You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत 'फिक्स्ड मॅच' आहे का?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत सामनामध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
या मुलाखतीत शरद पवार यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, महाविकास आघाडीतल्या पक्षांमधील मतभेद, देवेंद्र फडणवीसांचा सत्तास्थापनेचा दावा अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. पण, ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी टीकाही करायला सुरुवात केली.
काही जणांनी या मुलाखतीचं वर्णन 'स्वत:च मुलाखत घ्यायची आणि स्वत:च उत्तरं द्यायची' असं केलं आहे, तर 'तू मला हे प्रश्न विचार, मी तुला हे उत्तर देईल,' असंही मत काही जणांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.
त्यामुळे शरद पवांराची सामनातील मुलाखत ही फिक्स्ड मॅच आहे का, महाविकास आघाडीतल्या पक्षांमधील मतभेदावर सारवासारव करण्याचा प्रयत्न आहे का, हे जाणून घेण्याचा बीबीसी मराठीनं प्रयत्न केला.
'सामनाच्या मुलाखती फिक्स्ड मॅचच'
हा प्रश्न आम्ही ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांना विचारला. त्यावर सामनातील मुलाखती या फिक्स्ड मॅचच असतात, असं मत त्यांनी मांडलं.
ते म्हणाले, "सामनातील मुलाखती या फिक्स्ड मॅचच असतात. या मुलाखतीत नवीन काहीही नाही. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी भाजपबरोबर येणार होती, असं वक्तव्य केलं होतं. त्याला पवारांनी उत्तर तेवढं दिलं आहे. पण पवारांनी जे उत्तर दिलं, तेसुद्धा अपेक्षितच होतं."
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत दावा केला होता, की भाजप आणि राष्ट्रवादी काँगेस एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्तास्थापन करणार होते. त्यावर या मुलाखतीत खुलासा करत पवार म्हणाले की, "सरकार स्थापनेबाबत भाजपशी कधीच चर्चा झाली नाही. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते. त्यांना काही माहिती नाही."
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचं संवर्धन आणि मधल्या काळात सरकारच्या पातळीवर जे मतभेद निर्माण झाले, त्याचं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून झाल्याचं चोरमारे सांगतात.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या मते, शरद पवारांची सामनातील मुलाखतीत सरकारच्या तीन पक्षांमधील वातावरण चांगलं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते योग्य आहे.
देसाई सांगतात, "महाविकास आघाडीचं सरकार स्थिर राहणार नाही, असा समज पसरवण्यात भाजप यशस्वी झालं होतं. हाच समज शरद पवारांनी या मुलाखतीतून दूर केला आहे. याऊलट शिवसेना सोबत नसती, तर भाजपला 40 ते 50 जागा मिळाल्या असत्या, असं म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं स्थान कमी करण्याचा प्रयत्न केला आहे."
"विधानसभेला भाजपच्या आमदारांची जी 105 संख्या झाली, त्यात शिवसेनेचं योगदान मोठं आहे. त्यातून तुम्ही शिवसेना वजा केली तर हा आकडा तुम्हाला 40-50 च्या आसपास दिसला असता. भाजपचे लोक सांगतात की आम्हाला शिवसेनेनं दुर्लक्षित केलं किंवा सत्तेपासून दूर ठेवलं, पण ज्यांनी भाजपाला 105 पर्यंत पोहोचवलं, त्यांना भाजपनं गृहीत धरलं," असं शरद पवार यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.
मतभेदांवर सारवासारव?
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील मतभेद वेळोवेळी समोर आले आहेत. विधानपरिषद निवडणूक असो, पोलीस आयुक्तांच्या बदल्या असो की पारनेरमधील नगरसेवकांचं प्रकरण असो, या तिन्ही पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसच्या काही नेत्यांनी तर सरकारमध्ये आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रारही केली होती.
"काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारमध्ये विश्वासात घेतलं जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. असं असलं तरी आजच्या मुलाखतीतून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकजूट आहेत, असा इशारा काँग्रेसला देण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. याशिवाय आमच्यात मतभेद असले, तरी ते काही सरकार तुटेपर्यंत नाहीत, अशीही सारवासारव करण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतो," असं देसाई सांगतात.
