You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डे-ड्रिमिंग : जागं असताना सतत कल्पनाविश्वात रमणं ही गंभीर मानसिक समस्या?
- Author, मॉली गोर्मन
- Role, बीबीसी फ्यूचर
- Published
- वाचन वेळ: 10 मिनिटे
स्वतःच्याच कल्पनेत असं कधी हरवून जायला होतं का, जिथे सगळं काही आपल्या मनासारखं चाललेलं असतं? जसं की अफाट यश, लोकप्रियता किंवा लोकांचं भरभरून प्रेम.
उघड्या डोळ्यांनी अशी स्वप्नं पाहणं कधीकधी मनाला शांतता देतं आणि नवीन विचार करायला मदत करतं. पण जेव्हा हे कल्पनेचं जग खऱ्या आयुष्यापेक्षा जास्त आवडू लागतं आणि माणूस त्यातच अडकून पडतो तेव्हा मात्र त्रास सुरू होतो.
परंतु जेव्हा याच कल्पना वास्तवापेक्षा अधिक आकर्षक वाटू लागतात आणि तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाही तेव्हा परिस्थिती गुंतागुंतीची बनते. अशा लोकांच्या बाबतीत हे कल्पनेचं जग म्हणजे खऱ्या आयुष्याला समांतर असं एक नवीन जग बनतं ज्यातून त्यांना बाहेर पडताच येत नाही. मानसशास्त्रामध्ये याच मानसिक स्थितीला 'मॅलअडॅप्टिव्ह डे-ड्रिमिंग' (Maladaptive Daydreaming) म्हटलं जातं.
"माझं स्वप्नांचं कल्पनाविश्व इतकं जिवंत आणि सखोल आहे की, हे स्वप्न पाहताना माझ्या डोळ्यात पाणी येऊ शकतं किंवा हे विचार मला खळखळून हसायला भाग पाडू शकतात. पण यातली खास गोष्ट म्हणजे मला वाटेल तेव्हा मी या स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर येऊ शकते आणि हवं तेव्हा त्यात पुन्हा हरवून जाऊ शकते. मला हे खूप आवडतं. माझ्या या डे-ड्रीम बद्दल( दिवास्वप्न) जेव्हा मी अमेरिकेचे एक मानसोपचारतज्ज्ञ आणि संशोधक कॉलिन रॉस यांना सांगितलं तेव्हा ते माझ्या या क्षमतेमुळे खूप प्रभावित झाले आणि त्यांनी मला अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. याबद्दल मला तितकी खात्री नव्हती पण त्यांच्या कौतुकामुळे मला आनंद नक्कीच झाला."
जेव्हा डे-ड्रीमिंग (दिवास्वप्न) बनतात समस्या
पण जर तुम्ही कल्पनांच्या या दुनियेतून बाहेरच पडू शकला नाही तर काय होईल? नेमकी हीच समस्या अशा लोकांसमोर येते ज्यांना 'मॅलअडॅप्टिव्ह डे-ड्रीमिंग' (MD) या मानसिक स्थितीचा सामना करावा लागतो. ही अशी स्थिती आहे जिथे माणसं आपल्या जागे असण्याच्या वेळेतील निम्म्यापेक्षा जास्त वेळ फक्त स्वप्न पाहण्यातच घालवतात.
ते आपल्या मनात अत्यंत गुंतागुंतीच्या आणि सविस्तर कथा तसेच पात्र तयार करतात. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रॉस सांगतात की, गंभीर प्रकरणांमध्ये लोक दिवसातील 12 तास या काल्पनिक जगातच हरवून जातात."
यांच्या या काल्पनिक कथा कित्येक वर्षांपर्यंत चालत राहतात. हे ऐकायला खूप छान आणि आकर्षक वाटू शकतं. परंतु हे लोक आपल्या कल्पनांमध्ये इतके हरवून जातात की, त्यामुळे त्यांच्या रोजच्या जगण्यावर याचा वाईट परिणाम होतो आणि त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो.
