You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारती फुलमाळी : 'मुलासारखी दिसते' म्हणून ट्रोलिंग; पण कशालाच न जुमानता अमरावती ते टीम इंडियापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
- Author, जान्हवी मुळे आणि नितेश राऊत
- Role, बीबीसी न्यूज मराठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
ती सात वर्ष भारतीय संघातून बाहेर होती. तिच्या दिसण्यावरून तिला ऑनलाइन ट्रोलिंग सहन करावे लागले.
पण आता भारती फुलमाळीनं अमरावतीला क्रिकेट विश्वचषकाच्या नकाशावर आणलं आहे.
इंग्लंडमध्ये महिलांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजला हरवलं, त्यात भारतीची भूमिका महत्त्वाची ठरली.
विदर्भातील स्थानिक क्रिकेटपासून विश्वचषकाच्या मंचापर्यंतचा भारतीचा प्रवास हा जिद्द, चिकाटी आणि पराकोटीच्या मेहनतीमुळेच शक्य झाला आहे. स्वतःचा नव्यानं शोध कसा घ्यायचा हे कुणीही भारतीकडून शिकावं.
राष्ट्रीय संघापासून अनेक वर्षे दूर राहिल्यावर भारतीनं खालच्या क्रमांकावर फिनिशर म्हणून नव्यानं ओळख निर्माण केली. विमेन्स प्रीमियरलीगमध्येही लक्षवेधक खेळी केल्या. त्या कामगिरीनंच भारतीसाठी विश्वचषकाचं दारही उघडलं.
पण या सगळ्यादरम्यान तिला त्रास आणि अवहेलना झेलावी लागली. इंटरनेटवरच्या ट्रोल्सनी तिच्या दिसण्याची खिल्ली उडवली. पण भारती त्यासगळ्यांना पुरुन उरली.
भारतीच्या आईवडिलांशी बोलून आम्ही तिच्या वाटचालीविषयी जाणून घेतलं. आपल्या या लेकीचा भारतीच्या आईला, ज्योती फुलमाळी यांना, विशेष अभिमान आहे.
"मला भूषण वाटतं, की मी भारतीची आई आहे. माझ्या भारतीनं एवढं नाव कमावलं, आज तिच्यामुळे आमची ओळख आहे. अजून काय काय बोलू? तिचं कौतुक जेवढे केले तेवढे कमीच आहे."
त्या पुढे सांगतात, "दहा पोरं खेळायाची त्यात एकटीच पोरगी खेळायची माझी भारती. मी तिला कधीच अडथळे आणले नाहीत की बेटा तू जाऊ नको. तू खेळ, तुझं भविष्य आहे त्याच्यातच, असं सांगायचे. खूप चांगली खेळतो माझी भारती."
भारतीचे वडील श्रीकृष्ण फुलमाळी सांगतात, "मी शिक्षक आहे, पण बऱ्याच गोष्टी माझ्या मुलीकडून शिकलो आहे, नम्रता, जिद्द, बोलायचं कसं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम."
उसनं घेतलेलं किट ते टीम इंडियापर्यंतचा प्रवास
अगदी लहानपणापासून भारतीला खेळाची आवड होती, पण क्रिकेटवर तिचा जास्त जीव होता.
श्रीकृष्ण फुलमाळी सांगतात, "आधी आम्ही इथे गल्लीतच क्रिकेट खेळायचो. ती पाचवी-सहावीत असेल. बॅटिंग करताना तिनं मारलेला चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीला लागून काच फुटली.
"तो माझ्या घरी भांडत आला. मग मी निर्णय घेतला की गल्लीमध्ये खेळणं योग्य नाही. तिच्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतील."
श्रीकृष्ण मग भारतीला अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर घेऊन गेले. दिनानाथ नवाथे तिथे क्रिकेट शिकवायचे. त्याकाळी अमरावतीमध्ये क्रिकेटच्या फारशा सुविधा नव्हत्या आणि मुलींसाठी वेगळी व्यवस्थाही नव्हती.
