उद्धव ठाकरेंच्या शपथविधीत या 8 गोष्टींनी वेधलं सर्वांचं लक्ष

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी (28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

शिवसेनेशी भावनिक नातं असलेल्या शिवाजी पार्कवर सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी शपथविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सरकारमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उद्धव ठाकरे यांच्या या शपथविधी कार्यक्रमात खालील मुद्द्यांनी देशाचं लक्ष वेधून घेतलं.

1. उद्धव ठाकरे यांच्या शपथेची वेगळी सुरुवात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच इतर मंत्र्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने घेतलेली शपथ हे आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं. उद्धव ठाकरे भगवा सदरा परिधान करून तसंच कपाळावर भगवा टिळा लावून शपथविधी कार्यक्रमासाठी आले होते.

एरवी कोणतेही मंत्री शपथ घेताना राज्यपालांनी 'मी' म्हणून निर्देश दिल्यानंतर त्यापुढे त्यांचं नाव घेऊन शपथ घेत असतात. पण उद्धव ठाकरे यांनी असं न करता वेगळ्या प्रकारे शपथेची सुरुवात केली. "छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई-वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे..." या शब्दांनी शपथेची सुरूवात केली. शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राज्याच्या रजिस्टरमध्ये स्वाक्षरी केली. त्यानंतर त्यांनी उपस्थित जनतेसमोर डोकं टेकवून सर्वांना अभिवादन केलं.

2. मंत्र्यांची आगळीवेगळी शपथ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच इतर मंत्र्यांनीही शपथेची सुरूवात वेगळ्या प्रकारे केली. उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे शपथ घेण्यासाठी दाखल झाले. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, आई-वडिल तसंच उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला.

सुभाष देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शपथ घेत असल्याचं सुरूवातीला म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी सुरुवातीला फक्त शरद पवार यांचा उल्लेख केला. तसंच त्यांनी त्यांच्या आई कुसुम यांच्या नावाचाही उल्लेख केला.

तर छगन भुजबळ यांनी सुरूवातीला सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराज म्हणून साद घातली. महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या सर्वांचा उल्लेख केला.

काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी सुरुवातीला फक्त सोनिया गांधींच्या नावाचा उल्लेख केला. तर नितीन राऊत यांनी शपथ घेताना बाबासाहेब आंबेडकर आणि सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला.

3. पाच जणांची ईश्वरसाक्ष शपथ, एका मंत्र्यांचं गांभीर्यपूर्वक दृढकथन तर एका मंत्र्याने दिली भगवान बुद्ध यांची साक्ष

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली. तर मंत्री छगन भुजबळ यांनी शपथेदरम्यान गांभीर्यपूर्व दृढकथन करत असल्याचं सांगितलं. सर्वांत शेवटी शपथ घेतलेल्या नितीन राऊत यांनी तथागत भगवान बुद्ध साक्ष शपथ घेत असल्याचं सांगून मंत्रिपदाची शपथ घेतली.

4. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते उपस्थित

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील उपस्थिती होती. व्यासपीठाच्या एका बाजूला फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीष बापट आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.

5. राज ठाकरे यांची उपस्थिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शपथविधीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ते व्यासपीठावर आले. काहीकाळ ते शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांच्या बाजूला बसले. त्यानंतर तिथून उठून त्यांनी व्यासपीठावर उपस्थित नेत्यांची भेट घेतली.

राज ठाकरे यांनी काही वेळ व्यासपीठाच्या मागे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी सुद्धा चर्चा केली. त्यानंतर पुन्हा ज्येष्ठ शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या बाजूला येऊन ते बसले. शपथविधीनंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ते कार्यक्रमस्थळाहून रवाना झाले.

6. मुकेश अंबानींची उपस्थिती

रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी आणि मुलगा अनंत अंबानी हेसुद्धा शपथविधीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. नीता अंबानी यांनी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची गळाभेट घेतली. तसंच ते एकमेकांसोबत काही वेळ चर्चा करताना दिसून आले.

7. शेतकऱ्यांची उपस्थिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथविधीत सहभागी होण्यासाठी सांगलीहून पायी आलेले वारकरी दांपत्य संजयकुमार सावंत, रुपाली सावंत यांनाही व्यासपीठावर स्थान देण्यात आलं होतं, हे कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं.

8. देशातील इतर नेते

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, तामीळनाडूनचे विरोधी पक्षनेते एम. के. स्टॅलिन, ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल, अभिषेक मनू सिंघवी, मल्लिकार्जून खर्गे यांच्याशिवाय इतर नेते शपथविधीला उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)