जगातील सर्वात सुरक्षित आणि शांततापूर्ण देश, 'असं' आहे तिथलं जीवन, जाणून घ्या कारणं

    • Author, लिंडसे गॅलोवे
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

सध्याचा काळ हा दुसऱ्या महायुद्धानंतरचा जगात सर्वाधिक सक्रिय संघर्ष सुरू असण्याचा काळ आहे. आईसलँड, न्यूझीलंड आणि इतर ठिकाणचे रहिवासी त्यांचे देश अतिशय शांततापूर्ण का आहेत, यामागची कारणं, वैशिष्ट्यं सांगतात.

ग्लोबल पीस इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जग अधिक संघर्षमय, कमी शांततापूर्ण बनलं आहे. जगातील 99 देशांमधील एकंदरीत शांततेच्या वातावरणात घसरण झाली आहे.

जागतिक पातळीवर शांततेत घसरण होणारं हे सलग 12 वं वर्ष आहे. या वाईट परिस्थितीतदेखील काही थोडे देश मात्र याला अपवाद ठरले आहेत, वेगळे ठरले आहेत.

"शांततेच्या संदर्भात इतकी प्रचंड, वाईट घसरण होऊनदेखील या निर्देशांकात वरच्या स्थानावर असलेल्या देशांवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही," असं स्टीव्ह किलेला म्हणाले. ते इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष आहेत. याच संस्थेनं 2007 मध्ये हा निर्देशांक तयार केला होता.

हा निर्देशांक 23 निकषांच्या आधारे 163 देशांची क्रमवारी ठरवतो. या निकषांमध्ये लष्कर किंवा संरक्षणावर होणारा खर्च आणि सुरू असलेले संघर्ष ते हत्यांचं प्रमाण आणि सुरक्षिततेची जाणीव या मुद्द्यांचा समावेश असतो.

ज्या देशांना या निर्देशांकात वरचं स्थान मिळतं, त्या देशांमध्ये पुढील काही गोष्टींचं मिश्रण किंवा संगम पाहायला मिळतं. ते म्हणजे तिथे सहसा हिंसाचाराचं प्रमाण कमी असतं, तिथल्या संस्था-यंत्रणा कार्यक्षम असतात, तिथे सामाजिक विश्वास वरच्या पातळीवरचा असतो, तिथे शेजारी देशांबरोबर चांगले संबंध असतात आणि जीवनमानाचा दर्जा उच्च असतो.

दैनंदिन आयुष्यात ही सुरक्षितता कशी अनुभवता येते, ती कशामुळे टिकवली जाते आणि प्रवासी-पर्यटकांना तिथल्या शांतता आणि स्थैर्याचा देखील अनुभव कशाप्रकारे घेता येईल, हे जाणून घेण्यासाठी आम्ही जगातील 5 सर्वात सुरक्षित देशांमधील रहिवाशांशी संवाद साधला.

1. आईसलँड

हा देश 2008 पासून या निर्देशांकात अव्वल स्थानावर आहे. सलग 19 व्या वर्षी तो जगातील सर्वात सुरक्षित देश ठरला आहे. तसंच 2026 मध्ये या देशाच्या स्थितीत 2 टक्क्यांची सुधारणा झाली आहे. हिंसक आंदोलनात मोठी घट झाल्यामुळे ही सुधारणा झाली आहे. सुरक्षितता, कमी प्रमाणातील संघर्ष आणि मर्यादित लष्करीकरण (म्हणजे लष्करी बाबींवरील कमी खर्च) यामुळे या क्रमवारीत आईसलँड हा देश जगात वरच्या स्थानावर आहे.

"आमच्या अवतीभोवती असणाऱ्या निसर्गात आर्यलंडमध्ये सर्वत्र शांतता आहे. मात्र ती एकमेकांशी अतिशय घनिष्ठपणे जोडल्या गेलेल्या समुदायांमध्ये रुजलेली एक जाणीवपूर्वक केलेली निवड आहे," असं ओडनी अर्नार्सडॉटिर म्हणाल्या. त्या व्हिजिट आईसलँडच्या प्रमुख आहेत.

