You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नथुराम गोडसे याच्या नावाने मध्यप्रदेशात 'ज्ञानशाळा', गांधीवाद्यांना काय वाटतं?
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या नावाने अभ्यासकेंद्र उभारण्यात आलं आहे. 'गोडसे ज्ञान शाला' असं या केंद्राला नाव देण्यात आलं आहे.
हिंदू महासभेच्या पुढाकारानं ग्वाल्हेरच्या हिंदू महासभा भवनात हे केंद्र उभारलं गेलंय.
या केंद्राचे उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, "नथुराम ज्ञान शाला या केंद्रामार्फात तरुणांना फाळणीच्या विविध अंगांबाबत आणि राष्ट्रीय नेत्यांबाबत माहिती दिली जाईल."
यापूर्वीही मध्य प्रदेशातीलच भाजपच्या खासदार असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेचं समर्थन केलं होतं.
मध्य प्रदेशातील या कृतीचं भाजपचे महाराष्ट्रातील नेते आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केलाय.
"नथुराम गोडसेंचं समर्थन या देशात कुणीही करू शकत नाही. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा ज्यांनी खून केला, हत्या केली, अशा व्यक्तीचं या देशात महिमामंडन होऊ शकत नाही. अशाप्रकारे कुणी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते चूक आहे. त्याचं समर्थन होऊ शकत नाही," अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्त्व करणाऱ्या आणि भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या या उदात्तीकरणाबाबत गांधीवादी कार्यकर्त्यांना काय वाटतं, हे बीबीसी मराठीनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
ही तर विषपेरणी - चंद्रकांत वानखेडे
'गांधी का मरत नाही' या पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांनी ग्वाल्हेरमधील या कृत्याला 'विषपेरणी' असं म्हटलं.
चंद्रकांत वानखेडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "एकीकडे गांधींचं नाव घेऊन राजकारण करायचं आणि दुसरीकडे यांचीच माणसं गांधींना फादर ऑफ पाकिस्तान म्हणतात. नथुरामच्या नावानं असे काही होत असेल, तर मुँह में गांधी आणि बगल में नथुराम असा हा प्रकार आहे. हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे आणि सत्तेची मान्यता असल्याशिवाय असं कृत्य होऊ शकत नाही.
"या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याविरोधात आंदोलन करावे लागतील. कारण ही विषपेरणी आहे," असंही वानखेडे म्हणतात.
द्वेषाची पायाभरणी करणारी 'ज्ञानशाळा' - सुभाष वारे
सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे हे याबाबत बोलताना म्हटलं, "हिंदू महासभेनं जे सुरू केलंय, त्यात 'ज्ञानशाळा' असा शब्द आहे. साधरणत: शाळेचा उद्देश माणूस घडवणं हा असतो. मात्र, इथं सातत्यानं द्वेषाचं राजकारण करणाऱ्या आणि गांधींची हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या नावानं एखादी 'शाळा' सुरू होत असेल, तर ती द्वेषाची शिकवणी करणारीच असेल, यात दुमत नाही."
"अशा पद्धतीच्या उपक्रमातून द्वेषाची पायाभरणी होईल आणि भारताच्या एकतेची वीण मात्र उसवली जाईल," असं सुभाष वारे म्हणतात.
"ज्ञान नव्हे, ही तर अज्ञानशाळा"
हिंदू महासभेनं तरुणांना फाळणी आणि राष्ट्रीय नेत्यांची ओळख सांगण्यासाठी या ज्ञानशाळेची सुरुवात केल्याचं म्हटलंय. त्यामुळे बीबीसी मराठीनं तरुणांपर्यंत महात्मा गांधी यांचे विचार पोहोचवण्याचं काम करणाऱ्या 'Knowing Gandhi Global Friends' या उपक्रमाचे संकेत मुनोत यांच्याशी बातचीत केली.
संकेत मुनोत सांगतात, "ज्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन जगभर नेल्सन मंडेला किंवा त्यांच्यासारख्या अनेक लोकांनी जागतिक स्तरावर परिवर्तनाचं काम केलं, त्या राष्ट्रपित्याची जातीवादातुन हत्या करणाऱ्या एका दहशतवाद्याच्या विचारांचे गौरवीकरण करणारी 'अज्ञानशाळा' उघडणे हे देशासाठी घातक आहे."
महावीर, बुद्ध , गांधींचा देश म्हणून जे जगात भारताला स्थान आहे, ते हिंदू महासभेने केलेल्या प्रकारांमुळे रसातळाला जाऊन देशात अराजकता माजेल, अशी खंत संकेत मुनोत व्यक्त करतात.
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी म्हणतात, "हे सर्व घातक आहेच. मात्र, या गोष्टींमुळे लोक आता सुज्ञ झालेत. हिंदू महासभा सांगेल, तो इतिहास आता लोक मानत नाहीत. आतापर्यंत इतिहास तरुणांनीही नीट समजावून घेतला आहे. त्यामुळे हिंदू महासभेचा हा प्रकार फुटकळ आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)