मान्सूनविषयी हवामान विभागाने काय म्हटलं? पुढचे काही दिवस राज्यात 'इथे' उष्णतेच्या लाटेचा इशारा

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मान्सून लांबणीवर गेल्यानं महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता आणखी जाणवू लागली आहे.

राज्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराच हवामान विभागानं दिला आहे. मान्सून कुठे पोहोचला आहे, तो राज्यात कधी आगेकूच करेल आणि सध्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये काय अलर्ट दिले आहेत, जाणून घेऊयात.

नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात हर्णे आणि सोलापूरच्या आसपासच रेंगाळले आहेत. आठ जूननंतर म्हणजे गेल्या सहा दिवसांत मान्सूननं आगेकूच केलेली नाही.

दक्षिण कोकणातही जिथे मान्सून पोहोचला आहे, तिथेही पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा आणि गतीही थोडी मंदावलेली दिसते.

सॅटेलाईट दृश्यं पाहिली, तर महाराष्ट्रावर ढगांचं विरळ आवरणच दिसतं. पुढच्या चार ते पाच दिवसांत मान्सून राज्यात आगेकूच करू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

राज्यात पुढच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांत कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडरस्टॉर्म म्हणजे विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. भारत फोरकास्टिंग मॉडेलच्या अंदाजानुसार साधारण अठरा जूननंतर राज्यात काही ठिकाणी पाऊस सक्रीय होऊ शकतो.

पावसाचं प्रमाण कमी असल्यानं, यंदा जूनमध्ये उष्णतेची तीव्रता जास्तच जाणवते आहे. पुढचे तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी दिवसा पारा चाळीस अंश सेल्सियसच्या वरच राहतो आहे. पूर्व विदर्भात तो 42 अंशांपेक्षा जास्त राहू शकतो.

पण रात्रीचं किमान तापमानही कमी झालेलं नाही. रात्री विशेषतः विदर्भात नागपूर आणि चंद्रपूर परिसरात पारा 30 अंशांच्या खाली येत नाहीये. तसंच कोकणातही रात्रीच तापमान 28 अंशांवर राहताना दिसतंय.

14 जून रोजी कोकणात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत उष्ण रात्रीसाठी यलो अलर्ट दिला आहे. साताऱ्याचा पठारी भाग, सांगली, सोलापूर, नाशिक, संभाजीनगर, जालना, वाशिम, यवतमाळ इथेही तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट आहे.

15 जून रोजीही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान तसंच उष्ण रात्रीसाठी यलो अलर्ट दिला आहे. साताऱ्याचा घाट प्रदेश, कोल्हापूर, जळगाव, संभाजीनगर, जालना, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ इथेही तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट दिला आहे. 15 जूनला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि सोलापूरमध्ये थंडरस्टॉर्मसाठी यलो अलर्ट आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)