You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या विरुद्ध ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. ब्रेकिंग, तातडीने खारकीव्ह सोडा, भारतीय दूतावासाची भारतीय नागरिकांना सूचना

    युक्रेनच्या खारकीव्ह शहरात असलेल्या भारतीय नागरिकांना तिथल्या भारतीय दूतावासाने तातडीने शहर सोडण्याची सूचना दिली आहे.

    या अॅडव्हायजरीमध्ये म्हटलंय, "तुमच्या सुरक्षेसाठी तातडीने खारकीव्ह सोडा. लवकरात लवकर पेसोचिन, बाबाये आणि बेझ्लीयुडोव्का या शहरांना जा. कोणत्याही परिस्थितीत युक्रेनियन वेळेनुसार आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या वसाहतींपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.

  2. उद्ध्वस्त खारकीव्ह, हल्ल्यांमुळे ठिकठिकाणी पडझड आणि आग

    युक्रेनमधलं दुसऱ्या क्रमांकाचं शहर असणारं खारकीव्ह रशियन फौजांच्या माऱ्याला तोंड देतंय. खासकीव्हमध्ये युक्रेनचे मोठे उद्योग आहेत.

  3. तिसरं महायुद्ध अण्वस्त्रांनी होईल - रशियाचे परराष्ट्र मंत्री

    रशिया कोणत्याही परिस्थितीत युक्रेनला अण्वस्त्रं मिळू देणार नसल्याचं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोफ यांनी म्हटलंय. तिसरं महायुद्ध अण्वस्त्रांनी होईल आणि ते विनाशकारी असेल असंही त्यांनी म्हटलंय.

    रशिया युक्रेनसोबतच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी तयार आहे, पण युक्रेन अमेरिकेच्या तालावर चालत असल्याचं लावरोफ यांनी म्हटलंय.

    युक्रेन अण्वस्त्रं मिळण्याचे प्रयत्न करत आल्याचं लावरोफ यांनी दिवसभरापूर्वीही म्हटलं होतं. हा एक धोका असून तो रोखणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

    लावरोफ म्हणाले होते, "युक्रेनकडे अजूनही सोव्हिएतची न्युक्लियर टेक्नॉलॉजी आहे. म्हणून रशियाला या आव्हानाला विचारपूर्वक उत्तर द्यावं लागेल."

    पूर्वी सोव्हिएत संघामध्ये असेलल्या देशांमध्ये पश्चिमेतल्या देशांनी लष्करी तळ उभारू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला होता. युक्रेनने अण्वस्त्र मिळवण्चाया प्रयत्न केला तर तो रशिया रोखेल असं लावरोफ म्हणाले होते.

    तर आपण रशियातल्या अण्वस्त्रं दलांना सज्ज राहण्याचे आदेश दिले असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. अमेरिकेसह इतर अनेक देशांनी याचा निषेध केला होता.

  4. आणि झेलेन्स्कींच्या भाषणानंतर अख्खं सभागृह उभं राहिलं...

  5. ब्रेकिंग, संघर्षात आजवर 5840 रशियन सैनिकांना ठार केलं - युक्रेनचा दावा

    रशिया - युक्रेन संघर्षादरम्यान आजवर आपण रशियाच्या 5,860 सैनिकांना ठार केल्याचा दावा युक्रेनने केलाय. रशियन सैन्याने हल्ला केल्यापासून आजपर्यंतची ही आकडेवारी असल्याचं युक्रेनच्या लष्कराने म्हटलंय.

    बीबीसीने स्वतंत्रपणे या दाव्याची पडताळणी केलेली नाही. पण युक्रेनवरच्या या हल्ल्यामध्ये रशियन सैन्याचं मोठं नुकसान झालं असल्याचं ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे.

