You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा 17 वा दिवस, 8.5 किलो वजन घटलं; कोण आहेत सोनम वांगचुक?
- Author, गीता पांडे, निकिता यादव
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"मी शरीराने अशक्त वाटत असलो, तरी मनाने खूप खंबीर आहे."
बीबीसी न्यूजने जेव्हा सोनम वांगचुक यांना सोमवारी (13 जुलै) भेट दिली तेव्हा त्यांनी हे सांगितले. उपोषणाच्या 16 व्या दिवशी त्यांनी बीबीसी न्यूजला मुलाखत दिली तेव्हा त्यांनी आंदोलनाबाबतचा निर्धार सांगितला.
मंगळवारी ( उपोषणाचा17 वा दिवस) जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिननुसार वांगचुक यांचं वजन तब्बल 8.5 किलोने कमी झालं. त्यांचं ब्लडप्रेशरही (रक्तदाब) 109/70 इतकं आहे.
त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. हजारो लोकांनी त्यांना उपोषण थांबवण्याचं आवाहन केलं.
परंतु, 59 वर्षीय वांगचुक हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. "मी सुरू केलेलं काम त्याच्या शेवटापर्यंत नेणार आहे," असं ते म्हणाले.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेलं हे आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) सुरू केलं आहे. ही संघटना भारतातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करत आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
त्यांचं म्हणणं आहे की, मे महिन्याच्या सुरुवातीला मेडिकल प्रवेश परीक्षेचे (नीट) पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्याची नैतिक जबाबदारी शिक्षण मंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे.
परंतु, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. तसेच सीजेपी आणि त्यांच्या समर्थकांना त्यांनी 'देशात गोंधळ माजवणाऱ्या (विघातक) शक्तींची बी-टीम' म्हटलं. देशाच्या प्रगतीवर त्यांचा विश्वास नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
लडाखचे अभियंता, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक 28 जूनपासून या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तेव्हापासून ते बेमुदत उपोषणावर आहेत.
स्वतःला महात्मा गांधींचे अनुयायी मानणारे सोनम वांगचुक म्हणतात की, त्यांचा गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाच्या विचारांवर विश्वास आहे. उपोषणाच्या माध्यमातून सरकारची सदसद्विवेकबुद्धी जागृत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
कोण आहेत सोनम वांगचुक?
'सोनम सर' म्हणून ओळखले जाणारे सोनम वांगचुक हे लडाखमधील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कामाचं कौतुक केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातही झालं आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या सोनम वांगचुक यांनी लडाखला हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करता यावा, यासाठी अनेक उपाय सुचवले आणि विकसित केले.
सोनम वांगचुक 'आइस स्तूप' या संकल्पनेसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. हा बौद्ध स्तूपापासून प्रेरित शंकूच्या आकाराचा कृत्रिम बर्फाचा स्तूप आहे. हिवाळ्यात तो पाणी साठवतो आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला गरज असताना तेच पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो.
सोनम वांगचुक यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यात 2018 मध्ये रेमन मॅगसेसे पुरस्काराचाही समावेश आहे. हा आशियातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
2009 मध्ये आलेल्या सुपरहिट 'थ्री इडियट्स' या चित्रपटातील मुख्य पात्राची प्रेरणा सोनम वांगचुक हेच होते. 2017 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातही ते विशेष पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लडाखमध्ये आंदोलन भडकवल्याचा आरोप करत सरकारने सोनम वांगचुक यांना अटक केली होती. परंतु, त्यांनी हे आरोप फेटाळले. सुमारे 170 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर सरकारने त्यांच्यावरील आरोप मागे घेतले आणि त्यांची सुटका केली.
सोनम वांगचुक निर्णयावर ठाम
दिल्लीत सध्या प्रचंड उकाडा आणि दमट हवामान असूनही, शेकडो लोक दिवस-रात्र जंतर-मंतरवर येऊन सोनम वांगचुक आणि सीजेपीला पाठिंबा देत आहेत.
अभिजीत दीपके यांनी सोमवारी बीबीसीला सांगितलं की, "आज (सोमवारी) त्यांच्या उपोषणाचा 16वा दिवस आहे. त्यांची रक्तातील साखर आणि रक्तदाब दोन्ही कमी झाले आहेत. जेव्हा जेव्हा ते बसण्याचा किंवा उभं राहण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना तीव्र चक्कर येते."
