पत्नीला 120 पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ठेवायचा पत्नीवर नियंत्रण

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

(या बातमीमधील काही माहिती अस्वस्थ करणारी असू शकते.)

स्वीडनमध्ये एका 61 वर्षीय व्यक्तीनं आपल्या पत्नीला 120 पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. या आरोपानंतर या व्यक्तीला चार वर्षे आणि पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हिंसेच्या धमक्या आणि सिक्योरिटी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याने आपल्या पत्नीवर नियंत्रण ठेवल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलं.

बलात्कार करण्याचा प्रयत्न, वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करणं, मारहाण आणि धमकावणं यांसारख्या अनेक गुन्ह्यांसाठी त्या व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलं आहे.

स्वीडनच्या पूर्व किनारपट्टीवरील हर्नोसँड (Härnösand) येथील न्यायालयानं हा निकाल दिला.

न्यायालयानं पैसे देऊन लैंगिक संबंध ठेवणाऱ्या इतर 28 पुरुषांनाही दोषी ठरवलं आहे.

या प्रकरणानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. काहींनी या प्रकरणाची तुलना फ्रान्समधील डॉमिनिक पेलिकॉट प्रकरणाशी केली आहे. ते प्रकरण तुम्ही इथे वाचू शकता.

पेलिकॉट आपली पत्नी जिझेल हिला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करायचा आणि नऊ वर्षे तिच्यावर इतर पुरुषांकडून बलात्कार करवून घ्यायचा.

स्वीडनच्या आंगरमानलँड प्रांतातील या व्यक्तीनं आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

तसेच, आपण केवळ परस्पर संमतीनं होणाऱ्या भेटींची व्यवस्था करण्यास मदत केली, असा दावा केला आहे.

मात्र, सरकारी पक्षाचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयानं नमूद केले की, त्यानं आपल्या पत्नीचं 'क्रूरपणे शोषण' केलं आहे.

कायदेशीर कारणांमुळे पती आणि पत्नी या दोघांचीही ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये या व्यक्तीनं आपल्या पत्नीला पैशांच्या बदल्यात पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यास सुरुवात केली.

अपमान आणि तिरस्काराची भाषा

देशाच्या विविध भागांमधून हे पुरुष क्रॅमफोर्समधील त्यांच्या एकांत असलेल्या फार्महाऊसवर येत असत. ऑक्टोबर 2025 मध्ये त्या महिलेनं पोलिसांकडे तक्रार करेपर्यंत हा प्रकार सुरूच राहिला.

सरकारी पक्षानं सांगितलं की, तो आपल्या पत्नीला अंमली पदार्थ देत असे.

त्या महिलेच्या पतीने तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक गोष्टींची व्यवस्था केली होती.

यासाठी त्याने पूर्व स्वीडनमधील त्याचे एकांतवासातील घर, मर्यादित सामाजिक संपर्क आणि घरात बसवलेले पाळत ठेवणारे कॅमेरे यांचा वापर केला.

काही कॅमेऱ्यांवर लैंगिक क्रियाही टिपल्या जात होत्या.

त्याने आपल्या पत्नीला जीवे मारण्याची, तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याची आणि तिची बोटे कापून टाकण्याचीही धमकी दिली होती.

स्वीडिश पब्लिक ब्रॉडकास्टर SVT च्या मते, त्या महिलेला घरात कॅमेरे कुठे कुठे बसवले आहेत, याची माहिती होती.

तिने कॅमेऱ्यांच्या कक्षेबाहेरील एका ठिकाणाहून निसटण्यात यश मिळवलं आणि त्यानंतर पोलिसांना फोन केला.

न्यायालयाला असं आढळून आलं की, त्या व्यक्तीनं आपल्या पत्नीला लैंगिक कृत्य चित्रित करण्यास आणि ते ऑनलाइन प्रसारित करण्यासही भाग पाडलं होतं.

त्याने आपल्या पत्नीला अधिक ग्राहक मिळवण्यास भाग पाडलं आणि शेजारी तसेच इतरांनाही लैंगिक संबंध ठेवण्यास राजी करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला.

न्यायालयानं नमूद केलं की, अनेक प्रसंगी त्याने दबाव आणून दीर्घ कालावधीपर्यंत हे सगळं घडवून आणलं. यासाठी त्याने अपमानास्पद आणि हीन भाषेचाही वापर केला.

28 पुरूष आढळले दोषी

न्यायालयानं असंही निरीक्षण नोंदवलं की, पैशांच्या बदल्यात लैंगिक संबंध ठेवण्याची कृती पतीकडूनच सुरू करण्यात आली होती.

मात्र, न्यायालयाने बलात्काराचे आठ आरोप फेटाळून लावले.

कारण, यामधील संबंधित महिलेचा सहभाग पूर्णपणे तिच्या इच्छेविरुद्ध होता, हे सिद्ध होऊ शकलं नाही.

एका प्रकरणामध्ये, नेमक्या कोणत्या लैंगिक क्रिया घडल्या होत्या, हे देखील स्पष्ट होऊ शकलं नाही.

पतीला कारावासाची शिक्षा तर दिली आहेच. त्याशिवाय, न्यायालयाने या पतीला त्या महिलेला नुकसानभरपाई म्हणून 2 लाख स्वीडिश क्रोनर देण्याचेही आदेश दिले आहेत.

स्वीडिश अधिकाऱ्यांनी लैंगिक सेवांसाठी पैसे देणाऱ्या 120 पुरुषांची ओळख पटवली होती. परंतु, त्यापैकी केवळ 29 जणांवरच आरोप ठेवण्यात आले.

आरोपींनी त्यांच्यावर ठेवलेले आरोप फेटाळून लावले. त्यातील अनेकांनी असं सांगितलं की, त्यांनी त्या महिलेशी कोणतेही लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत किंवा तिला कोणतीही रक्कम देखील दिली नाही.

तरीही, न्यायालयाने 28 जणांना दोषी ठरवले. त्यापैकी दोघांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली, तर इतरांना स्थगित शिक्षा देण्यात आली किंवा प्रोबेशनवर मुक्त करण्यात आलं.

'प्रोबेशन'चा निर्णय हा न्यायालयाचा असा एक शिक्षाविषयक निर्णय असतो, ज्यामध्ये दोषी ठरलेल्या व्यक्तीला कारावासाची शिक्षा न होता, विशिष्ट वर्तणुकीच्या अटींवर समाजात देखरेखीखाली मुक्त राहण्याची मुभा दिली जाते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)