संजय राऊत : 'देवेंद्र फडणवीस यांना बंकरमध्ये नव्हे, सगळ्यांसमोर भेटलो'

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मी काय देवेंद्र फडणवीसांना एखाद्या बंगर किंवा तळघरात भेटलो नाही, तर सगळ्यांसमोर भेटलो. त्यांचनी एक प्रदीर्घ मुलाखत सामनासाठी घ्यायचा प्रयत्न होता, देवेंद्र फडणवीसांची जाहीर मुलाखत घ्यावी, अशी अनेक साहित्यविषयक संस्थांची मागणी होती. आमची भेट फक्त मुलाखतीसंदर्भातच ठरली. आम्ही यादमरम्यान सोबत जेवलोसुद्धा. वेळ, ठिकाण वगैरे गोष्टी लवकरच कळवल्या जातील.

तुम्ही एखाद्याची मुलाखत घेतल्यानंतर राजकीय समीकरणं बदलतात, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. याला उत्तर देताना "सध्याच्या सरकारमध्ये उत्तम समन्वय आहे. आम्ही एकमेकांशी सहकार्य करत आहोत. त्यामुळे राजकीय भूकंप वगैरे येण्याचा प्रश्न नाही.

या भेटीबाबत तुम्हाला हवी ती चर्चा तुम्ही करू शकता. चर्चेला सेन्सॉर नाही. महाराष्ट्रात विरोधी पक्षांसोबतची संवाद ठेवण्याची पद्धत आहे. विचारांमध्ये फरक आहे, म्हणजे त्यांच्याशी संवादच ठेवायचं नही, अशी स्थिती नाही. या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती होती, असं राऊत म्हणाले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची शनिवारी (26 सप्टेंबर) भेट झाली होती. या भेटीनंतर उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

या भेटीबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं, "संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही."

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही असंच ट्वीट केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची भेट गुप्त नव्हती. सामना वृत्तपत्रात मुलाखती संदर्भात ही भेट होती, असं संजय राऊत यांनी म्हटल्याचं एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना या भेटीविषयी सांगितलं, "शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर पातळी सोडून टीका केली. शिवसेनेसोबत आम्ही फक्त राजकीय दृष्ट्या वेगळे झालेलो नाही तर मनानेही वेगळे झालो आहोत. त्यामुळे इतक्या सहजासहजी सत्तेसाठी ही बैठक असेल असं वाटत नाही. भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला हे वाटणार नाही. शिवसेनेबाबत जाऊन सत्ता आणावी असं आम्हाला वाटत नाही."

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रिेयेत म्हटलं, "माझी आणि संजय राऊत यांची दिल्लीत भेट दिली. त्यांनी चहाचं निमंत्रण दिलं मी चहा प्यायला गेलो. अशीच भेट आता देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची झाली आहे, मला असं वाटतं की या भेटीत काही खास राजकीय चर्चा झाली नसेल. अशा भेटी होतच राहणार आहे. आम्ही काही सरकार पाडायच्या नादात नाही आहोत. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करतोय."

यापूर्वी संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती.

आता देवंद्र फडणवीस यांची मुलाखत पुढच्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाईल, असं सांगितलं जात आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)