ते म्हणाले, "त्यांना वॉशरूमपर्यंत चालत जाणंही कठीण झालं आहे. त्यांना खूप त्रास होत आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांना उपोषण सोडण्यास सांगतो, तेव्हा ते मला रागावतात आणि 'माझी काळजी करू नकोस,'" असं म्हणतात.
अभिजीत दीपके यांच्या मते, डॉक्टरांनीही सोनम वांगचुक यांना उपोषण थांबवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
दीपके म्हणाले, त्यांना दररोज हजारो संदेश येत आहेत. त्यात अनेक जण वांगचुक यांना उपोषण सोडण्यासाठी समजावून सांगण्याची विनंती करत आहेत.
"परंतु, सोनम वांगचुक अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहेत."
दीपके यांच्या म्हणण्यानुसार, "त्यांनी म्हटलं आहे की, जोपर्यंत शिक्षण व्यवस्थेत सरकारकडून जबाबदारी निश्चित केली जात नाही, तोपर्यंत ते उपोषण मागे घेणार नाहीत."
वांगचुक यांच्या प्रकृतीची चिंता
जंतर-मंतरवर उपस्थित असलेले अनेक लोकही आता वांगचुक यांना उपोषण थांबवण्याची विनंती करत आहेत. त्यांची खालावत चाललेली प्रकृती पाहून ते चिंतेत आहेत.
हैदराबादमधील 29 वर्षीय अभियंता अनिमेष साहू म्हणाले, "मी त्यांचे व्हीडिओ पाहतच मोठा झालो आहे. त्यांच्याशी माझं भावनिक नातं आहे. त्यांच्या प्रकृतीची खूप चिंता वाटते. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला हवं, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे."
शेतकरी सत्यप्रकाश भारद्वाज यांनी वांगचुक यांना 'हिरा' म्हटलं. ते म्हणाले, "नव्या पिढीसाठी ते स्वतःचा जीवही धोक्यात घालायला तयार आहेत. त्यांनी आता उपोषण थांबवावं, अशी मी विनंती करतो. ते निरोगी राहिले तरच आपल्या मुलांसाठी पुढे लढू शकतील."
शिक्षणतज्ज्ञ प्रा. नंदिता नारायण म्हणाल्या, "सार्वजनिक जीवनात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीला सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण करावं लागणं, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे."
त्यांनीही वांगचुक यांना उपोषण थांबवण्याचं आवाहन करताना म्हटलं की, "त्यांच्या जीवाला धोका आहे. ही चळवळही दीर्घकाळ चालणार आहे. आंदोलनही दीर्घकाळापर्यंत सुरू ठेवावं लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जिवंत राहून या संघर्षाचं नेतृत्व करणं खूप आवश्यक आहे."
संसदेवर मोर्चा काढणार
वांगचुक यांनी उपोषण सुरू केल्यापासून विविध राजकीय पक्षांचे खासदार, सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स त्यांची भेट घेण्यासाठी जंतर-मंतरवर येत आहेत.
परंतु, अभिजीत दीपके म्हणाले की, सत्ताधारी भाजपचा एकही नेता अद्याप जंतर-मंतरवर आलेला नाही. तसेच सरकारकडूनही चर्चेसाठी कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही.
ते म्हणाले, "सरकार देशातील नागरिकांच्या मागणीकडे इतक्या सहजपणे दुर्लक्ष का करत आहे, हे समजत नाही. आम्ही फक्त जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत आहोत."
"आम्हाला किंवा सोनम वांगचुक यांना शिक्षणमंत्री करा, अशी आमची मागणी नाही. केवळ उत्तरदायित्व निश्चित केले जावे आणि परीक्षा योग्य प्रकारे घेण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षणमंत्र्यांची जबाबदारी निश्चित केली जावी, एवढीच आमची मागणी आहे."
सरकार चर्चेसाठी पुढे आले नाही, तर आम्हीच सरकारकडे जाऊ, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यांनी 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशनही याच दिवशी सुरू होणार आहे.
दीपके म्हणाले, "आम्ही गेल्या 24 दिवसांपासून येथे बसलो आहोत आणि सोनम सर गेल्या 16 दिवसांपासून उपोषणावर आहेत. तरीही सरकारने ना हस्तक्षेप केला, ना चर्चेला सुरुवात केली. त्यामुळे आता आम्हीच संसदेत जाऊन सरकारसमोर आमच्या मागण्या मांडणार आहोत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)