    रशियन सैन्याचं किती नुकसान झालं, याचा युक्रेनने दिलेला तपशील असा :

    5,840 सैनिक

    30 विमानं

    31 हेलिकॉप्टर

    211 रणगाडे

    862 चिलखती गाड्या

    85 आर्टिलरी सिस्टम्स

    9 अँटी एअरक्राफ्ट सिस्टिम्स

    60 इंधन टँक

    355 लष्करी वाहनं

    40 MLRS रॉकेट लाँचर्स (ताब्यात घेतली)

  6. रशियाविरोधात लढण्यासाठी अमेरिका स्वतःचं सैन्य का पाठवत नाहीये?

    अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनवरील हल्ल्याचं वर्णन 'रशियाची आक्रमकता' असं केलं आहे आणि या हल्ल्याचा निषेधही केला आहे. त्याच वेळी राजनैतिक पातळीवरून या कृत्याचं उत्तर देण्याचा बायडन यांचा प्रयत्न आहे.

    रशियाकडून युक्रेनवर हल्ला होईल, असा इशारा अमेरिका गेले काही आठवडे देतो आहे. हा इशारा अखेरीस खरा ठरला. या सगळ्याचा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर विपरित परिणाम होईल, अशीही चिंता व्यक्त होते आहे.

    दरम्यान, अमेरिकी सैनिकांना या युद्धात सहभागी होण्यासाठी युक्रेनमध्ये पाठवलं जाणार नाही, असं बायडन यांनी स्पष्ट केलं. अमेरिकी नागरिकांना वाचवण्यासाठीसुद्धा युक्रेनमध्ये अमेरिकी सैन्य जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा- रशियाविरोधात लढण्यासाठी अमेरिका स्वतःचं सैन्य का पाठवत नाहीये?

  7. आज सकाळपासून काय काय घडलं?

    नमस्कार,

    बीबीसी मराठीच्या वाचकांचे दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत

    युक्रेन- रशिया युद्धाच्या सातव्या दिवशी आज सकाळपासून काय घडामोडी घडल्या, याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. युक्रेनमधील युद्धक्षेत्रावरुन बीबीसीचे वार्ताहर वार्तांकन करत आहेत. त्याचे सर्व अपडेट्स येथे वाचायला मिळतील. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी अमृता दुर्वे आणि ओंकार करंबेळकर हे अपडेट्स मराठीमध्ये देत आहेत.

    • रशियाच्या विमानांना आता अमेरिकेच्या हवाई हद्दीत प्रवेश करता येणार नाही असा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीर केला.
    • खारकीव्हमध्ये रशियाचे पॅराट्रूपर्स दाखल झाले आहेत. युक्रेनच्या लष्करानेच यासंदर्भात सांगितलं आहे.
    • रशिया आणि बेलारुसच्या स्केटर्सना आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमध्ये प्रवेशाची बंदी घातली आहे.
    • युक्रेनमधून निघालेल्या नागरिकांचं पोलंड आणि हंगेरी या देशांनी स्वागत केलं आहे.
    • रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यासाठी उत्तर कोरियाने अमेरिकेला जबाबदार धरलं आहे.
    • रशियावर कोणत्याही स्वरुपाचे प्रतिबंध लादण्यास मेक्सिकोने नकार दिला आहे.

    युक्रेन युद्धासंदर्भातील सर्व बातम्या, व्हीडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा- युक्रेन-रशिया संघर्ष

  8. खेरसन शहरावर कब्जा केल्याचा रशियाचा दावा

    युक्रेनमधल्या खेरसन शहरावर कब्जा केल्याचा दावा रशियाने केला आहे. शहराच्या विविध भागात रशियाच्या फौजा दिसून आल्या. खेरसन रेल्वे स्टेशन तसंच बंदरावर रशियाच्या सैनिकांनी कब्जा केल्याचं शहराच्या महापौरांनी सांगितलं.

    युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा हा सातवा दिवस आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. राजधानी कीव्ह शहर युक्रेनने आपल्याकडे राखलं आहे.

    रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चेची फेरी बेलारुस इथे पार पडली. मात्र या बैठकीचं काहीच फलित निघालं नाही. रशियाने हल्ले रोखण्यासाठी ज्या अटी ठेवल्या त्या मान्य करायला युक्रेनचे राष्ट्राध्य व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी नकार दिला.

