You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसी आणि जिओची पार्टनरशिप, आता प्रेक्षकांना संपूर्ण भारतभर पाहता येणार बीबीसीचा विश्वसनीय कंटेट
बीबीसीने जिओ टीव्ही आणि जिओ टीव्ही प्लसची मालकी असलेल्या जिओ मीडिया लिमिटेड कंपनीसोबत करार केला आहे.
बीबीसी आणि जिओ मीडिया लिमिटेडने या कराराला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता बीबीसी न्यूज मराठी, बीबीसी न्यूज हिंदी आणि बीबीसी न्यूज गुजराती जिओ टीव्ही आणि मोबाईल ॲप्सवर पाहता येतील.
यामुळे प्रेक्षकांना जिओच्या डिजिटल स्ट्रीम आणि फास्ट चॅनल्सद्वारे (मोफत जाहिरातयुक्त स्ट्रीमिंग टीव्ही) बीबीसीचे कार्यक्रम पाहता आणि ऐकता येतील.
यामुळे संपूर्ण भारतातील लोकांना बीबीसीची पत्रकारिता आणि इतर कंटेंट पाहण्याचा एक नवा मार्ग मिळणार आहे.
स्ट्रीम आणि फास्ट चॅनलवर सोमवार ते शुक्रवार बीबीसी मराठीचे 3 गोष्टी पॉडकास्ट रात्री 8 वाजता लाईव्ह पाहायला मिळेल. तसेच, आठवड्याचे सातही दिवस आणि 24 तास बीबीसीचा कंटेट पाहण्यासाठी उपलब्ध असेल.
बीबीसी न्यूज दक्षिण आशियाचे प्रादेशिक संचालक, टिम ऑफर्ड म्हणाले की, "जगात इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात बीबीसी अधिक लोकांपर्यंत पोहोचते. या करारामुळे आमची उपस्थिती आणखी वाढेल आणि भारतातील प्रेक्षकांना सेवा देण्याची आमची क्षमता देखील वाढेल."
"संपूर्ण भारतातील लोकांपर्यंत बीबीसीची स्वतंत्र पत्रकारिता पोहोचवण्यासाठी जिओसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आमच्या अचूक आणि निःपक्षपाती बातम्यांची पोहोच आणखी वाढेल."
बीबीसी हिंदी फास्ट (एफएएसटी) चॅनल 16 मार्च रोजी जिओ टीव्ही आणि जिओ टीव्ही प्लस या दोन्हीवर लाँच झालं आहे.
बीबीसी न्यूज मराठी आणि बीबीसी न्यूज गुजराती सुद्धा लवकरच सुरू होणार आहेत.
या प्रसंगी बोलताना, कलेक्टिव्ह न्यूजरूमच्या सह-संस्थापक आणि मुख्य संपादक रूपा झा म्हणाल्या की, "जिओसोबतच्या आमच्या पार्टनरशीपच्या माध्यमातून, कलेक्टिव्ह न्यूजरूमच्या डिजिटल स्टोरीटेलिंगसोबतच बीबीसीच्या सर्वोत्तम पत्रकारितेला भारतातील व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्याचं आमचं ध्येय आहे."
पुढे त्या म्हणाल्या की, "जनसेवेच्या भावनेने, संपूर्ण भारतातील लोकांपर्यंत विश्वासार्ह, आकर्षक आणि परिणामकारक बातम्या पोहोचवणं, हे आमचं ध्येय आहे."
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस नक्की काय आहे?
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस इंग्रजीसह 43 भाषांमध्ये जगभरात बातम्या आणि चालू घडामोडींची माहिती पुरवते. ही संस्था व्हीडिओ, ऑडिओ आणि ऑनलाईन माध्यमांद्वारे आपल्या सेवा प्रदान करते.
बीबीसी प्रामुख्याने बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या माध्यमातून दर आठवड्याला 45 कोटी 30 लाख लोकांपर्यंत पोहोचते. तसेच, विश्वास, विश्वसनीयता व निष्पक्षता या बाबतीत जगातील प्रेक्षकांनी बीबीसीला आंतरराष्ट्रीय वृत्त माध्यमांमध्ये अग्रस्थान दिलेलं आहे.
कलेक्टिव्ह न्यूजरूमबद्दल...
एप्रिल 2024 पासून, बीबीसीच्या भारतातील बहुतांश कामकाजाचं हस्तांतरण कलेक्टिव्ह न्यूजरूमकडे करण्यात आलं आहे.
ही पूर्णपणे भारतीय मालकीची कंपनी असून, तिची स्थापना बीबीसीच्या माजी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
द कलेक्टिव्ह न्यूजरूम बीबीसीचा कंटेट इंग्रजीसोबतच हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, तामिळ आणि तेलगू या सहा भारतीय भाषांमध्ये तयार करते आणि यूट्यूबवर देखील प्रकाशित करते.
अलीकडेच, बीबीसी बांगला आणि बीबीसी उर्दूसाठी बंगाली आणि उर्दूमध्येही कंटेटची निर्मिती सुरू झाली आहे. 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' हा बीबीसीचा एक प्रमुख उपक्रम आहे. महिला खेळाडू आणि पॅरा-ॲथलीट यांचा गौरव करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर'ची निर्मिती आणि व्यवस्थापन देखील बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमद्वारेच केलं जातं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)