मानसोपचारतज्ज्ञ आणि संशोधक कॉलिन रॉस म्हणतात, "ही समस्या जितकी दुर्मिळ वाटते तितकी ती नाही. जवळपास 2 ते 4 टक्के प्रौढ व्यक्ती याच्या विळख्यात असू शकतात." अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की, दिवसा स्वप्ने पाहण्याची सवय असलेल्या एखाद्या व्यक्तीला हे कसे समजणार की ही सवय आता एक समस्या बनत चालली आहे? आणि यावर उपचार कसे केले जाऊ शकतात?
डे-ड्रिमिंग: एक सामान्य सवय
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रॉस म्हणतात की, डे-ड्रिमिंग स्वतःमध्ये वाईट गोष्ट नाही. उलट जर एखादी व्यक्ती दिवसा अजिबात कल्पनेच्या दुनियेत हरवत नसेल तर मला त्या व्यक्तीबद्दल वाईट वाटेल. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणं ही एक सामान्य मानसिक सवय मानली जाते जी जवळपास प्रत्येक व्यक्तीला असते.
संशोधनानुसार, आपण जागे असताना आपल्या मेंदूत 30 ते 50 टक्के वेळ असे विचार चाललेले असतात ज्यांचा आपण करत असलेल्या कामाशी काहीच संबंध नसतो.
डॉ. रॉस सांगतात की, डे-ड्रिमिंगचे अनेक फायदेही आहेत. हे भावनांना नियंत्रित ठेवण्यास मदत करते, इतरांना समजून घेण्याची क्षमता वाढवते आणि कलात्मकतेला चालना देते. तसेच यामुळे कंटाळा दूर होतो आणि आयुष्यातल्या अनुभवांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.
कल्पनांमध्ये हरवून जाणं कधी बनतं एक डिसऑर्डर?
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रॉस सामान्य डे-ड्रिमिंग आणि मॅलअडॅप्टिव्ह डिसऑर्डरमधील फरक सांगताना म्हणतात, "मॅलअडॅप्टिव्ह डे-ड्रिमिंग व्यक्तीला पूर्णपणे स्वतःच्याच काल्पनिक दुनियेत खेचून घेतं."
उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांमध्ये इतकं खोलवर बुडून जाणं आणि त्यातून बाहेर पडता न येणं ही अत्यंत त्रासदायक स्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणतात, "यामुळे तुमच्या दैनंदिन कामाच्या क्षमतेत अडथळा निर्माण होतो. तरीही तुम्ही तेच करत राहता.कारण हे एका व्यसनासारखं बनलेलं असतं." हीच गोष्ट या सवयीला मॅलअडॅप्टिव्ह डिसऑर्डर बनवते. जेव्हा अशी लोकं शेवटी आपल्या स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर येतात तेव्हा त्यांना जाणीव होते की त्यांच्या या कल्पना निरर्थक होत्या आणि यामुळे त्यांचा वेळ वाया गेला. तरीही ही सवय इतकी जडलेली असते की ते पुन्हा त्याच चक्रात अडकतात आणि यातून बाहेर पडणं सोपं नसतं.
कशी सुरू होते ही सवय?
मॅलअडॅप्टिव्ह डिसऑर्डरची ही स्थिती समजवून सांगण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रॉस यांनी कायला बोरचर्ड्स हिच्या अनुभवांचे उदाहरण दिले आहे.
कायलाने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासूनच आपल्या डोक्यात एक वेगळीच दुनिया तयार करायला सुरुवात केली होती.
पुढे जेव्हा ती एका नवीन शाळेत गेली आणि तिथल्या इतर मुलांनी तिच्या बोलण्याची थट्टा उडवली तेव्हा तिची ही सवय आणखीनच वाढली.
तिच्यासाठी तिच्या कल्पनाविश्वात चालणाऱ्या या गोष्टी अश्या सुरक्षित जागा बनल्या जिथे तिची कोणीही थट्टा उडवत नव्हतं. उलट लोक तिला पसंत करायचे." ती कित्येक तास या डे-ड्रिम्समध्येच हरवून जायची.
ही सवय समजवण्यासाठी त्या जास्त चॉकलेट खाणं किंवा सतत सोशल मीडिया वापरणं यांसारख्या सवयींचे उदाहरण देतात. जसं की या गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्याशा वाटतात.