    यानंतर रशियाने युक्रेनवरील हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे. युक्रेनमधलं दुसरं मोठं शहर खारकीव्हमध्ये क्षेपणास्त्र दागण्यात आली आहेत.

  9. ब्रेकिंग, खारकीव्ह शहरात पोलिसांच्या इमारतीवर हल्ला

    रशियाच्या हल्ल्यांनी खारकीव्ह शहरातील पोलिसांच्या इमारतीला लक्ष्य केलं. टेलिग्रामवर आलेल्या व्हीडिओत युक्रेन सरकारचा सल्लागार धुराच्या लोळांमध्ये पडझड झालेली इमारत दाखवताना दिसतो आहे.

    याच भागात असलेल्या कराझिन नॅशनल युनिव्हर्सिटीलाही लक्ष्य करण्यात आलं.अँटॉन गेराश्नेको हे युक्रेन सरकारचे सल्लागार आहेत.

    बीबीसीने स्वतंत्रपणे या व्हीडिओच्या सत्यासत्यतेची शहानिशा करू शकलेलं नाही.

  10. खारकीव्हमध्ये गोळीबारात 21जणांचा मृत्यू

    रशियाने लक्ष्य केलेल्या खारकीव्ह शहरात गोळीबारात 21जणांचा मृत्यू झाला आहे तर 112 जण जखमी झाले आहेत.

    रशियाच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युतर देण्यात आलं आहे आणि सातत्याने लक्ष्यस्थानी असूनही आम्ही रशियाच्या फौजांना चोख टक्कर दिली आहे असं खारकीव्ह प्रादेशिक प्रशासनाने सांगितलं.

  11. रशियावर प्रतिबंध घालण्यास मेक्सिकोचा नकार

    युक्रेनविरुद्ध युद्ध केल्याप्रकरणी रशियावर कोणत्याही स्वरुपाचे प्रतिबंध लादण्यास मेक्सिकोने नकार दिला आहे. मेक्सिकोच राष्ट्राध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी सोशल मीडिया कंपन्यांवर टीका केली. रशियाच्या सरकारी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी केल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला.

    "जगातल्या विविध देशांशी चांगले संबंध राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही रशियावर कोणत्याही स्वरुपाचे निर्बंध लादणार नाही", असं लोपेझ यांनी सांगितलं.

    लोपेझ यांनी याआधी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली होती. अमेरिका आणि मेक्सिको यांचे संबंध चांगले असतानाही त्यांनी टीका केली होती. रशियाशी मेक्सिकोचे संबंध दृढ स्वरुपाचे नाहीत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मंगळवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली.

  12. भारतीय विद्यार्थ्यांच्या युक्रेनवारीची कारणं समजून घेऊया

  13. रशिया-युक्रेन युद्धाला अमेरिका जबाबदार- उत्तर कोरिया

    रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यासाठी उत्तर कोरियाने अमेरिकेला जबाबदार धरलं आहे. वॉशिंग्टनची म्हणजेच पर्यायाने अमेरिकेचं अधिपत्य गाजवण्याचं धोरण दुसऱ्या देशांनाही धोकादायक आहे असं उत्तर कोरियाने म्हटलं आहे.

    दक्षिण कोरियाच्या योनहाप या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान आपात्कालीन सत्रावेळी किम साँग बोलत होते.

    ते म्हणाले,अमेरिका आणि पश्चिमेकडील देशांनी रशियाच्या सुरक्षेच्या मागणीची अवहेलना केली. नेटो संघटनेचा पूर्वेत विस्तार व्हावा यासाठी शस्त्रास्त्रं प्रणाली लागू करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून युरोपचं सुरक्षित वातावरण कमकुवत करण्याचा डाव आहे.

    याआधी 28 फेब्रुवारीला उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेची अधिपत्य गाजवण्याची वृत्ती रशिया-युक्रेन वादाला कारणीभूत आहे असा दावा केला होता.

