You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केके'चा मृत्यू: कॉलेज लाईफ सुंदर करणारा गायक हरपला - ब्लॉग
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
केके गेला.. किती वाईट यार.. कसला भारी होता तो. आमच्या पिढीचं कॉलेज लाईफ सुंदर करण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. प्रत्येक मूडला साथ द्यायला त्याची गाणी असायची. कुठेही कधीही.. कितीही वेळा ऐका त्याची गाणी कधी जुनी झाली नाही. आमच्या पिढीत जेव्हा मोबाईल नवीन होता तेव्हा कॉम्प्युटरवर त्याच्या नावाचं एक फोल्डर असायचं.
मंद आवाजात त्याचे गाणे लावायचे. काय ते सुख होतं. त्यानंतर स्मार्टफोन, लॅपटॉप, कार, रेडिओ, सगळीकडे त्याचे गाणे ऐकायची मजाच वेगळी होती.
आवाज तो काय वर्णावा. 'तडप तडप के इस दिल से आह निकलती रही' या गाण्यात ती 'लुट गये हां लूट गये' ची जागा आली की सगळं उद्धवस्त झाल्यासारखं वाटायचं. 'क्या मुझे प्यार है?' गाणं ऐकलं की तात्काळ प्रेमात पडण्याची इच्छा व्हायची. 'दर्द मे भी ये लब मुस्कुराते है' गाणं तर मी कधीच उजेडात ऐकलं नाही.
रातकिड्यांच्या आवाजात गुडूप अंधारात ते गाणं ऐकलं की आजही अंगावर काटा येतो. हायवे झपाझप जाताना 'जिंदगी दो पल की' हे गाणं कंपल्सरीच वाटतं मला.
- हा मुघल बादशहा महिलांची रेशमी वस्त्रं परिधान करून दरबारात जायचा...
- बडे गुलाम अली खाँ यांनी जेव्हा लता मंगेशकरांबद्दल म्हटलं होतं, 'कम्बख्त कभी बेसुरी ही नहीं हुई'
- जेव्हा पंडित शिवकुमार शर्मांनी पंडित भीमसेन जोशींना एकाच बैठकीत संतूर शिकवलं होतं...
- 'तडप तडप के' सारख्या असंख्य प्रसिद्ध गाण्यांचे गायक केकेंचे निधन
इम्रान हाश्मीला आवाज द्यावा तर केके नेच.. ' तुही मेरी शब है सुबह है' वगैरे कसले गाणे होते. कॉलेजच्या फेअरवेल मध्ये सगळी मस्ती झाल्यावर एका निवांत क्षणी एखादा कार्यकर्ता 'याद आएंगे ये पल' गाणं म्हणायला सुरुवात करायचा, किंवा फोटोचा कोलाज करून मागे हे गाणं लावायचे. थोड्याच वेळात वातावरण बदलून डोळ्यातून गंगा यमुना वाहायला लागायच्या.
कॉलेज सोडून कितीही वर्षं झाली तरी हे गाणं ऐकल्यावर पोटात खड्डा न पडलेला शोधून सापडणार नाही. गंमत म्हणजे केके कधीच दिसला नाही. कित्येक वर्षं त्याचा चेहराच माहिती नव्हता. खरंतर तशी गरज नव्हती. त्याचा आवाजच इतका दैवी होता की बाकी कशाची गरजच नव्हती.
आता हे लिहिता लिहिता बॅकग्राऊँडला 'तु जो मिला हो गया मै काबिल' हे गाणं चालू आहे. बरं मृत्यू यावा तर काय.. कॉन्सर्ट झाल्यावर...आपल्या आवाजाने निरंतर आनंद देणाऱ्या केकेच्या आयुष्याची अशी भैरवी व्हायला नको होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)