You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इटली : कमी कपड्यातल्या महिलेच्या शिल्पावरून वाद
तांब्यात घडवण्यात आलेल्या एका शिल्पावरून इटलीत वाद निर्माण झालाय. 19व्या शतकातल्या एका कवितेच्या स्मरणार्थ घडवण्यात आलेला हा पुतळा आहे. पण त्यावरून आता सेक्सिझम' (महिलाविरोधी विचारसरणी) बाबत वाद निर्माण झाला आहे.
हा पुतळा ज्या महिलेचा आहे तिने तोकडे आणि पारदर्शक कपडे घातल्याचं दाखवण्यात आलं असून या महिलेचा एक हात तिच्या स्तनावर असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
पण आता या पुतळ्यावरून वाद एवढा वाढला आहे की, तो हटवण्याची मागणी केली जात आहे.
हा पुतळा इटलीच्या दक्षिणेत असलेल्या सप्री शहरातमध्ये बसवण्यात आली आहे. इटलीचे प्रसिद्ध कवी लुइझी मिरकन्तिनी यांच्या 'ला स्पिगोलात्रिचे दी सप्री' या कवितेच्या सन्मानार्थ हे शिल्प करण्यात आलं आहे.
वादाचं कारण काय?
या पुतळ्यावरुन इटलीच्या राजकीय आणि सामाजिक गटांमध्ये वादाला सुरुवात झाली. इटलीच्या इतिहासातली महिलांची भूमिका यावरून हा वाद सुरू झालाय.
"एखादी संस्था महिलांचं केवळ एका लैंगिक पद्धतीनं, शारीरिक रुपानं करण्यात आलेलं सादरीकरण कसं स्वीकारू शकते? पुरुषवाद ही इटलीतील अत्यंत वाईट बाब आहे," असं ट्वीट सांस लॉरा बोलद्रिनी यांनी केलंय.
19 व्या शतकातील ज्या कवितेच्या सन्मानार्थ हा पुतळा तयार करण्यात आला आहे, ती कविता एका महिलेच्या दृष्टीकोनातून लिहिण्यात आली आहे. ही महिला शेतांमध्ये शिल्लक राहिलेलं धान्य जमा करते.
कवितेची ही नायिका धान्य गोळा करण्याचं काम सोडून, इटलीतल्या क्रांतिकारी आंदोलनात सहभागी होते. या आंदोलनात 300 जण मारले गेले होते.
या पुतळ्याचं उद्घाटन रविवारी इटलीचे माजी पंतप्रधान जोजेप्पे कॉन्ते तसंच राष्ट्रीय आणि स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं आहे.
पुतळा हटवण्याची मागणी
महिला नेत्यांच्या एका गटाने हा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे. "पुन्हा एकदा स्वतःला केवळ लैंगिकदृष्टीनं तयार करण्यात आलेल्या शरिराच्या रुपात पाहून आम्हाला लाज वाटतेय," असं त्यांनी म्हटलं आहे.
"या पुतळ्याचा सामाजिक किंवा राजकीय मुद्द्याशी काही संबंध नाही, किंवा त्या शिल्पाचं काही अस्तित्वही नाही," असंही त्यांनी म्हटलं आहे.
डेमोक्रॅटिक पार्टीच्या खासदार मोनिका चिरिन्ना यांनी, ही मूर्ती म्हणजे महिला आणि इतिहासाच्या तोंडावर लगावलेली चपराक असल्याचं म्हटलं आहे.
"हे शिल्प अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेऊन, धान्य गोळा करण्याच्या कामावर जाणं बंद करणाऱ्या महिलेचं काहीही वर्णन करत नाही," असं ट्वीट त्यांनी केलं.
तर, शहराच्या महापौर अँटोनियो जेंटीले यांनी मात्र एका फेसबुक पोस्टद्वारे पुतळ्याची पाठराखण केली आहे.
या पुतळ्याचे शिल्पकार इमॅन्युअल स्तिफानो यांनी 'कौशल्याने आणि विचारपूर्वक' काम केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शिल्पकारानं काय म्हटलं?
शिल्पकार स्तिफानो यांनीही या संपूर्ण मुद्द्यावर एक फेसबुक पोस्ट लिहिली. यावरून झालेल्या टीकांमुळं नाराज आणि निराश असल्याचं त्यांनी म्हटलं.
पुतळा पुरुषाचा असो वा महिलेचा, आपण नेहमीच तो कमीत कमी कपड्यांनी झाकण्याचा प्रयत्न करतो, असं त्यांनी म्हटलंय.
या पुतळ्याच्या डिझाईनला अधिकाऱ्यांनीही मंजुरी दिली होती, असंही स्तिफानो यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)