You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानात वैभव सूर्यवंशी आणि भारतीय क्रिकेटबद्दल सध्या सुरू आहे 'अशी' चर्चा
- Author, रशीद शकूर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
सध्या संपूर्ण जग फुटबॉलच्या उत्साहात मग्न आहे. सर्वांचे लक्ष फिफा विश्वचषकावर आहे. पण भारतीय क्रिकेट संघाचा आयर्लंड आणि इंग्लंडकडून झालेला सलग पराभव यावरही क्रीडा क्षेत्रात आणि प्रामुख्यानं क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
या निराशाजनक कामगिरीमुळे संपूर्ण भारतात टीकेची लाट उसळली आहे. भारतीय संघ व्यवस्थापन 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला न्याय देण्यात अपयशी ठरल्याचं म्हणच चाहते त्याला हवी तशी संधी मिळाली नसल्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत.
दोन वेळा टी-20 विश्वचषक विजेत्या भारतानं आयर्लंडविरुद्धचे दोन्ही टी-20 आंतरराष्ट्रीय सामने गमावले आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका 4-0 ने गमावली.
यासोबतच भारतानं फेब्रुवारी 2022 पासून टिकवून ठेवलेलं टी-20 क्रमवारीतलं अव्वल स्थानही गमावलं.
टी-20 मध्ये भारतानं अव्वल स्थान गमावणं ही निश्चितच एक मोठी गोष्ट आहे. पण सर्वाधिक चर्चेत आहे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी. त्याला इंग्लंडविरुद्ध तीन सामने खेळल्यानंतर चौथ्या अंतिम 11 मधून वगळण्यात आलं.
शंकर नारायण यांनी इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रात एका लेखात असा प्रश्न उपस्थित केला आहे की, यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार असलेल्या खेळाडूला भारतानं एका सामन्यासाठी संघाबाहेर ठेवलं आणि त्याच्या जागी अशा खेळाडूला संधी दिली ज्याचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात समावेशही नव्हता.
या सामन्यात सूर्यवंशीला वगळून संजू सॅमसनला खेळवण्यात आलं होतं.
क्रिकेट चाहत्यांचा संताप
वैभव सूर्यवंशीनं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करताना 14 धावा केल्या. तर तिसऱ्या सामन्यात 13 धावा आणि चौथ्या सामन्यात 15 धावा केल्या.
आयपीएलमधील शानदार कामगिरीनंतर त्याची भारतीय संघात निवड झाली. त्याने 237 च्या स्ट्राईक रेटने 776 धावा केल्या, त्यात ७२ षटकारांचा समावेश होता.
त्याला तीन सामन्यांनंतर संघातून वगळल्यानं भारतात संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव झाला आणि अनेक माजी कसोटी क्रिकेटपटूंनीही यावर मत मांडलं आहे.
सोशल मीडियावर एका कमेंटमध्ये असं म्हटलं आहे की, पाचव्या सामन्यातून वगळल्यानंतर सूर्यवंशी डगआऊटमध्ये एकटा बसलेला आणि अत्यंत निराश दिसला.
कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हा एक अत्यंत कठोर निर्णय असल्याचं म्हटलं.
भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर हे देखील सूर्यवंशीला अंतिम टी-20 सामन्यातून वगळल्याने खूश नव्हते.
"जर हा सामना मालिकेचा निकाल लावणारा असता, तर सूर्यवंशीला न खेळवणं समजण्यासारखं होतं. पण तसं नव्हतं. केवळ तीन सामन्यांनंतर 15 वर्षांच्या खेळाडूला संघातून वगळणे योग्य नाही. माझ्या मते, कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर द्यायला हवा की हा शेवट नाही," असं गावस्कर म्हणाले.
तर रवी शास्त्री यांनी, "सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्धच पदार्पणाची संधी मिळायला हवी होती", असं मत मांडलं.
इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅम स्वान यानंही सूर्यवंशीला संघातून वगळण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं. तो म्हणाला की, सूर्यवंशी हा त्याच्या पिढीतील एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि केवळ तीन सामन्यांनंतर त्याला वगळणे अन्यायकारक आहे.
पाकिस्तानात काय आहे प्रतिक्रिया ?
फक्त भारतातच नाही, तर पाकिस्तानातही इंग्लंडविरुद्ध भारताच्या पराभवाची आणि विशेषतः वैभव सूर्यवंशीबद्दल चर्चा सुरू आहे.
पाकिस्तानचे माजी कर्णधार रशीद लतीफ बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना म्हणाले की, "या दौऱ्यावर भारतीय संघ अतिआत्मविश्वासात होता. त्यांनी इंग्लंडला हलक्यात घेतलं, पण त्यांच्या स्वतःच्या घरच्या वातावरणात इंग्लंड हा एक उत्कृष्ट टी-20 संघ आहे."
दुसरीकडं, भारतीय खेळाडू गेल्या काही काळापासून आयपीएल आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या घरच्या खेळपट्ट्यांवर खेळत आहेत. त्यामुळं जे घडलं ते पूर्णपणे अनपेक्षित नव्हतं.