त्या यासंदर्भात समानतेसाठीच्या मोठ्या कटिबद्धतेला याचं श्रेय देतात. त्याचबरोबर चांगल्या सार्वजनिक सेवा आणि व्यापक स्वरुपातील अपारंपारिक ऊर्जा यांचा समावेश आहे. समानतेच्या बाबतीत स्त्री पुरुष किंवा लिंगाधारित समानतेचाही समावेश आहे. यात आईसलँड जगात सातत्यानं आघाडीवर असतो.

ही कटिबद्धता फक्त धोरणांपुरती नाही. तर रहिवाशांमध्ये असलेली सामाजिक एकसंधता आणि सामायिक जबाबदारीची तीव्र भावना याचीही त्यात भूमिका आहे.

"या प्रकारची शांतता अनुभवता येणं हे किती सुदैवाची गोष्ट आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. यातून एक मुक्त आणि सर्वसमावेशक समाज टिकवून ठेवण्याचं महत्त्व अधोरेखित होतं," असं अर्नार्सडॉटिर म्हणाल्या.

या देशाचं भौगोलिक स्थान, दुर्गमपणाची यात महत्त्वाची भूमिका आहे. "आईसलँड भौगोलिकदृष्ट्या बाजूला आहे. त्यामुळे जागतिक संघर्ष, तणावांचा त्याच्यावर कमी परिणाम होतो. इथली विस्तीर्ण मोकळा प्रदेश, निसर्ग, भव्य पर्वत, स्वच्छ हवा आणि विपुल प्रमाणात उपलब्ध असलेलं शुद्ध पाणी या गोष्टींचा इथल्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यात महत्त्वाची भूमिका आहे," असं इरुन अनिता गिल्फाडॉटिर म्हणाल्या. त्या हॉटेल रंगाच्या मार्केटिंग मॅनेजर आहेत.

आईसलँडमधील शांत जीवनाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटन स्थळंवर धावपळ करण्याऐवजी शांतपणे बाहेर, मोकळ्या वातावरणात वेळ घालवण्याची शिफारस अर्नार्सडॉटिर करतात.

तिथल्या स्नान संस्कृतीचा अनुभव घेणं हे या यादीत वरच्या स्थानावर असलं पाहिजे. आईसलँडमध्ये 120 हून भू-औष्णिक तलाव (जिओथर्मल पूल) आहेत. त्यात लक्झरी स्पापासून ते स्थानिक स्विमिंग पूलपर्यंतचा समावेश आहे. तिथे लोक वर्षभर एकत्र येतात.

"आईसलँडच्या शांततेचा अनुभव घेण्याचा सर्व प्रकारच्या आरोग्य, आनंदाशी अतिशय जवळचा संबंध आहे. मग ते भू-औष्णिक स्थान संस्कृतीद्वारे असो की निसर्गात घालवलेल्या वेळेतून असो की जगापासून दूर स्वत:साठी शांत वेळ काढण्यातून असो," असं अर्नार्सडॉटिर म्हणाल्या.

पर्यटकांनीदेखील देशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळांपलीकडे इतर ठिकाणी भेट दिली पाहिजे. अर्नार्सडॉटिर आईसलँडभर असलेल्या 220 अधिक संग्रहालयांचा उल्लेख करतात. यात 'नॅशनल म्युझियम' आणि वेस्टजॉर्ड्समधील 'आईसलँडिक सी मॉन्स्टर म्युझियम'चा समावेश आहे.

"मला आमची वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालयं खूप आवडतात. या ठिकाणांमधून स्थानिक कहाण्या आणि परंपरांची माहिती मिळते. तसंच लोकांना अधिक प्रवास करण्यास आणि आईसलँडच्या वेगवेगळ्या भागांचा अनुभव घेण्यास प्रोत्साहन देतात," असं त्या म्हणाल्या.

2. न्यूझीलंड

न्यूझीलंड हा देश दुसऱ्या क्रमांकावर (2025मधील तिसऱ्या स्थानावरून झालेली सुधारणा) आहे. हा आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वात सुरक्षित देश आहे.

या प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाच्या बाबतीत तर त्याचा सहभाग सर्वात कमी आहे. ही सुधारणा मुख्यत: शस्त्रास्त्रांच्या आयातीत झालेल्या घसरणीमुळे झाली आहे. हा जगातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात कमी लष्करीकरण (लष्करावर कमी खर्च करणारा) झालेल्या देशांपैकी एक आहे.

