राम कदम यांचा पोलिसांना आरोपींना सोडवण्यासाठी फोन : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सचा घेतलेला आढावा.

1. पोलिसांना मारणाऱ्या आरोपींना सोडा, राम कदमांचा पोलिसांनाच फोन

भाजप नेते राम कदम हे वादग्रस्त विधानांवरून नेहमीच चर्चेत असतात. पोलिसांना मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी थेट पोलिसांनाच फोन केला आणि प्रकरण मिटवण्याची विनंती केल्यानं ते पुन्हा एकदा वादात सापडलेत. 'टीव्ही9'ने ही बातमी दिली आहे.

पवई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नितीन खैरमोडे असं मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे.

पवईच्या हिरानंदानीच्या गॅलरिया मॉलजवळ एका जेष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला हे कार्यकर्ते धडकले. नियमांचं उल्लंघन करत हे भाजपचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते.

यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर यांना ताब्यात घेऊन रिक्षाने नेत असताना नितीन खैरमोडे या पोलीस कॉन्स्टेबलला कार्यकर्त्यांनी रिक्षातच मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्यावर हातात घातलेल्या कड्याने वार केले.

काही महिन्यांपूर्वी मुंबईतल्या दहीहंडी कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम यांनी युवकांसमोर बोलताना, 'तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि ती तुम्हाला नकार देत असेल, तर ती मुलगी पळवून आणून तिचे त्या तरुणाशी लग्न लावून देईन', असं बेताल वक्तव्य केलं होतं.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना त्यांनी मारहाणही केली होती. टाईम्स स्क्वेअरच्या इमारतीवर प्रभू रामचंद्राचा फोटो एडिट करून टाकल्याप्रकरणी ते ट्रोलही झाले होते.

त्यांच्याविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात त्यांनी उपोषणही केलं होतं. सुशांत सिंगची आत्महत्या नव्हे तर हत्या आहे असा दावाही त्यांनी केला होता.

2. भंडारा आगप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटीस

भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे.

राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी चार आठवड्यात या घटनेचा तसंच राज्यभरातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा अहवाल सादर करावा असं आदेशात म्हटलं आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

फायर ऑडिटमध्ये कोणत्या त्रुटी आढळल्या आणि त्या दूर करण्याच्या प्रक्रियेत दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली ही माहिती सादर करण्याचे आदेश मानवाधिकार आयोगाने दिले आहेत.

राज्य सरकारच्या रुग्णालयात ही घटना घडली आहे. नवजात अर्भकांच्या जीविताचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार ती झटकू शकत नाही असं आयोगाने म्हटलं आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहासदस्यीय समिती नेमलीय. समितीच्या अध्यक्षपदी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्याऐवजी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे समितीचा अहवाल यायला विलंब लागेल असं चित्र आहे.

3. मालेगावात काँग्रेस-राष्ट्रवादीची भाजपशी युती

मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कृषिमंत्री दादा भुसे आणि शिवसेनेची कोंडी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने बहुसंख्य ठिकाणी भाजपशी घरोबा केला आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

मालेगाव तालुक्यातील एकूण ९९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी मतदान रोजी होत आहेत. कृषिमंत्री दादा भुसे हे सतत चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.

युती शासन काळात आधी सहकार आणि नंतर ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून पाच वर्षं त्यांनी पदभार सांभाळला. आताच्या मंत्रिमंडळात भुसे कृषीमंत्री आहेत. हिरेंचं वर्चस्व मोडून काढत 2004 मध्ये भुसे पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.

मधल्या काळात भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सामील झालेल्या अद्वय हिरे यांच्या गटाने आत्ताच्या निवडणुकांमध्ये भुसेंच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांची एकत्र मोट बांधली असून निवडणूक होऊ घातलेल्या निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये असं चित्र बघावयास मिळत आहे.

4. महिलेने धरली राज्यमंत्र्यांची कॉलर

इंदापूर तालुक्यातील रेडणी गावचा वाद थेट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत गेलाय. विशेष म्हणजे या प्रकरणात महिलेने थेट मंत्री दत्तात्रय भरणे यांची कॉलर पकडली असल्याचं समोर आलं आहे. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

दीड महिन्यांपूर्वी संभाजी चव्हाण यांच्याविरुद्ध प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे यांनी 394 अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संभाजी चव्हाणने प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगेवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. म्हणून काल प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे कुटुंबातील लोक दत्तात्रय भरणे यांच्या घराबाहेर उपोषणाला बसले होते. प्रफुल्ल चव्हाण हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. प्रफुल्ल चव्हाण हा दत्तात्रय भरणे यांचा निकटवर्तीय आहे.

प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी 5 लाख रुपये खंडणी मागितली होती. ती न दिल्याने गुन्हा दाखल केल्याचा आरोप प्रफुल्लची आई शोभा चव्हाण यांनी केलाय.

शोभा चव्हाण या रेडणी गावच्या माजी सरपंच आहेत. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या निलंबनाची कारवाई व्हावी या मागणीसाठी प्रफुल्लची आई शोभा चव्हाण या दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर उपोषणाला बसल्या होत्या. त्यावेळी यांनी थेट दत्तात्रय भरणे यांची कॉलर पकडत जाब मगितल्याचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सध्या त्यांनी हे उपोषण मागे घेतलं आहे.

5. राणेंना मुलांपासूनच धोका- राऊत

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना खरा धोका त्यांच्या मुलापासूनच आहे. त्यांनी त्यांचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडू नये, अशी टिप्पणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

केंद्र सरकारने माझ्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. पण माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा राणेंनी दिला आहे. त्याकडे लक्ष वेधले असता खासदार राऊत म्हणाले की, "राणेंना दहशतवाद्यांपासून धोका नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सक्षम सरकार आहे. केंद्रात त्यांच्या पक्षाचं सरकार आहे. कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी राणेंना त्यांच्या दोन मुलांपासून धोका आहे."

"नीलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. नीलेश राणेला मतदारांनी घरी बसविलं. नितेश राणेकडे चांगले गुण असल्यामुळे तो पुढे जाईल. असं वाटलं होतं परंतु त्यांची गुंडप्रवृत्ती त्यांना भविष्यात घरात बसवल्याशिवाय राहणार नाही. अशा परिस्थितीत राणेंच्या राजकीय अस्तित्वाला खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)