37 वर्षांच्या महिलेने 12 वर्षांची मुलगी बनून 14 महिने लोकांची अशी केली फसवणूक

    • Author, व्हिटोर तावारेस आणि इआरा दिनीझ
    • Role, बीबीसी न्यूज ब्राझील
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"मी 12 वर्षांची असून शोषणाची बळी ठरले होते. आता मी एकटी आहे", असं सांगत एका मुलीने मदत मागितली.

अडचणीत सापडलेल्या या मुलीला मदत करण्यासाठी ब्राझीलच्या लोकांनी आपल्या घराचे दरवाजे खुले केले.

परंतु, ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी 'गॅब्रिएल'बद्दल एक पूर्णपणे वेगळंच सत्य समोर आणलं आहे. त्यांच्या मते, ती प्रत्यक्षात 37 वर्षांची महिला होती. ती स्वतःला ऑटिझमने ग्रस्त असल्याचा दावा करते. ती एक निराधार लहान मुलगी असल्याचं सर्वांना सांगत होती.

पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे. न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार तिचे नाव 'अमांडा मारिया सूझा डी ऑलिव्हेरा' असं आहे. तिच्यावर फसवणूक आणि खोटी ओळख सांगितल्याचा आरोप आहे, असं पोलिसांनी 3 जूनला सांगितलं.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती 14 महिने एका कुटुंबासोबत खोट्या नावाने राहत होती.

हे प्रकरण ब्राझीलमध्ये खूप चर्चेत आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिने साओ पावलो, रिओ दि जानेरियो, मिनास गेराईस, रिओ ग्रांदे दो सुल आणि गोईआस या राज्यांमध्येही अशाच प्रकारची फसवणूक केल्याचा संशय आहे.

पोलिसांनी आपल्या निवेदनात सांगितलं, "आरोपीने स्वतःला लहान मूल दाखवण्यासाठी मुलांसारखंच वर्तन केलं. नियमितपणे बाळाची बाटली आणि खेळणी वापरली."

लहानपणी जबरदस्तीने हार्मोन्स दिल्यानेच आपण प्रौढ दिसू लागलो. आपल्या शरीरात त्यामुळेच असे बदल झाल्याचे तिने सांगितले.

मानसिक मूल्यांकन

तपास अधिकारी रॉड्रिगो गुसो यांनी बीबीसी न्यूज ब्राझीलला सांगितलं की, ज्या कुटुंबाने तिला आपल्या घरी आश्रय दिला होता, त्या कुटुंबातील एका नातेवाईकाला संशय आल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

त्या नातेवाईकाने इंटरनेटवर अशाच प्रकारच्या एका प्रकरणाबद्दलच्या बातम्या पाहिल्या होत्या.

इतर राज्यांतील पोलिसांकडून माहितीची खातरजमा केल्यानंतर गुसो यांना खात्री पटली की, ही तीच महिला आहे.

त्यांनी सांगितलं की, अटकेच्या वेळी आरोपीने फसवणूक केल्याचं मान्य केलं होतं आणि ती सवयीने खोटे बोलत असल्याचंही कबूल केलं होतं.

गुसो यांनी बीबीसी न्यूज ब्राझीलला सांगितलं, "तिच्यात गुन्हेगारी स्वरुपाच्या मानसिक विकृतीचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. ती समजूतदार होती, सहकार्य करत होती आणि तिची विचारसरणीही खूपच तर्कशुद्ध होती."

ऑलिव्हेराच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी मानसिक आरोग्य तपासणीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्यही झाली आहे, अशी माहिती ऑलिव्हेराचे वकील राफेल लुईज सिव्हर्ट यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला दिली.

पुढील कायदेशीर पाऊल उचलण्यासाठी तपासाच्या निकालांची वाट पाहणार आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.

'भयानक' कथा

रिओ दि जानेरियोमध्ये शोषणग्रस्त (अत्याचार) आणि ऑटिझम असलेल्या मुलांसाठी मदत करणारी धर्मादाय संस्था चालवणाऱ्या 2 महिलांनी बीबीसीला सांगितलं की, या महिलेने 2023 मध्ये वेगळं नावं वापरून त्यांनाही फसवलं होतं.

व्हिव्हियन हेनरिक्स 'माओन्स की अबेन्सोआन कोन अमोर' (प्रेमाने आशीर्वाद देणारे हात) नावाची संस्था चालवतात.

त्यांनी सांगितलं की, 'डुडा' म्हणून स्वतःची ओळख सांगणाऱ्या ऑलिव्हेराशी त्यांचा पहिला संपर्क संस्थेच्या सोशल मीडिया पेजद्वारे झाला होता.

ब्राझीलच्या ईशान्येकडील सियारा राज्यात झालेल्या शोषणामुळे आपण पळून आल्याचे ऑलिव्हेराने त्यावेळी सांगितलं होतं, असं हेनरिक्स यांनी म्हटलं.

तिच्या वडिलांनी तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलले आणि तिच्यावर हार्मोन उपचार केले. त्यामुळे ती तिच्या वयापेक्षा मोठी दिसते, असाही आरोप तिने केला होता.

हेनरिक्स म्हणाल्या, "जेव्हा तिने मला तिची कहाणी सांगितली, तेव्हा मी खूप घाबरले होते. कारण मी याआधीही अशा प्रकरणांचा सामना केला आहे."