न्यूझीलंडमधील शांततेचं बरचंसं श्रेय त्याच्या भौगोलिक स्थानाला जातं. "सर्व ठिकाणांहून इतकं दूर असल्यामुळे इतर देशांना संघर्षात ओढणाऱ्या भू-राजकीय गोंधळ, तणावापासून न्यूझीलंड मोठ्या प्रमाणात लांब राहिलं आहे," असं वॉर्विक वूडली म्हणाले. ते न्यूझीलंडचे नागरिक आहेत. तसंच एनझेड गोल्डन व्हिसाचे संस्थापक आहेत.

मात्र त्यांना या शांततेच्या बाबतीत इथल्या संस्कृतीमध्ये देखील काहीतरी विशेष दिसतं. इथले लोक सहसा निवांत आणि सरळ स्वभावाचे असतात.

"सर्वसाधारणपणे विनाकारण वाद किंवा भांडण करण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यात त्यांना अधिक रस असतो," असं ते म्हणाले.

इथे सुरक्षिततेची स्थिती इतकी सामान्य बाब आहे की त्याकडे सहसा कोणाचं लक्ष जात नाही. "बहुतांश लोक त्याबद्दल फारसा विचार करत नाहीत.

सामान्यपणे सुरक्षितता ही इथे चिंतेची बाब नाही, याचं हे सर्वात मोठं चिन्हं आहे. इथे दैनंदिन आयुष्यात बंदुकांचा वापर होत नाही आणि क्राइस्टचर्चच्या घटनेनंतर तर कायदे अधिकच कडक करण्यात आले आहेत," असं वूडली म्हणाले.

ते पुढे म्हणाले की इथे आजही शेजारपाजार जपला जातो. लोक इथे एकमेकांना ओळखतात आणि एकमेकांची काळजी घेतली जाते.

"पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या देशात जिथे अज्ञात, अनोळखी राहणं कठीण असतं तिथे अशा प्रकारची जबाबदारीची भावना खूप महत्त्वाची ठरते," असं ते पुढे म्हणाले.

विरळ लोकसंख्या असल्यामुळे इथे निसर्गाचा सहवासदेखील सहजपणे मिळतो. "तुम्ही कुठे आहात त्यानुसार डोंगर, समुद्रकिनारे आणि निसर्गभ्रमण या सर्व गोष्टी जवळच असतात. काही मोठ्या आणि धावपळ असणाऱ्या, व्यग्र जीवनशैली असणाऱ्या देशांप्रमाणे इथं आयुष्य आपल्या हातातून सतत निसटतं आहे असं वाटत नाही," असं वूडली म्हणाले.

3. स्वित्झर्लंड

हा देश गेल्या वर्षी 5 व्या क्रमांकावर होता. तो 2026 मध्ये तिसऱ्या स्थानवर आला आहे. स्वित्झर्लंडमध्ये गुन्हेगारीचा दर कमी आहे आणि लष्करी बाबतीत या देशाचं दीर्घकालापासून तटस्थतेचं धोरण आहे. त्यामुळे तो जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक राहिला आहे.

"इथे लोक एकमेकांना सामावून घेतात. त्यामुळे परस्पर विश्वासाची भावना निर्माण होते. यातून एक विश्वास तयार होतो की लोक सर्वसाधारणपणे योग्य तेच करतील आणि दैनंदिन आयुष्य बहुतांशप्रमाणात अपेक्षेनुसारच चालतं," असं कॉर्नेलिया चो म्हणाल्या. त्या कार्यकारी प्रशिक्षक आणि लेखक असून जिनिव्हात राहतात.

हा विश्वास अनेकदा दैनंदिन व्यवहारांमधून दिसून येतो. चो यांना आठवतं की स्वित्झर्लंडमध्ये दोन वेळा त्यांचं पाकीट हरवलं होतं.

पहिल्यांदा, एका अनोळखी व्यक्तीनं काही दिवसांतच ते पोस्टानं परत पाठवलं होतं. त्यातील रोख रक्कमदेखील तशीच होती. त्यानंतर काही वर्षांनी रेल्वे स्टेशनवर त्यांचं क्रेडिट कार्ड पडलं. त्यानंतर ज्या व्यक्तीला ते सापडलं त्यानं त्यांच्या बँकेशी थेट संपर्क केला आणि ते कार्ड रद्द केलं. त्या कार्डचा वापर करून फ्रॉड होऊ नये यासाठी त्यानं तसं केलं होतं.