"जिथंपर्यंत सूर्यवंशीचा प्रश्न आहे, जर त्याची संघात निवड झाली होती तर त्याला पूर्ण संधी द्यायला हवी होती. संघ व्यवस्थापनाने वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन या दोन खेळाडूंना वाया घालवलं," असं ते म्हणाले.
भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार, सूर्यकुमार यादवलाही संघातून वगळले. कर्णधार आणि नेता यांच्यातील हाच फरक आहे. तो सातत्याने संघाला विजयाकडे नेत होता. हे खरं आहे की त्याच्या कामगिरीत घसरण झाली होती, पण असे असूनही त्याला संघातून वगळायला नको होते, असंही त्यांनी म्हटलं
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वाहीद खान बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाले की, "सूर्यवंशीला आणखी एक संधी देण्यात काहीच हरकत नव्हती. त्याला शेवटच्या टी-20 सामन्यातून वगळण्यात आले हे आश्चर्यकारक आहे. या निर्णयामुळं त्याच्या आत्मविश्वासावर नक्कीच परिणाम झाला असेल."
वाहीद खान म्हणाले, "या तरुण फलंदाजात प्रतिभा आहे यात शंका नाही. पण या दौऱ्यावर इतर भारतीय फलंदाजांना ज्या समस्येचा सामना करावा लागला, त्याच समस्येचा त्यालाही सामना करावा लागला. आयपीएलमध्ये फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्ट्या आणि लहान सीमा असलेल्या मैदानांवर तो खेळून आला होता. त्याला चांगली सुरुवात मिळाली, पण मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात त्याने विकेट गमावली."
भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीवर वाहीद खान म्हणाले, "हे निकाल पूर्णपणे अनपेक्षित आहेत. भारतीय संघ अशा प्रकारे पराभूत होईल, विशेषतः आयर्लंडविरुद्ध, असे कोणालाही वाटले नव्हते. याचे एक कारण म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्यास आलेली अडचण, कारण संघ आयपीएलच्या खेळपट्ट्यांवर खेळून थेट इंग्लंडमध्ये पोहोचला होता."
"दुसरे प्रमुख कारण म्हणजे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, ज्यांनी सातत्याने अनावश्यक बदल केले. असं दिसतं की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाच्या प्रकाराशी ते अजून पूर्णपणे जुळवून घेऊ शकलेले नाहीत," असंही ते म्हणाले.
गौतम गंभीरची भूमिका
पाकिस्तानचे माजी कसोटी क्रिकेटपटू बाझिद खान म्हणाले, "सूर्यवंशी एक अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे हे सर्वांना माहीत आहे, पण त्याच्या कारकिर्दीची खूप काळजीपूर्वक आखणी करण्याची गरज आहे."
टी20 क्रिकेटमध्ये खूप लवकर चढ-उतार येतात आणि खेळाडू लवकर अपयशी ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोपं नाही. सूर्यवंशीला पूर्णपणे तयार होण्यासाठी वेळ लागेल.
"मात्र, त्याला आयर्लंडविरुद्ध पदार्पणाची संधी न देणे हे सर्वांसाठी आश्चर्यकारक होते. जेव्हा तुम्ही त्याला इंग्लंडसारख्या मोठ्या संघाविरुद्ध संधी दिली, तेव्हा त्याला पूर्ण संधी द्यायला हवी होती," असं ते म्हणाले.
इंग्लंडविरुद्धच्या भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, सर्व खेळाडू आयपीएलमध्ये फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्ट्या आणि लहान सीमांवर खेळून आले होते, तर आयर्लंड आणि इंग्लंडमधील परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. याशिवाय संघात अनेक बदलही करण्यात आले होते.
विश्लेषक डॉ. नौमान नियाझ भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीसाठी गौतम गंभीरला सर्वाधिक जबाबदार धरतात. त्यांच्या मते, गंभीर या भूमिकेसाठी पुरेसे तयार नाही.
"गौतम गंभीरच्या आगमनापासून संघाची परिस्थिती कशी बदलली आहे, हे सर्वांना स्पष्ट दिसत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांना एकामागून एक, एका फॉरमॅटमधून किंवा संपूर्ण संघातून वगळण्यात आल्याचे सर्वांनी पाहिले आहे. संघ समन्वयातील गौतम गंभीरच्या चुका हे देखील पराभवाचे एक प्रमुख कारण ठरले आहे."
जिथपर्यंत सूर्यवंशीचा प्रश्न आहे, तो एक अपवादात्मक कौशल्य असलेला खेळाडू आहे. आगामी सामन्यांसाठी त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्याला आयर्लंडविरुद्ध खेळवायला हवे होते. एवढेच नाही, तर याचा संजू सॅमसनसारख्या सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूच्या आत्मविश्वासावरही नकारात्मक परिणाम झाला, असं मत व्यक्त होत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)