You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यात पुढील 2 दिवस पावसाची स्थिती कशी असेल? हवामानाचा ताजा अंदाज जाणून घ्या
महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रवासाविषयी एक महत्त्वाचा अपडेट आहे. पुढचे चार पाच दिवस तरी मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकण्याची शक्यता नाहीये, असं हवामान विभागाच्या अंदाजावरून स्पष्ट होतंय.
राज्यात सध्याची स्थिती काय आहे आणि तुमच्या जिल्ह्यांतलं हवामान कसं असेल, पाहूयात.
महाराष्ट्रात मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हर्णे आणि सोलापूरमधून जाते आहे.
मान्सून 23 जूनपर्यंत तेलंगाना, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडमध्ये आणखी आगेकूच करेल, असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. पण यात महाराष्ट्राचा उल्लेख नाही. त्यामुळे 23 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात आणखी पुढे सरकण्याची शक्यता दिसत नाही.
देशाच्या पश्चिम किनारी प्रदेशात केवळ केरळच्या आसपास दाट ढग आहेत तर महाराष्ट्रात बहुतांश भागावर विरळ ढगच आहेत.
राज्यात सध्या पश्चिमेकडून वारे वाहतायत, पण ते तुलनेनं कमजोर आहेत आणि त्यात फारसं बाष्पही नाहीये. त्याच वेळी उत्तरेकडून कोरडे वारेही वाहतायत. जिथे हे वारे एकमेकांना धडकतायत, त्या भागात थंडरस्टॉर्म्स तयार होताना दिसतायत.
विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 40 अंशांच्या आसपास आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी 20 जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहू शकते.
पुढचे दोन दिवस किमान तापमानातही मोठी घट दिसत नाही. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
17 जून रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्ण आणि दमट हवामानासाठी यलो अलर्ट आहे. धुळे, नाशिक, सोलापूर, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला या जिल्ह्यांतही उष्णतेसाठी यलो अलर्ट आहे. तर राज्यात बहुतांश ठिकाणी थंडरस्टॉर्म्ससाठी यलो अलर्ट आहे.
18 जून रोजी पालघर, ठाणे, मुंबई, सोलापूर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांत उष्णतेसाठी यलो अलर्ट आहे.
तर रायगड, रत्नागिरी, पुणे, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत थंडरस्टॉर्म्ससाठी यलो अलर्ट दिला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.