    संयुक्त राष्ट्रांच्या सभेत दक्षिण कोरियाचे दूत चो ह्युन यांनी युक्रेनविरुद्धचं युद्ध रशियाने स्वत: लादलेलं आहे अशी भूमिका घेतली.

  14. युक्रेन युद्धातून हे मराठी कुटुंब कसं बाहेर पडलं?

  15. पोलंड, हंगेरीने खुल्या मनाने केलं निर्वासितांचं स्वागत

    युद्धामुळे जीव वाचवण्यासाठी युक्रेनमधून निघालेल्या नागरिकांचं पोलंड आणि हंगेरी या देशांनी स्वागत केलं आहे.

    युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनचे लाखभर नागरिक हंगेरीत दाखल झाले आहेत.

    रस्ते मार्गाने दाखल झालेल्या या नागरिकांची तात्पुरती व्यवस्था शाळा, महाविद्यालयं तसंच क्रीडा संकुलांमध्ये करण्यात आली आहे.

    बस, मिनीबस, छोट्या गाड्यांद्वारे त्यांना गंतव्यस्थळी पोहोचवण्यात येत आहे. स्वयंसेवक आणि भाषांतरकार या नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेत आहेत.

    संयुक्त राष्ट्र संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार युक्रेन सोडणाऱ्या लोकांमध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे. रशियाने युद्ध पुकारल्यानंतर आतापर्यंत युक्रेनच्या 6,60,000 नागरिकांनी देश सोडला आहे.

  16. रशिया-बेलारुसच्या स्केटर्सना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बंदी

    युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे रशिया आणि बेलारुसच्या स्केटर्सना आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमध्ये प्रवेशाची बंदी घातली. आंतरराष्ट्रीय स्केटिंग युनियनने यासंदर्भात घोषणा केली.

    काही दिवसांपूर्वी फिफा आणि युएफाने रशियावर बंदी घातली होती.

    युक्रेनमध्ये युद्धाचा फटका बसलेल्या प्रत्येक नागरिकाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असं आंतरराष्ट्रीय स्केटिंग युनियनने म्हटलं आहे.

    येत्या महिनाभरात जागतिक स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा होत आहे.

    स्केटिंग या खेळात रशिया अव्वल देश आहे. बीजिंग 2022 विंटर ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाने स्केटिंग खेळाच पाच पदकांची कमाई केली होती.

  17. मराठी मुलं युक्रेन-रशियामध्ये या चार कारणांसाठी जातात

  18. युक्रेनची राजधानी कीव्हवर हल्ला, शहर सोडण्यासाठी झुंबड

  19. युक्रेनमध्ये नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा 'या' कारणाने झाला मृत्यू

  20. ब्रेकिंग, खारकीव्हमध्ये रशियाचे पॅराट्रूपर्स दाखल

    युक्रेनमधलं दुसरं मोठं शहर असलेल्या खारकीव्हमध्ये रशियाचे पॅराट्रूपर्स दाखल झाले आहेत. युक्रेनच्या लष्करानेच यासंदर्भात सांगितलं आहे.

    रशियाने हवाई हल्ले सुरू केले आणि खारकीव्ह आणि आजूबाजूच्या प्रदेशात सायरनचा आवाज घुमू लागला.

    रशियाच्या फौजांनी प्रादेशिक लष्करी रुग्णालयावर हल्ला केला. त्याठिकाणी अजूनही संघर्ष सुरू आहे.

    युक्रेनमधल्या धूमश्चक्रीचं खारकीव्ह केंद्र झालं आहे.

    मंगळवारी एका क्षेपणास्त्राने खारकीव्ह शहरातल्या सरकारी इमारतीला लक्ष्य केलं होतं. क्षेपणास्त्र आदळल्यानंतर आगीच्या, धुराच्या लोळांनी आसमंत व्यापून गेला.

    यानंतर थोड्या वेळात खारकीव्हच्या निवासी भागातही क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. मंगळवारी खारकीव्ह शहरात झालेल्या हल्ल्यांमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर दोन डझनहून अधिकजण जखमी झाले.