपखंडातून (म्हणजेच आजचा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून) जवळपास 14 लाख लोकांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये राहून सेवा दिली होती.
युद्धाच्या नंतरच्या वर्षांमध्ये, अधिकाऱ्यांनी पंजाबच्या प्रत्येक शहराला आणि गावाला भेट दिली. जेणेकरून केवळ त्याच राज्यातून आलेल्या 3,20,000 सैनिकांची नावे नोंदवता येतील.
1947 मध्ये जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा पंजाबचे दोन भाग होऊन तो भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागला गेला.
पाकिस्तानमधील लाहोर संग्रहालयाच्या कपाटांमध्ये डझनापेक्षा जास्त जुने, फाटलेले आणि नाजूक लेदर कव्हर असलेले रजिस्टर्स ठेवलेले आहेत. यामध्ये हाताने लिहिलेली माहिती भरलेली असून प्रत्येक रजिस्टरवर एका गावाचे नाव लिहिलेले आहे.
यूके पंजाब हेरिटेज असोसिएशनच्या सदस्यांनी हे जुने रेकॉर्ड्स कॉम्प्युटरवर डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला जो कित्येक वर्षे चालला.
ग्रिनिच युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करणारी आणि या महत्त्वाच्या संशोधनाचा भाग असलेली जॅस्मिन बसरा सांगतात, "स्वतः एक पंजाबी असल्यामुळे आपल्या समाजासाठी असे काहीतरी काम करायला मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे."
हे काम करत असताना जॅस्मिन बसरा यांना अचानकपणे त्यांच्याच कुटुंबातल्या दोन लोकांबद्दल माहिती मिळाली. हे दोघे इतर कोणी नसून त्यांचे पणजोबा आणि त्यांचे भाऊ होते. या दोघांनीही पहिल्या महायुद्धात ब्रिटिश इंडियन आर्मीकडून युद्ध लढले होते.
मृत सैनिकांपैकी कोणत्या धर्माचे किती?
या सांगतात, "हा अनुभव माझ्यासाठी खूप भावूक करणारा होता. ब्रिटनमध्ये वाढलेली दुसरी पिढी असल्यामुळे मला पंजाब नेहमी खूप दूरचा वाटायचा आणि त्याचा ब्रिटनच्या इतिहासाशी काही संबंध असेल असे कधी वाटलेच नव्हते. पण या शोधामुळे या दोन्ही संस्कृतींना जोडणारा एक मजबूत धागा मला सापडला आहे."
स्वयंसेवकांनी केलेल्या या कार्याला कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशन'कडून (CWGC) पूर्ण पाठबळ आणि प्रोत्साहन मिळाले आहे. या संस्थेने दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या रेकॉर्ड्समध्ये केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल आहे.
आयोगाच्या इतिहासकारांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या 9,909 सैनिकांची नावे पूर्वी स्मारक अभिलेखांमध्ये म्हणजेच आधीच्या शहीद स्मारकांच्या यादीत समाविष्ट नव्हती, त्यांपैकी बहुतांश सैनिक असे होते ज्यांचा मृत्यू दुखापतींमुळे युद्धक्षेत्राच्या बाहेर झाला होता.
त्या काळातल्या ब्रिटिश इंडियन गव्हर्नमेंटच्या नियमांमुळे या सैनिकांना युद्धातील शहीदांचा दर्जा मिळाला नव्हता. पण आता तो जुना निर्णय बदलण्यात आला आहे.
नुकतीच ओळख पटलेल्या हजारो मृत सैनिकांपैकी सुमारे 25% शीख, 25% हिंदू आणि जवळपास 40% मुस्लिम आहेत.
सीडब्ल्यूजीसी'ने सांगितले की, ही नवी मोहीम फक्त त्यांची नावे कागदपत्रांवर आणण्यापुरती मर्यादित नाही तर पहिल्या महायुद्धाकडे फक्त युरोपच्या नजरेतून पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो बदलण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे.
त्यांच्या मते, आता जी स्मारके बनवली जातील त्यातून या युद्धाचे खरे आणि जागतिक स्वरूप जगासमोर आले पाहिजे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)