त्या म्हणतात की, नेमक्या याच ठिकाणी एक सामान्य आणि चांगली सवय नुकसानकारक ठरू शकते. इस्रायलच्या हैफा युनिव्हर्सिटीमधील क्लिनिकल सायकॉलॉजीचे प्रोफेसर एली सोमर यांनी या मुद्द्यावर सांगितलं की , "समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा व्यक्ती आपल्या कल्पनांवर नियंत्रण ठेवत नाही तर उलट त्या कल्पनाच त्या व्यक्तीला नियंत्रित करू लागतात."
खोल कल्पनेतून निर्माण होतात नकळत लागणाऱ्या सवयी
यांनीच या स्थितीला "मॅलअडॅप्टिव्ह डे-ड्रीमिंग" असे नाव दिले असून ते गेल्या 20 वर्षांपासून यावर संशोधन करत आहेत.
प्रोफेसर एली सोमर यांनी सांगितलं की, मॅलअडॅप्टिव्ह डे-ड्रीमिंगचा त्रास असलेल्या जवळपास 80 टक्के व्यक्ती अनेकदा नकळतपणे अशा काही शारीरिक हालचाली करू लागतात. ज्या त्यांना स्वप्नांच्या दुनियेत रमून राहण्यासाठी मदत करतात. जसं की गाणी ऐकणं किंवा इकडेतिकडे फेऱ्या मारणं.
ते बोरचर्ड्सच्या सवयींचे उदाहरण देतात की, "ती आपल्या घराबाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेत तासन्तास रोलर-स्केट्स घालून पुढे-मागे फिरत राहायची किंवा भिंतीवर चेंडू मारून खेळत राहायची."
ते पुढे सांगतात की, डे-ड्रिमिंग दरम्यान बोरचर्ड्स इतका वेळ आपल्या कल्पनांमध्ये घालवायची की, हळूहळू तिने लोकांशी भेटणं बोलणं कमी केलं आणि नातेसंबंधांपासूनही अंतर राखलं. यामुळे तिचा एकटेपणा वाढला आणि त्यानंतर लाज वाटणं आणि पश्चात्ताप होण्याचं एक चक्र सुरू झालं.
बोरचर्ड्स म्हणते, "मी कधी नोकरीत प्रमोशन मिळवण्याचा प्रयत्नच केला नाही." आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातच बोरचर्ड्सला असं जाणवू लागलं होतं की, तिची ही सवय तिला पुढे जाण्यापासून रोखत आहे.
ती सांगते, "माझ्यात काही करण्याची इच्छाच उरली नव्हती. जेव्हा मी माझ्या कल्पनेमध्ये कोणत्याही कष्टाशिवाय ते सर्व मिळवू शकत होते जे खऱ्या जगाइतकेच सुंदर वाटायचे तर मग मी मेहनत करून प्रमोशन मिळवण्याचा प्रयत्न का करू?"
"मी वयाच्या 40 व्या वर्षीही एंट्री-लेव्हलचेच (सुरुवातीच्या पातळीवरचे) काम करत होते. कारण मी कधी प्रमोशन मिळवण्याचा प्रयत्नच केला नाही."
वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ वांडा फिशेरा म्हणतात की, बोरचर्ड्सचा हा युक्तिवाद समजण्यासारखा आहे. त्या याचे स्पष्टीकरण देताना म्हणतात, "विचार करा, जर तुमच्या आवडत्या टीव्ही शोमधील मुख्य पात्र तुम्ही स्वतः असाल आणि तुमचे खरे आयुष्य रोमांचक नसेल तर तुम्ही ते जग कसं सोडू शकाल?"
यांचे सांगणे आहे, जर एखाद्या व्यक्तीच्या भावनिक गरजा पूर्ण होत नसतील तर 'मॅलअडॅप्टिव्ह डे-ड्रीमिंग' त्यांना त्यांच्या या गरजा पूर्ण होत असल्याचा आभास निर्माण करून देते. उदाहरणार्थ, अशी माणसं आपल्या स्वप्नांमध्ये स्वतःला अगदी खरोखर उपस्थित अनुभवतात जिथे त्यांना भरभरून प्रेम मिळतं किंवा ते एखाद्या हिरोसारखे जगतात. अशीच काहीशी परिस्थिती मारियाची देखील आहे जी आपला अनुभव शेअर करते पण तिला तिचं पूर्ण नाव जाहीर करायचं नाही. मारिया अनेकदा स्वतःला अशा कल्पनांमध्ये पाहते जिथे ती स्टेजवर उभी आहे आणि लोक तिच्याकडे पाहत आहेत. ती यशस्वी आहे आणि प्रत्येक जण तिला ओळखतो.
