You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सीरम इन्स्टिट्यूट आग: घातपात की निष्काळजीपणा, पुणे पोलीस तपास करणार #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. सीरम इन्स्टिट्यूट आग: पुणे पोलीस आणि केंद्रीय तपास पथकांची करडी नजर
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे, तर राज्य व केंद्रीय गुप्तचर यंत्रणा इथल्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.
याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कुणाकडून काही बेपरवाई करण्यात आली का, याचा तपास करण्यात येत आहे. पुणे पोलिसांची क्राईम ब्रँच हडपसर पोलिसांसोबत या प्रकरणाची समांतर चौकशी करणार आहे, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
पोलीस उपआयुक्त नम्रता यांनी सांगितलं की, "अशाप्रकारच्या मोठ्या आगीच्या घटनेनंतर चौकशी केली जाते. याप्रकरणीसुद्धा चौकशी करण्यात येईल. इथं जीवितहानी तसंच इमारतीच्या दोन मजल्यांचं नुकसान झालं आहे. चौकशीनंतर कारवाई संदर्भात निर्णय घेण्यात येईल."
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (22 जानेवारी) सीरम इंस्टिट्युटला भेट देणार असून ते घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.
2. भंडारा आग: जिल्हा शल्यचिकित्सकासह चौघांचं निलंबन
भंडारा जिल्हा रुग्णालय अग्नीकांड प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सकासह चौघांना निलंबित करण्यात आलं आहं.
तर एका डॉक्टरसह तीन परिचारिकांना सेवामुक्त करण्यात आलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
याबाबत नेमलेल्या विभागीय आयुक्तांच्या समितीनं रुग्णालयातील रिक्त जागा भरणे, जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्युत अभियंता तसंच सार्वजनिक बांधकाम अभियंता नियुक्ती आणि जिल्हा रुग्णालयांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याची शिफारस केली आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षामध्ये लागलेल्या आगीत तीन बालकांचा होरपळून, तर सात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता.
3. शेती कायद्यांना स्थगितीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला
शेती कायद्यांना सशर्त स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी गुरुवारी (21 जानेवारी) फेटाळला.
तिन्ही कायदे रद्द करावेत, तसंच किमान आधारभूत मूल्यास कायद्याचं संरक्षण द्यावं, या दोन मागण्यांशिवाय कोणत्याही पर्यायावर तडजोड न करण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आल्याचं संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली.
विज्ञान भवनात बुधवारी (20 जानेवारी) झालेल्या दहाव्या बठकीत केंद्र सरकारनं नमते घेत कृषी कायद्यांना वर्ष-दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव शेतकरी नेत्यांसमोर ठेवला होता.
मात्र, नव्या तीन कृषी कायद्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी समिती नेमण्याची अटही केंद्रानं घातली. या प्रस्तावावर सर्वसंमतीने विचार करून निर्णय घेण्यात येईल, असं शेतकरी नेत्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना बठकीत सांगितलं होतं.
4. लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, रिम्समध्ये दाखल
राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली असून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
लालूप्रसाद यादव यांच्या छातीत संसर्ग आणि निमोनिया झाल्याचं सांगण्यात येत आहे.
चारा घोटाळ्याप्रकरणी सध्या कारावासाची शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीमधील रिम्स रुग्णालयातील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
5. एकनाथ खडसेंच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी
ईडीनं अटकेची कारवाई करू नये, यासाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. ईडीनं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं आहे.
एकनाथ खडसेंच्या याचिकेत ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तपासात सहकार्य करत असल्यानं कोणतीही कठोर कारवाई न करण्याची खडसे यांनी या याचिकेतून मागणी केली आहे. या प्रकरणात सोमवारी (25 जानेवार) कोर्ट निकाल देणार आहे.
एकनाथ खडसे यांची 15 जानेवारीला ईडीकडून चौकशी झाली होती. भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना नोटीस बजावण्यात आली आहे. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)