ब्रेकिंग, शिरुरचे 9 विद्यार्थी युक्रेनमधून पोलंडला पोहोचले
शिरुरचे 9 विद्यार्थी युक्रेन सीमा ओलांडून पोलंडला पोहोचले आहेत. खारकीव्ह राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठाचे हे सर्व विद्यार्थी आहेत. सहा दिवस बंकरमध्ये राहिल्यानंतर मंगळवारी (1 मार्च) त्यांनी खारकीव्ह सोडलं.
खारकीव्ह ते लिव्हिव्ह असा 18 तासांचा प्रवास त्यांनी रेल्वेने केला. लिव्हिव्ह ते युक्रेन-पोलंड बॉर्डर ते बसने गेले. त्यासाठी त्यांना 14 तासांचा प्रवास करावा लागला.
आता ते पोलंड सीमेवर सरकारी निवारागृहात राहत आहेत.
"आम्ही कसेबसे आता पोलंडला पोहचलो आहोत. थंडी खूप आहे. जवळपास 400 विद्यार्थी अजून खारकीव्हलाच अडकले आहेत. काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून चालत येत आहेत." अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.