तर या मुलाखतीतून शरद पवार शिवसेनेच्या म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत, असा इशारा काँग्रेसला देण्यात आला आहे, असं चोरमारे यांना वाटतं.
सामनाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या पक्षांमधील मतभेदांविषयी म्हटलं, "लॉकडाऊनसंदर्भात माझे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काहीएक मतभेद नाहीये, असं पवारांनी स्पष्ट केलं. "या सगळ्या काळात माझा मुख्यमंत्र्यांशी उत्तम संवाद होता आणि आजही आहे. प्रसिद्धी माध्यमांत काय आलंय ते येऊ द्या. दोन-तीन दिवसांत मी वाचतोय की, आमच्यात म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद वाढताहेत, अशा बातम्या आहेत. त्यात यत्किंचितही सत्य नाही. पण बातम्या येताहेत. येऊ द्या."
महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये विसंगती निर्माण झाल्यामुळे ही मुलाखत घ्यावी लागली, असं मत ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी व्यक्त करतात.
ते सांगतात, "महाविकास आघाडीच्या सरकारला 6 महिने पूर्ण झाले आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून अधिकार दाखवायला सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तांच्या बदल्यावरून ते स्पष्ट दिसून आलं. पण, उद्धव ठाकरे यांना हे सरकार टिकवायचं असेल, तर त्यांना बहुमताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत म्हणा, की भाजपसोबत म्हणा, कुठेही गेले तरी त्यांनी दुय्यम स्थानच स्वीकारावं लागणार आहे. जेव्हा केव्हा ते मुख्यमंत्री म्हणून अधिकार गाजवायला सुरुवात करतील, त्याक्षणी तिन्ही पक्षांमध्ये विसंगती सुरू होतील आणि हे सरकार कोसळेल."
ही मुलाखत आहे का?
राज्य सरकारवर जे जे म्हणून आरोप करण्यात आले, त्यावर शरद पवारांच्या तोंडून या मुलाखतीत उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. याशिवाय या मुलाखतीची सोशल मीडियावर टीझर टाकून एक हवा तयार करण्यात आली.
सामना आणि इतर वृत्तवाहिन्यांसाठी ही मुलाखत घेतली जात असल्याचं सांगण्यात आलं. इतर प्रसार माध्यमांनीही ही मुलाखत जशीच्या तशी वापरली. त्यामुळे मग ही मुलाखत आहे की, नियोजित प्रचार असाही प्रश्न निर्माण झालाय.
याविषयी व्यंकटेश केसरी सांगतात, "शरद पवार महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. गेल्या आठवड्यात ते दोनदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले आहेत. दुसरीकडे भाजपसारखा प्रबळ विरोधी पक्ष आहे. त्यामुळे मग माध्यमं शरद पवार जे म्हणतील ते दुर्लक्षित करू शकत नाहीत. माध्यमांना ही मुलाखत वेळेवर आणि आयती मिळाली आणि त्यांनी वापरली. जर ती सामनाकडून नसती मिळाली, तर त्यांनी ती दुसरीकडून मिळवली असती."
"या मुलाखतीत फारसं विशेष असं काही नव्हतं, पण या मुलाखतीचं राजकारण मात्र उत्तमरीत्या करण्यात आलं आहे. त्यातून जो संदेश द्यायचा, तो स्पष्टपणे देण्यात आला आहे," असं हेमंत देसाई सांगतात.
तर विजय चोरमारे यांच्या मते, "सामनानं वर्षभरापासून अशा रेकॉर्डेड मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. यातून दोन गोष्टी साध्य होतात, एक म्हणजे सामनाचं मार्केटिंग होतं आणि दुसरं म्हणजे इतर वाहिन्यांववर मुलाखत प्रसिद्ध झाल्यामुळे ती अनेकांपर्यंत पोहोचते. माध्यमांना काहीही खर्च न करता अशी मुलाखत मिळणार असेल, तर ते ती दाखवणारच आणि माध्यमांनी तशी ती दाखवलीही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)