You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉक्टरांशिवाय आरोग्य सेविकेनं केली प्रसूती, आईसह बाळाचा मृत्यू; आईच्या चितेच्या राखेत सापडली कात्री
- Author, गरिकपाटी उमाकांत
- Role, बीबीसीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील गुंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसताना वनजा नावाच्या महिलेची एका ANM कडून प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर आई आणि नवजात बाळाचा मृत्यू झाला.
ANM म्हणजे, Auxiliary Nurse Midwife म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्य सेविका किंवा सहाय्यक परिचारिका किंवा प्रसविका म्हणून कार्यरत असणारी आरोग्य कर्मचारी.
धक्कादायक बाब म्हणजे, बाळंतिणीच्या अंत्यसंस्कारानंतर तिच्या चितेच्या राखेत शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी कात्री सापडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय.
या घटनेची दखल घेत तेलंगणा मानवाधिकार आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
दुसरीकडे, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे तेलंगणाचे आरोग्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांनी एक्सवर सांगितले.
तसेच, त्या वेळी ड्युटीवर असलेल्या ANM ज्ञानेश्वरी यांच्यावर विभागीय कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
या पार्श्वभूमीवर गुंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (PHC नेमकं काय घडलं, याचा आढावा बीबीसीनं घेतला.
नेमकं काय घडलं?
भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील गुंडाळा मंडळातील दुर्गम आदिवासी भाग असलेल्या शंभुनिगुडेम येथील 20 वर्षीय गर्भवती वनजा यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर, 13 जून रोजी दुपारी सुमारे 12 वाजता गुंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलं.
त्या वेळी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदीप उपस्थित नव्हते. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या ANM ने प्रसूती केली.
मात्र, प्रसूतीनंतर नवजात बाळामध्ये कोणतीही हालचाल दिसून न आल्याने कर्मचाऱ्यांनी तिला पुढील उपचारांसाठी इल्लेंदू सरकारी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
पण, रुग्णवाहिका तब्बल दोन तास उशिरा, म्हणजे संध्याकाळी 4 वाजता आली. त्यानंतर बाळाला इल्लेंदू रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाल्याचं तेथील डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, वनजा यांचा रक्तस्राव थांबत नव्हता आणि गर्भाशयातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खम्मम सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्यानंतर मृत्यू झाल्याचं सांगितलं.
सरकारच्या निवेदनानुसार, "वनजा यांची गुंडाळा PHC मध्ये गर्भवती म्हणून नोंद करण्यात आली होती आणि माता-बाल आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची नियमित तपासणी करण्यात आली होती.
13 जून रोजी प्रसूती वेदनांसह त्या अत्यंत गंभीर अवस्थेत PHC मध्ये पोहोचल्या. त्यांनी बाळाला जन्म दिला. त्यानंतर अतिरक्तस्राव झाल्याने त्यांना तातडीची प्राथमिक उपचार सेवा देऊन प्रथम इल्लेंदू कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि नंतर खम्मम सरकारी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले."
निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप
गुंडाळा मधील आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणे प्रसूती केल्यामुळेच पत्नी आणि नवजात मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप वनजाचे पती संजीवा राव यांनी बीबीसीशी बोलताना केला.
ते म्हणाले, "प्रसूती वेदना सुरू होताच आम्ही आमच्या गावातून सुमारे 15 किलोमीटर अंतरावरील गुंडाळा येथील आरोग्य केंद्रात तिला घेऊन गेलो. तेथील कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती काळजी न घेता प्रसूती केली. त्यामुळेच आई आणि बाळाचा जीव गेला.
"बाळाचा मृत्यू झाला असूनही ते जिवंत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. प्रसूतीनंतर बाळामध्ये कोणतीही हालचाल नव्हती. आम्ही विचारणा केली असता, काही वेळा नवजात बाळ जन्मल्यानंतर सुरुवातीला असे दिसू शकते", असे सांगून अधिक चांगल्या उपचारासाठी इल्लेंदूला जाण्याचा सल्ला देण्यात आला.
"माझ्या मुलीचे वजन जन्मावेळी सुमारे तीन किलो होते. त्यामुळे PHC कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून आम्ही इल्लेंदूला गेलो. पण डॉक्टरांनी आम्हाला म्हटलं की, बाळ आधीच मृत अवस्थेत आणण्यात आले होते."
"गुंडाळा PHC च्या कर्मचाऱ्यांना आमच्या बाळाचा मृत्यू तिथेच झाल्याचे माहिती होते. आम्हाला तिथून पाठवून देण्यासाठीच इल्लेंदूला जाण्यास सांगितलं," असा आरोप संजीवा राव यांनी केला.