भारती तेव्हा शिवकृपा हायस्कूलमध्ये शिकायची. मुख्याध्यापकांनी तिचा खेळ पाहिल्यावर श्रीकृष्ण यांना भेटून सांगितल की तुमची मुलगी उत्तम खेळते, तिच्यासाठी काही तरी करा.
अमरावतीतच ज्ञानमाता शाळेत एका क्रिकेट कँपसाठी भारतीला पाठवायचं ठरलं. तेव्हा पैसे उसने घेऊन त्यांनी खर्च निभावला.
श्रीकृष्ण तेव्हा खासगी शाळेत शिकवायचे. तुटपुंज्या पगारावर घर चालायचं. त्यांना भारतीशिवाय आणखी दोन मुली.
ज्योती यांना ते दिवस आठवतात, "तिचे वडील नोकरीशिवाय विहिरी खोदायच्या कामाला जायचे. माझ्या मुलीला काहीच कमी पडलं नाही पाहिजे, असंत्यांना वाटायचं. पण भारती म्हणायची, मला काही नको. फक्त बॅट-बॉल द्या."
असंच एकदा श्रीकृष्ण यांनी वृत्तपत्रात अमरावतीमध्ये निवड चाचण्या होत असल्याचं वाचलं. लगेचच भारतीला आणि तिच्या एका बहिणीला सायकलवर बसवून ते तिथे घेऊन गेले.
निवडीची वेळ संपली आली होती, त्यामुळे श्रीकृष्ण यांनी माझ्या मुलीला एक संधी द्या, अशी विनंती केली. सिलेक्टर्सनी परवानगी दिली, पण भारतीकडे काहीच साहित्य नव्हतं. मग तिथेच आलेल्या कुणाची तरी बॅट, कुणाचे तरी बूट, अशी जुळवाजुळव करून भारती खेळायला उतरली.
तिची फलंदाजी पाहताच प्रशिक्षक संदीप गावंडे धावत श्रीकृष्ण यांच्याकडे आले आणि आपल्या टीममध्ये तिची निवड झाल्याचं सांगितलं. तेव्हापासून भारतीचा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला.
वयाच्या तेराव्या वर्षापासून क्रिकेट खेळणाऱ्या भारतीनं पुढे 2011-12 च्या मोसमात अवघ्या सतरा वर्षांच्या वयात विदर्भाच्या सीनियर महिला संघात पदार्पण केलं. आक्रमक फटकेबाजीमुळे भारतीला काहींनी विदर्भाची 'लेडी ख्रिस गेल'ही म्हटलं.
2019 साली भारतीनं भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण इंग्लंडविरुद्ध गुवाहाटीत झालेल्या मालिकेतील दोन सामन्यांत तिला फारशा धावा करता आल्या नाहीत.
पुनरागमन
WPL च्या 2023 साली झालेल्या पहिल्या मोसमातही तिला संधी मिळाली नाही. निराश न होता भारती प्रयत्न करत राहिली, आपला खेळ सुधारतराहिली.
2024 साली गुजरात जायंट्सनं निवड केल्यावर भारतीनं WPLमध्ये काही लक्ष्यवेधक खेळी केल्या आणि 2026 साली भारताच्या ट्वेन्टी20 संघाततिचं पुनरागमन झालं.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बेनोनी इथे तिने 40 धावांची खेळीही केली. लगेचच सातत्यपूर्ण कामगिरीनं तिला ट्वेन्टी20 विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात स्थान मिळालं.
भारताची कर्णधार हरमनप्रीतनं भारतीच्या निवडीविषयी तेव्हा सांगितलं, "अमनज्योतची जागा कुणी भरून काढणं कठीण होतं, पण आम्ही भारतीला संधी द्यायचं ठरवलं.
"भारतीनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरीव कामगिरी बाजवली आहे आणि स्वतःला सिद्ध केलं आहे. WPL मध्येही ती उत्तम खेळली आणि महत्त्वाच्या क्षणी आपल्या टीमला जिंकून दिलं आहे."
