You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे सरकारवर देवेंद्र फडणवीस यांची विदर्भ-मराठवाड्यावरून टीका
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारवर टीका केलीय.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!"
विशेष म्हणजे, फडणवीसांनी टीका करण्याच्या काही मिनिटं आधीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदनपर ट्वीट केलं होतं. मात्र, त्यानंतर अवघ्या तासाभरातच फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीकाही केली.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, नवाब मलिक आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन, शपथविधीच्या काही मिनिटं आधीच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर केला होता. याच किमान समान कार्यक्रमावर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब उत्तर दिलंय. ते पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर बोलत होते: "हे मंत्रिमंडळ कोणत्या विभागाचं आहे? ज्यांनी आमच्यावर टीका केली आहे, ते राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्याचं मंत्रिमंडळ निर्णय घेतं, ते राज्याचं. जर हे मंत्रिमंडळ राज्याचं नाही तर निर्णय कुणासाठी, याचा त्यांनी अभ्यास करावा."
सत्ता गेल्याचं किती दु:ख झालंय, हे दर्शवणारी टीका - सतेज पाटील
याबाबत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "सत्ता गेल्याचं दु:ख किती झालंय, हे दर्शवणारं ही टीका आहे. टीका स्वीकारली जातेच. मात्र, कॅबिनेट सुरू होण्याच्या आधीच टीका केली जाते, हे सत्ता गेल्याचं दु:ख दर्शवतं."
"कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाराष्ट्राचा आहे. कुठल्या एका विभागाचा नाहीय. पाच वर्षे तुम्ही काय केलंय, हे त्यांच्याच ट्वीटमधून लक्षात येतं," असंही सतेज पाटील म्हणाले.
तसेच, "निदान आजचा दिवस तरी मोठ्या मनानं फडणवीसांनी नव्या सरकारचं स्वागत करायला हवं होतं. आज टीका करणं संयुक्तिक नव्हतं. त्यांनी टीकेला शिष्टाचार म्हणत नाहीत," अशी खंतही सतेज पाटील यांनी व्यक्त केलं.
'ही महाराष्ट्राची परंपरा नाही'
विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस आक्रमक होते. सिंचन घोटाळा आणि इतर अनेक मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलं होतं. आता ते पुन्हा त्याच भूमिकेत जात आहेत का, असा प्रश्न आम्ही ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांना विचारला.
फडणवीसांचं टायमिंग चुकलं, असं बाळ यांना वाटतं : "हे अत्यंत चुकीचं आहे. कारण महाराष्ट्राची ही परंपरा नाहीये. शपथविधीनंतर ते विरोध करणार हे सगळ्यांनाच माहीत आहे. काही दिवसांत विश्वासदर्शक ठराव येईल, त्यानंतर काही दिवसात हिवाळी अधिवेशन येईल, यावेळी टीका करता आली असती. अगदी लगेच एका तासात टीका करणं असंस्कृतपणा झाला."
"विरोधाची एक परंपरा महाराष्ट्राला आहे. मात्र, काही संकेत पाळायला हवेत. महाराष्ट्रात आधी अशी लगेच टीका कधी कुणी केल्याचं मला तरी आठवत नाहीय," असंही प्रकाश बाळ म्हणाले.
'नातं असंच राहू दे'
शिवसेनेने लगेच फडणवीस यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली नाहीये. उलट संजय राऊत यांनी फडणवीसांचे आभार मानले आणि म्हणाले: 'शिवसेना मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहोळ्यास आवर्जून उपस्थित राहिल्या बद्दल मा.देवेंद्रजी फडणवीस व मा.चंद्रकांत पाटील यांना मनापासून धन्यवाद. हे नाते असेच राहू दे.'
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)