चितेच्या राखेत कात्री
पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्यामुळे संजीवा राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
ते म्हणाले, "इल्लेंदू रुग्णालयात माझ्या पत्नीचा रक्तस्राव थांबत नव्हता आणि त्या बेशुद्ध झाल्या. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी खम्मम सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. आम्ही त्यांना तातडीने खम्ममला नेले. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले. काही वेळाने त्यांची प्रकृती अधिक बिघडली आणि डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले.
"अंत्यसंस्कारानंतर धार्मिक विधी करताना वनजाच्या चितेची राख गोळा केली जात असताना उपचारासाठी वापरली जाणारी कात्री त्यामध्ये आढळली."
प्रकृती आधीच गंभीर होती - डॉ. सुदीप
वनजाच्या प्रसूतीच्या वेळी आपण PHC मध्ये उपस्थित नव्हतो, हे खरे असल्याचे गुंडाळा PHC चे डॉक्टर सुदीप यांनी बीबीसीला सांगितले.
दिवशी दुसऱ्या गावात लसीकरणाबाबत जनजागृती कार्यक्रम असल्यामुळे आपण तेथे गेलो होतो, असे त्यांनी सांगितले.
वनजाची प्रसूतीची संभाव्य तारीख 14 जून होती. त्यामुळे 13 जून रोजी आपण लसीकरण कार्यक्रमासाठी गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, "गर्भवती वनजा आरोग्य केंद्रातआली तेव्हाच तिची प्रकृती चांगली नव्हती. खरं तर ती रुग्णालयात पोहोचली तेव्हा बाळाचे डोके गर्भाशयातून बाहेर येण्याच्या स्थितीत होते. त्यावेळी परिचारिकाही उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे ANM ने काळजीपूर्वक प्रसूती करून बाळाला बाहेर काढले.
"मात्र, जन्मल्यानंतर बाळामध्ये कोणतीही हालचाल नव्हती. काही वेळा नवजात बाळ जन्मल्यानंतर लगेच हालचाल करत नाही, पण थोड्या वेळाने ती सुरू होऊ शकते. त्यामुळेच अधिक उपचारांसाठी इल्लेंदू रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.
"वनजाची प्रकृती लक्षात घेऊन तिलाही पुढील उपचारासाठी इल्लेंदू रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. प्रसूती प्रक्रियेत आमच्या कर्मचाऱ्यांकडून कोणताही निष्काळजीपणा झाला नाही. काही दुर्मीळ प्रसंगांमध्ये अशा घटना घडतात. ही खरोखरच दुर्दैवी घटना आहे."
भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुकाराम राठोड यांनी बीबीसीला सांगितले की, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. गुंडाळा PHC चे डॉक्टर सुदीप यांना आधीच निलंबित करण्यात आले असून, त्या दिवशी प्रसूती करणाऱ्या ANM आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचीही चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून चूक झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल."
घटनेच्या महत्त्वाच्या वेळी कर्तव्यावर अनुपस्थित राहिल्यामुळे गुंडाळा PHC चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदीप यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्याचे आदेश देण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या निवेदनात म्हटले आहे.
'कात्रीचा आमच्याशी काही संबंध नाही'
वनजाच्या अंत्यसंस्कारानंतर चितेच्या राखेत कात्री सापडल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे अशा कात्रीचा वापर करण्याची गरजच नव्हती, असे जिल्हा वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितले.
ते म्हणाले, "ही सामान्य प्रसूती होती. त्यामुळे कुठेही टाके घालण्याची आवश्यकता नव्हती. माझ्या सध्याच्या माहितीनुसार, ती कात्री शरीराच्या आतून आलेली नाही. त्या कुटुंबावर अन्याय झाला आहे, हे निश्चित आहे. त्यांना नुकसानभरपाई कशी आणि किती द्यायची, याचा निर्णय चौकशीनंतर वरिष्ठ अधिकारी घेतील."
मानवी हक्क आयोग आणि सरकारची कारवाई
प्रसूतीनंतर काही तासांतच आई आणि बाळाचा मृत्यू झाल्यामुळे तेलंगणा मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
संपूर्ण घटनेची सविस्तर चौकशी करून पूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आयोगाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी बीबीसीला दिली.
दुसरीकडे, तेलंगणा सरकारनेही या घटनेच्या सर्व बाजूंची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे.
या समितीत सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ. रवींदर नायक, संयुक्त संचालक (माता-बाल आरोग्य) डॉ. सुधीर, भद्राद्री कोठागुडेम जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. तुकाराम राठोड आणि डीसीएचएस डॉ. जी. रविबाबू यांचा समावेश आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, ही समिती संपूर्ण प्रकरणाची तपासणी करून आपला अहवाल सादर करणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)