'प्रेम, काळजी आणि अन्न'

तिची कहाणी ऐकून प्रभावित होऊन हेनरिक्स आणि त्यांची सहकारी रेनेटा मॅगाल्हानिस यांनी ऑलिव्हेरासाठी एक छोटासा फ्लॅट भाड्याने घेतला आणि तिची काळजी घ्यायला सुरुवात केली.

हेनरिक्स म्हणाल्या, "ती एखाद्या किशोरवयीन मुलीसारखी दिसत होती. ती लहान मुलांसारखं बोलायची, स्वतःला ऑटिझम आहे असे सांगायची आणि नेहमी हुडी घालून असायची."

पुढील एका महिन्यात त्या दोन्ही महिलांचं तिच्यासोबत भावनिक नातं निर्माण झालं.

त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑलिव्हेरा लहान मुलांसारखं वागत होती. ती दुधाची बाटली आणि लहान मुलांचं अन्न मागायची, पण पैसे कधीच मागायची नाही.

मॅगाल्हानिस यांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला बाल संरक्षण परिषदेकडे नेऊ नका, अशी 'अमांडा' त्यांना विनंती करायची. तिला पुन्हा सियारा राज्यात पाठवलं जाईल, अशी भीती वाटायची.

महिलांच्या म्हणण्यानुसार तिच्या शरीरावर काही चिंताजनक, अस्वस्थ करणाऱ्या खुणाही होत्या. त्यामुळे तिची कहाणी आणखी खरी वाटत असत.

त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या तिला एक्सरेसाठी घेऊन गेल्या. त्यात तिच्या शरीरात 200 पेक्षा जास्त सुया घुसलेल्या दिसल्या.

तिने दावा केला की, या सुया तिच्या वडिलांनीच तांत्रिक विधी दरम्यान तिच्या शरीरात टोचल्या होत्या.

"हे खूप भीतीदायक होतं", असं मॅगाल्हानिस म्हणाल्या.

मॅगाल्हानिस पुढे म्हणाल्या, "मी तिला प्रेम, काळजी आणि अन्न दिलं. मला तिच्यावर शंका घेण्याचं काही कारण नव्हतं."

संशय वाढत गेला

जेव्हा 'डुडा' वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या प्रकारे वागू लागली, तेव्हा चिंता निर्माण होऊ लागली.

मॅगाल्हानिस यांच्या म्हणण्यानुसार, ती भावनिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून होती आणि तिला एकटं सोडलं तर ती स्वतःला इजा करण्याची धमकी द्यायची आणि सतत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करायची.

त्या म्हणाल्या, "तिने माझं मानसिक आरोग्य आणि आर्थिक स्थिती पूर्णपणे उद्धवस्त केली. तिच्या दबावामुळे मी माझ्या मुलांपासूनही दूर गेले."

पण हेनरिक्स म्हणाल्या की, त्यांच्यासोबत राहताना ऑलिव्हेराचं वर्तन स्थिर होतं.

यामुळे संशय बळावला आणि अखेरीस या दोन्ही महिलांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तपास करून या फसवणुकीचा पर्दाफाश केला.

रिओमध्ये या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकारी मोनिका एरियल यांनी बीबीसी न्यूज ब्राझीलला सांगितलं की, नंतर पोलिसांना ऑलिव्हेराच्या फोनमध्ये काही इंटरनेट सर्च मिळाले. त्यात 'ऑटिझम असलेले लोक कसं वागतात' आणि 'शोषणाचे बळी ठरलेल्यासारखं कसं दिसावं' अशा शोधांचा (सर्च) समावेश होता.

अटक आणि सुटकाही

तिला अटक करण्यात आली आणि कोठडीविषयक सुनावणीदरम्यान तिने फसवणूक केल्याचे कबूलही केले. मात्र न्यायालयाने खटला सुरू असताना ती बाहेर राहू शकते, असा निर्णय दिला.

नंतर सरकारी वकिलांनी तिच्यावर आरोप दाखल केले, परंतु अधिकाऱ्यांना तिचा शोध घेता आला नाही.

एरियल म्हणाल्या की, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला कोठडीत ठेवणे 'कठीण' असतं. कारण न्यायालयं फसवणुकीला हिंसाचार नसलेला किंवा गंभीर धमकी नसलेला गुन्हा मानतात.

मॅगाल्हानिस म्हणाल्या की, हे पाहून त्यांना स्वतःला 'असहाय्य' वाटतं की, इतर लोकही या फसवणुकीचे शिकार झाले आहेत. त्या आशा करतात की, त्यांना नक्कीच न्याय मिळेल.

पण त्या म्हणाल्या, "हे केवळ तिला अटक करण्याचे प्रकरण नाही," आणि त्यांचं मत आहे की, ऑलिव्हेराला मानसिक उपचारांचीही गरज असू शकते.

या अनुभवानंतरही हेनरिक्स म्हणाल्या की, त्या निराधार मुलांना मदत करण्याचं आपलं काम सुरूच ठेवणार आहेत.

"मी लोकांना मदत करण्याची इच्छा कधीच सोडणार नाही," असं त्यांनी नमूद केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)