अमेरिका-इराण यांच्यातील चर्चेला सुरुवात, आतापर्यंत काय घडलं?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

अमेरिका आणि इराण या दोन देशात युद्ध संपवण्यासंबंधी चर्चेला सुरुवात झाली आहे. ही चर्चा स्वित्झर्लंडमध्ये सुरू आहे.

गेल्या आठवड्यात युद्ध संपवण्यासाठी प्राथमिक करारावर स्वाक्षरी केल्यानंतर अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी थेट चर्चेसाठी स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले.

या करारात 60 दिवसांच्या आत अंतिम करार करण्याची कटिबद्धता तसेच लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील संघर्ष थांबवण्याचा आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा समावेश आहे.

मात्र, लेबनॉनमध्ये इस्रायल आणि इराणसमर्थित हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेल्या चकमकींमुळे इराणने शनिवारी ही सामुद्रधुनी बंद केल्याची घोषणा केली होती. तरीही जहाजांच्या हालचालींच्या आकडेवारीनुसार या मार्गातून जहाजांची ये-जा सुरू असल्याचे समजते.

उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी सांगितले की, अमेरिकेला 'अणु कार्यक्रमाशी संबंधित मुद्द्यावर' आणि लेबनॉनच्या प्रश्नावर प्रगती होण्याची अपेक्षा आहे. तर इराणने म्हटले की दुसरा पक्ष त्यांच्या वचनांची पूर्तता करेल अशी आमची मागणी असेल.

जेडी व्हेन्स यांच्यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हेही बर्गेनस्टॉक येथील रिसॉर्टमध्ये चर्चेसाठी उपस्थित आहेत.

इराणच्या बाजूने संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची शनिवारी उशिरा स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले.

या वाटाघाट्यांमध्ये मध्यस्थ म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि देशाच्या सशस्त्र दलांचे प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांचाही समावेश आहे.

संपूर्ण युद्धकाळात पाकिस्तानने मध्यस्थाची भूमिका बजावली असून, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची यापूर्वीची फेरीही पाकिस्तानमध्ये झाली होती.

अमेरिका आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी या आठवड्याच्या सुरुवातीला प्राथमिक करारावर स्वाक्षरी केली होती. युद्ध तत्काळ थांबवण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला.

या करारात इराणच्या 'पुनर्बांधणीसाठी' 300 अब्ज डॉलरचा निधी आणि अमेरिकेकडून इराणवरील 'सर्व प्रकारचे निर्बंध' हटवण्याचाही समावेश आहे.

मात्र, संघर्षाचे मुख्य कारण म्हणून अमेरिकेने ज्या इराणच्या अणु कार्यक्रमाचा उल्लेख केला आहे, त्या मुद्द्यावर अजून चर्चा होणे बाकी आहे. यासाठी 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून तो वाढवता येऊ शकतो.

दरम्यान, करार आणि शुक्रवारी झालेल्या शस्त्रसंधीनंतरही इस्रायल आणि इराणसमर्थित हिजबुल्लाह यांच्यातील चकमकी सुरूच आहेत.

इस्रायलने हिजबुल्लाहसोबतचा संघर्ष हा इराणविरुद्धच्या युद्धापासून वेगळा असल्याचा दावा केला आहे.

अमेरिका आणि इस्रायल यांनी 28 फेब्रुवारी रोजी संयुक्तपणे इराणविरुद्ध ही लष्करी कारवाई सुरू केली होती.

इराणचे सर्वोच्च नेते ठार झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट हल्ले केल्यानंतर काही काळातच लेबनॉनही या संघर्षात ओढला गेला.

यानंतर इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ल्यांची मोहीम सुरू केली आणि देशाच्या दक्षिण भागातील सुमारे 5 टक्के भूभागावर नियंत्रण मिळवले.

उत्तर सीमेपासून (इस्रायलच्या) हिजबुल्लाहच्या फायटर्सना दूर ढकलण्याचा हा प्रयत्न असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. तसेच या भागातून माघार घेण्याचा कोणताही विचार नसल्याचेही इस्रायलने स्पष्ट केले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)