हरमनप्रीतकडून या प्रवासात प्रेरणा मिळाल्याचं भारतीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
ती म्हणते, "मी हॅरी दीदीला फॉलो करत आले आहे. ती मॅचविनर आहे आणि दबावाखालीही उत्तम खेळते. मला तेच करायचं आहे, दबावात कसं खेळायचं, कसं स्वतःला त्यासाठी जुळवून घ्यायचं, हे शिकायचं आहे."
याआधी मोना मेश्राम 2017 सालच्या वन डेविश्वचषकात खेळली होती. भारताला तेव्हा उपविजेतेपद मिळालं होतं.
ट्रोलिंगचा सामना
WPL मध्ये एकीकडे भारतीच्या खेळाचं कौतुक होत होतं, तेव्हा काही लोक तिच्या दिसण्यावरून ट्रोल करू लागले. पण भारती मुलासारखी दिसते, अशी अवहेलना करू लागले.
त्याचा त्रास झाल्याचं भारतीनं गुजरात जायंट्सच्या एका व्हीडिओमध्ये सांगितलं होतं.
ती म्हणते, "माझ्या दिसण्यावरून, व्यक्तीमत्वावरून लोक प्रश्न विचारतात तेव्हा अतिशय वाईट वाटतं. खूप कमेंट्स येतात आणि त्या खूप नकारात्मक असतात. अर्थात चांगल्या कमेंट्सही असतात, पण त्याचं प्रमाण कमी असतं."
लहान केस आणि कमावलेलं पीळदार शरीर असलेल्या इतर महिला खेळाडूंनाही अशाच पूर्वग्रहांचा सामना करावा लागतो. अलीकडेच बीबीसीनं केलेल्या अभ्यासातून हीच गोष्ट समोर आली होती.
अशा ट्रोलिंगला आणि पूर्वग्रहांना सामोरं जाण्यास शिकल्याचं भारती सांगते, "मी मझ्या इतर सहकाऱ्यांशीही यावर चर्चा केली. त्यांनाही माझ्यासारख्याच गोष्टींना तोंड द्यावं लागतं. लोक काय विचार करतात, हे आपल्या हातात नाही. पण आपण काय पाहायचं आणि आपला दृष्टीकोन काय आहे, हे आपण ठरवू शकतो. आणि तेच खूप महत्त्वाचं आहे."
भारतीच्या आईवडीलांनाही या ट्रोलिंगमुळे खेद वाटतो. ज्योती सांगतात, "लोकांचा गैरसमज आहे की बा ही मुलगी आहे की मुलगा आहे. पण माझ्यासाठी माझी पोरगी काय आहे ते लोकांना काय कळणार?
"तिच्या त्या व्यक्तीमत्वावर कशाला जाता तुम्ही? तिच्या खेळाकडे, टॅलेंटकडे बघा. माझं लोकांना एवढंच म्हणणं आहे की तिच्याबद्दल असे वाईट विचार आणू नका किंवा वाईट विचाराने तिच्याकडे पाहू नका."
क्रिकेटचं बदलतं चित्र
एक वेळ अशी आली, की वडील निवृत्तीला पोहोचल्यावर घराला हातभार लागावा यासाठी भारतीला पोटापाण्याचा मार्ग शोधावा लागला.
इन्कम टॅक्स विभागात बंगळुरूला तिला नोकरी मिळाली. सोबतच तिनं क्रिकेटचा सरावही सुरू ठेवला.
भारतीनं खेळायला सुरुवात केली तेव्हा अमरावतीत एखादीच मुलगी क्रिकेट खेळताना दिसायची. आता दोनशेवर मुली क्रिकेट खेळतायत, असं तिचे वडील सांगतात.
स्वतः भारतीही त्यातल्या अनेकींना मदत करते आहे. अधिकाधिक मुलींनी खेळावं हा तिचा प्रयत्न आहे, असं ज्योती सांगतात.
पण सध्या तरी तिला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं आणि भारताला जिंकून देण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.