You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वैभव सूर्यवंशीचे 11 बॉलमध्ये अर्धशतक; आधी टीका करणाऱ्या संजय मांजरेकरांनीही केली स्तुती
भारत-अ संघाने श्रीलंका-अ आणि अफगाणिस्तान-अ यांच्यासोबत खेळल्या गेलेल्या मालिकेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारत-अ ने श्रीलंका-अ चा 66 रनांनी पराभव केला.
पहिल्यांदा बॅटिंग करताना भारत-अ संघाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावत 377 रनांचा मोठा डोंगर उभारला.
वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या या जोडीने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी अवघ्या 8.5 ओव्हरमध्ये 132 धावांची भागीदारी केली. वैभवने तडाखेबाज फलंदाजी करत केवळ 11 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. तो 29 चेंडूंमध्ये 94 धावा करून बाद झाला.
श्रीलंकेतील दांबुला इथं खेळल्या जात असलेल्या 50 षटकांच्या तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात इंडिया-ए संघाचा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीनं केलेल्या तुफानी फलंदाजीचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी देखील कौतुक केले.
मात्र याआधी मालिकेच्या चौथ्या सामन्यात भारत आणि श्रीलंकेमधील सामन्यातील वादामुळे वैभव चर्चेत आला होता. त्यावेळेस संजय मांजरेकर म्हणाले होते की "जर ते इंडिया-ए चे प्रशिक्षण किंवा व्यवस्थापक असते, तर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीचा समावेश संघात केला नसता."
मात्र रविवारी (21 जून) वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी पाहून संजय मांजरेकर यांनी एक्सवर लिहिलं, "आताच ही जाणीव झाली की वैभव 50 षटकांच्या क्रिकेटकडे अशा दृष्टीकोनातून पाहतो, ज्यात तो आणखी तुफानी फलंदाजी करू शकतो. कारण यामध्ये 10 षटकांपर्यंत सर्कलबाहेर 6 नाही तर 2 क्षेत्ररक्षक असतात."
संजय मांजरेकर यांच्या आधीच्या आणि ताज्या वक्तव्यांबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात म्हटलं जात आहे की कदाचित आता त्यांना 'त्यांच्या चुकीची जाणीव' झाली असावी.
आद्या या एका युजरनं एक्सवर संजय मांजरेकरांची ताजी पोस्ट शेअर करत लिहिलं, "आता तुम्ही ठीक असाल अशी आशा आहे."
तर आणखी एका युजरनं संजय मांजरेकरांना रिप्लाय देत लिहिलं, "खेळाडूंना त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या तुमच्या विश्लेषणाचं कौतुक झालं पाहिजे."
11 चेंडूंमध्ये 50 धावा, मात्र विक्रम थोडक्यात राहिला
वैभव सूर्यवंशीनं रविवारी दांबुलामध्ये खेळण्यात आलेल्या 50 षटकांच्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका-ए संघाच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली.
श्रीलंका-ए संघानं नाणेफेक जिंकली आणि इंडिया-ए संघाला आधी फलंदाजी करण्यास सांगितलं.
गेल्या सामन्यातील वादांची पार्श्वभूमी मागे सोडत वैभवनं सुरुवातीपासूनच टी-20 च्या शैलीत यजमान संघाला त्याच्या आक्रमक फलंदाजी दाखवून दिली.
त्यानं फक्त 11 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं. लिस्ट ए क्रिकेटमध्ये हा एक नवीन विक्रम आहे. मात्र बिहारचा हा 15 वर्षांचा फलंदाज लिस्ट ए मध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम करू शकला नाही.
वैभव फक्त 29 चेंडूंमध्ये 94 धावा करून बाद झाला. त्यानं 10 चौकार आणि 8 षटकार लगावले. तो जर 29 व्या चेंडूवर बाद झाला नसता आणि त्या चेंडूवर त्यानं षटकार लगावला असता. तर त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 29 बॉलमध्ये शतक करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली असती.
हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या जॅक फ्रेझर-मॅकगर्कच्या नावावर आहे. त्यानं 29 चेंडूंमध्ये शतक केलं होतं. दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्यानं 2023-24 च्या मोसमात टास्मानियाविरुद्ध त्यानं ही ऐतिहासिक कामगिरी केली होती.
तर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदज ए बी डिव्हिलियर्सच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम आहे. त्यानं 2015 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना फक्त 31 चेंडूंमध्ये शतक केलं होतं. त्या विश्वचषकाचं यजमानपद ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे होतं.
सूर्यवंशीची तुफानी फलंदाजी
तिरंगी मालिकेत या दोन्ही संघांमध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात जे घडलं होतं, त्यानंतर या सामन्यात वैभव बराच संतुलित दिसला.
गेल्या सामन्यात त्याची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती. त्याचबरोबर त्यानं मैदानावर संयम दाखवला नाही म्हणूनदेखील त्याच्यावर टीका झाली होती.
त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना महत्त्वाचा होता. गेल्या चार डावांमध्ये त्याला अपयश आलं होतं आणि तो एकही अर्धशतक करू शकला नव्हता. त्यामुळे त्याच्या कामगिरीबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते.
मात्र जेव्हा रविवारी सकाळी तो क्रीजवर आला तेव्हा त्यानं जणूकाही खूणगाठ बांधली होती. त्यानं धडाकेबाज फलंदाजी करताना फिरकी गोलंदाज असो की जलदगती गोलंदाज असो कोणालाच सोडलं नाही.
तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांसाठी सज्ज आहे की नाही यावरही चर्चा होऊ लागली होती.
मात्र लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज असलेल्या वैभवनं या सामन्यात या सर्व शंका, प्रश्नांना त्याच्या फलंदाजीनं उत्तर दिलं.
गेल्या सामन्यातील वाद
सुपर ओव्हरमध्ये श्रीलंका-ए संघाविरुद्ध भारत-ए संघाचा पराभव झाल्यानंतर वैभवचा समोरच्या संघातील श्रीलंकन क्रिकेटरबरोबर जोरदार वाद झाला होता, धक्का-बुक्कीदेखील झाली होती.
दांबुला इथं खेळण्यात आलेल्या या जबरदस्त सामन्यात शेवटी वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेचा विशेन हलाम्बागे यांच्यात मैदानातच भांडण झालं होतं.
या दरम्यान वातावरण अतिशय तणावपूर्ण झालं होतं. श्रीलंका ए चा यष्टीरक्षक निरोशन डिकवेला वाद सोडवण्यासाठी आले आणि त्यांनी दोन्ही खेळाडूंना वेगळं केलं.
दांबुला इथं झालेल्या या सामन्यात भारत-ए संघानं पहिल्यांदा फलंदाजी करत 49.2 षटकात 265 धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंका-ए संघानं देखील 50 षटकांमध्ये 265 धावा केल्या होत्या.
श्रीलंका-ए सुपर ओव्हर 16 धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना भारत फक्त 9 धावाच करू शकला. त्यामुळे श्रीलंकेचा संघ विजयी ठरला.
त्याआधी अफगाणिस्तानच्या संघाविरुद्ध खेळताना पाऊस पडल्यामुळे सामन्याला फटका बसला होता. त्या सामन्यात डीएलएसच्या नियमानुसार भारताचा 4 धावांनी पराभव झाला होता.
तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारत-ए संघानं या मालिकेची सुरुवात याच श्रीलंका-ए संघाविरुद्ध कमी धावसंख्येच्या रोमांचक सामन्यात विजय मिळवून केली होती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.