You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
KK: 'तडप तडप के' सारख्या असंख्य प्रसिद्ध गाण्यांच्या गायकाचा 'अलविदा'
'तडप तडप के इस दिल से आह निकलती रही' आणि 'तू ही मेरी शब है', लाइफ इन मेट्रोतील अलविदा सारख्या प्रसिद्ध गाण्यांचे गायक केके अर्थात कृष्णकुमार कुन्नथ यांचे मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले.
कार्यक्रमावेळीच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
ते 53 वर्षांचे होते. रुग्णालयात भेटीसाठी पोहोचलेले राज्य मंत्री अरुप विश्वास यांनी केके यांच्या मृत्यूबाबत पत्रकारांना माहिती दिली.
ते म्हणाले, "डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे की त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. पण पोस्टमार्टमनंतरच खरे कारण समजू शकते. कार्यालयातून घरी परतल्यावर मला त्यांच्या प्रकृतीबद्दल समजले आणि मी तात्काळ रुग्णालयात आलो पण इथे आल्यावर त्यांच्या मृत्यूबाबतच समजले."
केकेंनी तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटातमध्ये देखील पार्श्वगायन केले आहे. कोलकात्यातील गुरुदास कॉलेजमध्ये आयोजित झालेल्या कार्यक्रमात ते गाणे म्हणत असतानाच त्यांची प्रकृती अचानकपणे खालवली.
हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील तडप तडप के हे गीत अतिशय प्रसिद्ध झाले होते. लाइफ इन मेट्रोमधील गाणी, बचना ये हसीनो मधील खुदा जाने के इत्यादी अनेक गाणी लोकांच्या ओठावर होती.
केकेंच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. "केकेंची नाळ प्रत्येक वयोगटातील लोकांशी जोडली गेलेली होती. त्यांच्या गाण्यात वैविध्य होते. त्यांच्या आठवणी त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून सदैव आपल्यासोबत राहतील," असे मोदींनी म्हटले आहे.
90's च्या मुला-मुलींचा आवडता गायक
नव्वदच्या दशकात वाढलेल्या प्रत्येक मुला-मुलींनी 'हम रहे या ना रहे कल कल.... याद आयेंगे ये पल.... पल ये है प्यार के पल...' हे गाणं ऐकलं होतं. कुठल्याही फेअरवेलला तर हे गाणं हमखास असायचं.
प्रेमाची गोष्ट असो किंवा मैत्रीची- आयुष्यातल्या अमूल्य अशा या गोष्टी गाण्याच्या माध्यमातून दाखवण्याचं काम केके यांनी केलं. त्यांची गाणं प्रेमाचं/मैत्रीचं जणू राष्ट्रगीतच झालं. उदाहरणार्थ हे गाणं... यारों दोस्ती बडी ही हसीन है....
1999 मध्ये आलेल्या पल नावाच्या अल्बमच्या माध्यमातून केके नावाच्या गायकाची ओळख आपल्याला झाली. कृष्णकुमार कुन्नथ अर्थात केके यांनी या गाण्याआधी हजारो जिंगल्स गायल्या होत्या. याद आयेंगे पल या गाण्याने त्यांनी थेट चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवलं. स्निग्ध आवाजाने त्यांनी शब्दांना वेगळाच आयाम दिला. तडप तडप के इस दिल से आह निकलती रही या गाण्याने त्यांनी प्रेमभंग झालेल्या मंडळींच्या दु:खाला वाचा फोडली.
केके अशा गाण्यांद्वारे चित्रपट संगीतात आले. कधी त्यांच्या आवाज शाहरुख-दीपिकाचं (आँखो में तेरी अजब सी गजब सी अदाएँ है) प्रेमगीत झालं. कधी रणवीरच्या प्रेमाच्या आणाभाका (सजदे में यूँ ही झुकता हूँ, तुम पे आके रुकता है), प्रेमातलं अल्लडपण (दस बहाने करके के ले गई दिल) तर कधी तडप तडप.
संगीतकार, खव्वयै, निसर्गप्रेमी, पर्यटक असं बरंच काही होते. आपली ओळख अशी सांगायचे. दिल्लीत लहानाचे मोठे झालेल्या केके यांना सुरुवातीपासूनच संगीताची आवड होती. संगीताचं औपचारिक शिक्षण घेतलं नाही पण सुरांतालाचं अद्भुत ज्ञान त्यांना होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)