You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भंडारा आग : हॉस्पिटलमध्ये फायर सेफ्टी नव्हतीच- माहिती अधिकारात सरकारचीच माहिती
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटच्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने देशभरात हळहळ व्यक्त होतेय.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेशही दिलेत. पण भंडारा जिल्हा रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणाच उपलब्ध नसल्याची माहिती स्वत: राज्य सरकारने दिली आहे.
भंडाऱ्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विकास मदनकर यांनी 2018मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील फायर सेफ्टीविषयी म्हणजेच आग नियंत्रण यंत्रणेबाबतची माहिती मागवली होती. त्यावेळी प्रशासनाने त्यांना दिलेल्या उत्तरात रुग्णालयात आग नियंत्रण यंत्रणाच उपलब्ध नसल्याचं सांगितलं होत.
या संदर्भात बीबीसी मराठीने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय मदनकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
"ऑगस्ट 2017 मध्ये उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नवजात बाळांच्या मृत्यूच्या बातम्या मीडियात दररोज येत होत्या. ही घटना पाहिल्यावर मी अस्वस्थ झालो आणि भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयातील स्थिती काय याची मला चिंता झाली. तेव्हा मी आधी भंडारा जिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा कशी आहे याची माहिती घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारात अर्ज केला.
24 ऑक्टोबर 2018 मला जिल्हा रुग्णालयाकडून दिलेल्या या उत्तरात धक्कादायक माहिती मिळाली. भंडारा जिल्हा रुग्णालयात फायर सेफ्टी हायड्रन्ट्स उपलब्ध नाही, फायर सेफ्टी स्प्रिंकलर्स सिस्टम उपलब्ध नाही, स्मोक अलार्म उपलब्ध नाही, तर फायर एक्स्टिंग्विशर Extinguisher काही उपलब्ध आहेत तर काही उपलब्ध नाहीत, असं सांगण्यात आलं."
यानंतर मदनकर यांनी भंडाऱ्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणात जिल्हा रुग्णालयाकडून प्रस्ताव आल्यावर सरकारकडून अग्निविरोधी यंत्रणा लावली जाईल, असं आश्वासन दिलं.
पुन्हा हीच माहिती पुन्हा 23 जून 2020 मध्ये मी मागितली. त्यावेळी त्यात आगप्रतिबंधाच्या उपाय योजनेसाठी एक कोटी 52 लाख 44 हजार 783 रुपयांचे अंदाज पत्रक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सहीनं तयार केल्याची माहिती मिळाली, असं मदनकर सांगतात.
हे अंदाजपत्रक तयार करून याचा प्रस्ताव 8 मे 2020 रोजी आरोग्य खात्याचे सहसंचालक, आरोग्यसेवा मुंबई यांना पाठवला. पण आगीच्या दिवसापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही, हे यातून स्पष्ट होतं, असा दावा मदनकर करतात.
या सर्व प्रकरणावर भंडारा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला, पण त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर याबाबत सांगतात, "मुळात आपल्या सरकारच्या प्रमुख मुद्द्यावर आरोग्य यंत्रणा कधीच अग्रक्रमावर दिसत नाही. भंडाऱ्यातील आगीची घटना ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसतंय. पण भंडारा शासकीय रुग्णालय बांधणाऱ्या आणि त्याच्या मेंटेनन्सची जबाबदारी ही राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे.
एखाद्या एवढ्या मोठ्या इमारतीत अर्थिंग नीट असणे, शॉर्टसर्किट होऊ नये यासाठी सर्किट ब्रेक करणारी ट्रीप यंत्रणा आवश्यक आहे. यासोबतच सर्वांत महत्त्वाचं म्हणजेच आग लागलीच तर अग्निविरोधी यंत्रणा असावी लागते.
सरकारी रुग्णालय फक्त डॉक्टर चालवत नाही तर त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, महावितरण अशी अनेक विभागांची सामूहिक जबाबदारी असते. या घटनेनंतर तरी प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करणं आणि अग्निसुरक्षा सारख्या यंत्रणा सुरू आहेत की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे."
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जिल्हा रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.
एवढ्या मोठ्या रुग्णालयात साधे फायर सेफ्टी स्प्रिंकलर्स सिस्टम उपलब्ध नाहीत, स्मोक अलार्म उपलब्ध नाहीत यावर विश्वास बसत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
आगीमुळे जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला सर्व सुरक्षा युक्त यंत्रणांसह पुन्हा सुरु करण्यासाठी आर्थिक मदत करणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी बीबीसीला सांगितलं.
दुसरीकडे रुग्णालयात आगी सारखी घटना घडलीच तर त्यावेळी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी नर्सेस, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काय करावं याचं ट्रेनिंग देण्याची मागणीही या घटनेनंतर होऊ लागली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)