"या छोट्या घटना आहेत. तरीदेखील त्यांची मनावर खोलवर छाप पडते. त्यातून सुरक्षिततेची जी भावना निर्माण होते, ती अमूल्य आहे," असं त्या म्हणाल्या.

इथल्या शांततेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी स्वित्झर्लंडच्या जबरदस्त वर्क-लाईफ बॅलन्स म्हणजे काम आणि जीवन यामधील समतोलाबद्दल जाणून घेतलं पाहिजे.

उदाहरणार्थ, अनेक व्यवसाय दुपारी दोन तास बंद असतात. या देशात चार अधिकृत भाषा आहेत. तसंच तिथे प्रदेशांची वैशिष्ट्यांची ओळख आहे. या गोष्टींदेखील कौतुकास्पद आहेत.

"अधिक मजबूत होण्यासाठी समाजातील सर्वच गोष्टींवर एकमत होण्याची आवश्यकता नसते. इथे तडजोड करण्यावर आणि व्यवहारी मार्ग काढण्यावर भर दिला जातो, हे मी पाहिलं आहे. यामुळे लोकांना एकत्रितपणे पुढील वाटचाल करणं शक्य होतं.

कदाचित शांतता म्हणजे शेवटी हेच असतं. मतभेदांची अनुपस्थिती नाही, तर त्यांच्यासोबत चांगलं आयुष्य जगण्याचे मार्ग शोधण्याची सामायिक कटिबद्धता," असं कॉर्नेलिया चो म्हणाल्या.

4. स्लोव्हेनिया

या निर्देशांकात स्लोव्हेनियानं पहिल्या पाच देशांमध्ये पहिल्यांदाच स्थान मिळवलं आहे.

लष्करी सिद्धतेवर कमी खर्च करणं आणि उच्च पातळीवरील सुरक्षितता आणि सुरक्षा ही या निर्देशांकात वरचं स्थान मिळवण्यामागची प्रमुख कारणं आहेत.

"स्लोव्हेनियातील लोक समुदायाला खूप महत्त्व देतात. ते निसर्गाच्या सान्निध्यात बराच वेळ घालवतात. त्यामुळे आमच्यामध्ये एकप्रकारची शांतता आणि स्थैर्य निर्माण होतं, असं मला वाटतं," असं जेर्नेजा झ्वर म्हणतात. त्या ल्युब्लियानामध्ये राहतात आणि इंट्रेपिड ट्रॅव्हेलसाठी पूर्व युरोपातील कामकाज पाहतात.

जेर्नेजा झ्वर म्हणतात की त्या त्यांचे बहुतांश वीकेंड बाहेर, हायकिंग, सायकलिंग, स्कीईंग करण्यात किंवा मित्रमंडळी आणि कुटुंबाबरोबर एकत्र जमून घालवतात.

काम आणि जीवन जगणं यांच्यातील संतुलनावर प्रचंड सांस्कृतिक भर असल्यामुळे आपलेपणाची भावना वाढवणाऱ्या नातेसंबंधांसाठी अधिक वाव मिळतो, असं त्या पुढे म्हणाल्या.

"सध्या जगाच्या अनेक भागात संघर्ष आणि अस्थिरतेचा परिणाम होत असताना स्लोव्हेनिया हे माझं घर आहे ही मला मोठी भाग्याची गोष्ट वाटते," असं झ्वर म्हणाल्या.

"मी माझ्या दैनंदिन आयुष्यात सुरक्षितपणे आणि कोणत्याही भीतीशिवाय जगू शकत असल्याची जाणीव असल्यामुळे पूर्वी ज्या गोष्टी कदाचित मी गृहित धरल्या असत्या त्या छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्वं आता मला जाणवतं," असं झ्वर पुढे म्हणाल्या.

या देशात असलेल्या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी, त्याची कदर करण्यासाठी झ्वर ल्युल्बियानामध्ये वीकेंडच्या सहलीपेक्षा अधिक वेळ घालवण्यास सुचवतात. "इथे या आणि एक आठवडाभर राहा," असं त्या म्हणतात.