वांडा फिशेरा म्हणतात की, असे होण्यामागचं कारण अशा लोकांच्या मनात असणारी एक प्रकारची लाज किंवा न्यूनगंड (कमीपणाची भावना) असू शकतं. उदाहरणार्थ ते असा विचार करू शकतात की "कदाचित मी जसा आहे, तितका चांगला नाही," किंवा लोक माझ्यावर मी जसा आहे तसे प्रेम करत नाहीत किंवा मी माझं खरे रूप कोणाला दाखवू शकत नाही."
त्या पुढे म्हणतात, "या कल्पनांमध्ये नेहमीच नातेसंबंध आणि एक जवळीक पाहायला मिळते. यावरून हे स्पष्ट होतं की त्यांच्यामध्ये आपले एकटेपण दूर करण्याची एक तीव्र इच्छा दडलेली असते."
मारियाची कहाणी
मारियाने मान्य केलं आहे की, लहानपणी तिला खूप एकटेपणा जाणवायचा. ती गाणी ऐकत तासंतास पुढे-मागे झुलत राहायची जेणेकरून ती आपल्या कल्पनांमध्ये आणखी खोलवर हरवून जाऊ शकेल.
ती म्हणते, "हे तुमचे लक्ष पूर्णपणे वेधून घेते आणि हे खऱ्या आयुष्यासारखंच समांतर चालणारं एक वेगळंच जग असतं." तिचे आई-वडील आणि शिक्षक तिची ही समस्या समजून घेऊ शकले नाहीत. मारिया सांगते, "या सवयीमुळे माझ्या कामात खूप अडथळा यायचा ज्यामुळे मी अभ्यास करू शकत नव्हते. पण लोकांनी स्वतःच असा गृहीत धरलं की मला अभ्यास करायचाच नाही किंवा मी आळशी आहे."
मारिया आपल्या मनात वेगवेगळ्या कथा आणि पात्रे तयार करायची. यातील काही पूर्णपणे काल्पनिक असायचे तर काही पात्रे खऱ्याखुऱ्या माणसांवर आधारित असायची. ती एखाद्या कथेवर किंवा पात्रावर पूर्ण एक वर्षभर लक्ष केंद्रित करून राहायची. आता ती सांगते की तिच्याकडे किमान 10 चित्रपट बनू शकतील इतक्या कथा तयार आहेत. मात्र, ती हे देखील स्पष्ट करते की जेव्हा तिचे एखादे डे-ड्रीम संपायचे तेव्हा ती त्या कथांमधील मजकूर कधी लिहून ठेवत नव्हती. या सवयीमुळे आपला खूप वेळ वाया गेला याची तिला पूर्ण जाणीव होती.
इतर अनेक लोकांप्रमाणेच मारियालाही या समस्येबद्दल मोठे झाल्यानंतर समजले. आपण अशा प्रकारे विचार करणारे एकटेच नाही आहोत हे जाणून तिला खूप मोठा दिलासा मिळाला. ती म्हणते, "मला नेहमी वाटायचं की कदाचित मीच काहीतरी विचित्र किंवा वेगळी आहे."
मॅलअडॅप्टिव्ह डे-ड्रिमिंगची कारणे काय आहेत?
काही संशोधनांमध्ये असं आढळून आलं आहे की, ही समस्या लहानपणाच्या एखाद्या मानसिक आघाताशी (ट्रॉमाशी) संबंधित असू शकते. जसं कि दुर्लक्ष केलं जाणं, भावनिक शोषण किंवा नातेसंबंधांमधील असुरक्षितता.
असे लोक आपल्या वेदनादायी आठवणी आणि भावनांपासून दूर पळण्यासाठी कल्पनांच्या दुनियेत निघून जातात. याव्यतिरिक्त ज्यांची मेंदूची कार्य करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते (जसे की न्यूरोडायव्हर्सिटी), अशा लोकांसाठी देखील खोल कल्पनांमध्ये बुडून जाणं हा स्वतःला सावरण्याचा एक मार्ग बनतो.
एका अभ्यासामध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या 235 प्रौढ व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी 43 टक्के लोकांनी मॅलअडॅप्टिव्ह डे-ड्रिमिंगचा अनुभव असल्याबाबात सांगितलं.
या अनुभवांचा थेट संबंध एकटेपणा आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यात येणाऱ्या अडचणींशी जोडलेला होता. इतर संशोधनांमध्ये असं ही आढळून आलं आहे की, या समस्येचा संबंध इतर काही मानसिक स्थितींशी देखील असू शकतो. जसं की डिसोसिएटिव्ह म्हणजे वास्तवापासून दूर असल्यासारखं वाटणं आणि कम्पल्सिव्ह म्हणजेच वारंवार काही गोष्टी करण्याची सवय, एडीएचडी (ADHD), ओसीडी (OCD), नैराश्य आणि एन्झायटी. बोरचर्ड्सला वयाच्या 18 व्या वर्षी नैराश्य असल्याचे निदान झालं होतं.
ती म्हणते, "खरी समस्या डिप्रेशन ही होती आणि त्यापासून वाचण्यासाठी मी खऱ्या आयुष्यापासून दूर पळत होते." जेव्हा ती 40 वर्षांची होती तेव्हा तिने एक महिन्यासाठी मानसिक आरोग्य केंद्रात राहून उपचार घेतले. तेव्हा तिला जाणीव झाली की, अखेर आपल्याला योग्य मदत मिळाली आहे. हे तिच्या आयुष्यातील एक असे वळण ठरले जिथून तिने आपल्या या कल्पनांवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.
ती सांगते की, तिच्या कल्पना आता पुन्हा एकदा रचनात्मक आणि आनंददायी झाल्या आहेत आणि आता तिला पूर्वीसारखा त्रास जाणवत नाही. दरम्यान, मारियाच्या कोणत्याही मानसिक आजाराचे अधिकृत निदान झालेले नाही. परंतु ती एका विशेष थेरपिस्टकडून मदत घेत आहे.
प्रोफेसर एली सोमर यांनी सांगितले, "एडीएचडी (ADHD) सोबत असणारा याचा संबंध विशेषतः महत्त्वाचा आहे कारण बाहेरून पाहताना खूप जास्त कल्पना करणं हे लक्ष न देण्यासारखं वाटू शकतं. तसेच ओसीडी (OCD) सोबतही यात काही साम्य आढळते, जसं की डोक्यात सारखे सारखे तेच विचार येणं, एखादी गोष्ट करायची नसतानाही ती करण्याची मजबुरी वाटणं आणि त्यातून स्वतःला बाहेर काढता न येणं."
अर्थात ते हेदेखील स्पष्ट करतात की, "दोन गोष्टींमध्ये सारखेपणा असणं याचा अर्थ त्या एकच आहेत असा होत नाही." ते पुढे सांगतात की, आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांवरून हेच समजतं की मॅलअडॅप्टिव्ह डे-ड्रिमिंगला पूर्णपणे एडीएचडी किंवा ओसीडी मानलं जाऊ शकत नाही. "हा एक अगदी वेगळा अनुभव आहे, ज्यामध्ये माणूस कल्पनेच्या विश्वात खूप खोलवर जातो. खऱ्या जगापासून काही काळासाठी पूर्णपणे तुटतो आणि आपल्या आतल्या जगाशी भावनिकदृष्ट्या खूप जोडला जातो."
हे आपल्याला खऱ्या ओळखीपासून दूर नेतं का?
तर शेवटी प्रश्न हा उरतो की, मॅलअडॅप्टिव्ह डे-ड्रिमिंग हा असा एक मार्ग आहे का, जो तुम्हाला खऱ्या आयुष्यातील अडचणींचा सामना करण्यास मदत करतो? की ही एक अशी मानसिक स्थिती आहे जी तुम्हाला खऱ्या जगापासून आणि तुमच्या खऱ्या ओळखीपासून दूर नेते?