यामध्ये सोका नदीवर व्हाईटवॉटर राफ्टिंग करणं, ब्लेडजवळ विंटगर गॉर्ज धबधब्यांना भेट देणं किंवा देशातील डोंगराळ कुरणांमधून सायकलिंग करणं यांचा समावेश असू शकतो.

"स्लोव्हेनियामध्ये तुम्ही काहीही करा, इथल्या लोकांच्या उत्तम आदरातिथ्यानं, आश्चर्यकारक नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या प्रदेशानं, निसर्गानं आणि अर्थातच इथल्या अप्रतिम जेवणामुळे तुम्ही नक्कीच थक्क व्हाल," असं झ्वर म्हणाल्या.

5. आयर्लंड

या निर्देशांकात आयर्लंड 5 व्या क्रमांकावर आहे. इथे असलेलं हिंसचाराचं कमी प्रमाण आणि आंतरराष्ट्री संघर्षांमधील मर्यादित सहभाग यामुळे या क्रमवारीत आयर्लंडचं स्थान वरचं आहे.

हा देश अस्थिर, अशांत भूतकाळानं घडलेला आहे. त्यामुळे इथे सुरक्षितेतची भावना गृहित धरली जात नाही. "एक राष्ट्र म्हणून आयर्लंडचा जो ऐतिहासिक अनुभव आहे, त्यामुळे इथल्या लोकांना पूर्वग्रहांचे, मतभेदांचे धोके आणि इतरांबद्दल उदार आणि स्वागतशील असण्याचं महत्त्व याची अतिशय तीव्रतेनं जाणीव आहे," असं डीडी रोनन म्हणाल्या. त्या वेस्ट कॉर्कमधील नेटिव्ह या पुनरुत्पादक हॉटेलच्या संस्थापिका आहेत.

या आदरातिथ्याच्या संस्कृतीचा उगम ब्रेहन कायद्यांमध्ये (आयर्लंडमधील प्राचीन कायदे व्यवस्था) असल्याचं रोनन यांना वाटतं. पहिल्या सहस्रकातील बराच काळ आयर्लंडमध्ये हे कायदे होते. यात अनोळखी लोकांसाठी आणि पर्यटक-प्रवाशांसाठी अन्न आणि निवारा बंधनकारक केला होता. "हे आमच्या रक्तातच आहे," असं त्या म्हणाल्या.

आयर्लंड तटस्थ देश आहे. त्याच्या या परंपरेमुळे शांततेच्या या भावनेला एक आंतरराष्ट्रीय परिणाम प्राप्त होतं. कारण हा देश परदेशातील युद्धं किंवा लष्करी आघाड्यांमध्ये सहभागी होत नाही. "जागतिक अस्थैर्य आणि अनिश्चिततेच्या काळात, अटलांटिक महासागरातील एका दूरवरच्या बेटावर, जिथे उत्तम संगीत, फेरफटका-भटकंती करण्याची सोय आणि पुस्तकांचा सहवास आहे अशा ठिकाणी असणं अतिशय सुखकारक, दिलासा देणारं असतं," असं रोनन म्हणाल्या.

"आमच्या देशानं भूतकाळात ज्या दु:खाला, अडचणींचा अनुभव घेतला आहे, त्याच प्रकारच्या प्रचंड दु:ख, यातना आणि अन्यायाला आज जगभरात अनेक लोक सामोरं जात आहेत. त्यामुळे आम्हाला या विशेषाधिकारांची, त्याच्या फायद्यांची जाणीव आहे," असं रोनन म्हणतात.

पर्यटकांसाठी आयर्लंडच्या शांततामय जीवनाचा अनुभव घेण्याचा सर्वात वेगवान मार्ग निसर्गाच्या सान्निध्यातून जातो. मग तो जंगलातून मारलेला फेरफटक असो की समुद्रकिनाऱ्यावरील साहसी सफर, भटकंती असो. रोनन यासंदर्भात केप क्लिअर बेटावर फेरीनं जाण्यास, थ्री कॅसल हेडचे मध्ययुगीन काळातील अवशेष पाहण्यास किंवा ग्लँडोरजवळ ड्रोमबेग स्टोन सर्कलला भेट देण्यास सुचवतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.