सोमर म्हणतात, "आतापर्यंतचे पुरावे हेच दर्शवतात की मॅलअडॅप्टिव्ह डे-ड्रिमिंगचा पूर्णपणे एडीएचडी (ADHD) किंवा ओसीडी (OCD) मध्ये समावेश केला जाऊ शकत नाही." मग ही सवय आपल्याला मदत करते की नुकसान पोहोचवते? सोमर यांच्या मते, अनेकदा या दोन्ही गोष्टी एकत्र घडत असतात.
ते म्हणतात, "अनेक लोकांसाठी ही सवय सुरुवातीला एक आधार असते. जसं की एकटेपणा, मानसिक ताण, आघात (ट्रॉमा) किंवा भावनिक कमतरतेचा सामना करण्यासाठी."
"परंतु काही लोकांमध्ये ही हळूहळू एक सवय बनते जी दीर्घकाळापर्यंत चालते आणि व्यक्तीला खऱ्या जगापासून वेगळं करते."
"त्यामुळे मी याला अशी एक रणनीती म्हणेन जी सुरुवातीला मदत करते. पण नंतर स्वतःच एक समस्या (डिसऑर्डर) बनू शकते."
या समस्येतून बाहेर पडणं शक्य आहे का?
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, जरी काही तज्ज्ञ याला एक वैद्यकीय समस्या मानत असले, तरी अद्याप अधिकृतपणे याचा डीएसएम (DSM - मानसिक आजारांचे मार्गदर्शक पुस्तक) किंवा आयसीडी (ICD) मध्ये समावेश करण्यात आलेला नाही. या विषयावर अद्याप मोठ्या प्रमाणावर संशोधन झालेले नाही. तर बहुतांश लहान-लहान अभ्यासच समोर आले आहेत.
याच कारणामुळे अद्याप यावर कोणतेही प्रमाणित उपचार पद्धत उपलब्ध नाही. सोमर म्हणतात की, असं असूनही सुरुवातीचे वैद्यकीय पुरावे आशादायक आहेत. काही केस स्टडीज आणि प्राथमिक उपचार हे दर्शवतात की, योग्य प्रकारची थेरपी यातून बाहेर पडण्यास मदत करू शकते.
विशेषतः जेव्हा थेरपीमध्ये या महत्त्वाच्या घटकांवर काम केले जाते:
- ट्रिगर म्हणजेच नेमक्या कोणत्या कारणांमुळे ही सवय सुरू होते
- वारंवार कल्पनेमध्ये बुडून जाणं
- लक्ष किंवा एकाग्रता नियंत्रित करणं
- भावनांवर नियंत्रण मिळवणं
- वास्तवापासून दूर पळण्याची सवय
- लाज किंवा न्यूनगंड (हीनभावना)
ते म्हणतात की, उपचाराचा उद्देश तुमच्या कल्पना पूर्णपणे नष्ट करणे हा नसून तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकणे हा आहे. जेणेकरून या कल्पना तुमच्या आयुष्याला अधिक सुंदर बनवतील ते हिरावून घेणार नाहीत. मात्र, शेवटी एक मोठी अडचण ही देखील आहे की, या समस्येची अचूक समज असणारा थेरपिस्ट शोधणं आजही थोडं कठीण आहे.
या आता 'एमडी'चा (MD) सामना करणाऱ्या लोकांसाठी एक रेडिट कम्युनिटी देखील चालवतात जिथे दर आठवड्याला सुमारे 18,000 लोक भेट देतात. तसेच ज्यांना आपल्यालाही ही समस्या असू शकते असं वाटतं, अशा लोकांची संख्या हळूहळू वाढत आहे. बोरचर्ड्स सांगते की, जे लोक या समस्येशी झगडत आहेत त्यांना ती नेहमी धीर देते की ही स्थिती कायमस्वरूपी राहत नाही. ती आता आपल्या डोक्यातील या कथांचा स्वीकार करू इच्छिते. कारण तिच्या कल्पनेतील पात्रांनी "माझ्यावर तेव्हा विश्वास ठेवला, जेव्हा माझा स्वतःवरचा विश्वास उडाला होता." ती एक गोष्ट स्पष्ट करते, "तुमच्या डोक्यात कथा असणं ही समस्या नाही. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्हाला त्या कथांचे व्यसन जडते. आणि हाच तो फरक आहे, जो सोशल मीडियावरील बहुतांश लोकांना समजत नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)