लॉकडाऊनमध्ये बायकोशी भांडून 450 किमी पायी प्रवासाला निघालेल्या माणसाची गोष्ट

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

नवरा-बायको म्हटलं की वाद-विवाद, भांडण, रुसवे-फुगवे हे सारं आलंच. पण बायकोशी भांडण झालं म्हणून कुणी 450 किमी पायपीट केली, असं सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही. इटलीमध्ये मात्र असं घडलं आहे.

इटलीत बायकोशी भांडण झाल्यावर संतापलेल्या एका व्यक्तीने राग शांत करण्यासाठी चालायला सुरुवात केली आणि एक-दोन नाही तर चक्क 450 किमी रस्ता पालथा घातला.

इटलीच्या सोशल मीडियावर सध्या या व्यक्तीची चांगलीच चर्चा सुरू आहे. त्याला लोकांनी 'फॉरेस्ट गंप' नाव दिलं आहे. 1994 साली आलेल्या हॉलीवुड सिनेमातला हा नायक होता. अमेरिकेत हजारो किमी धावणाऱ्या एका नायकाची ती गोष्ट होती.

तब्बल आठवडाभर तो चालत होता. मात्र, म्हणतात ना आगीतून फुफाट्यात… तसाच काहीसा प्रकार या व्यक्तीच्या बाबतीत घडला.

बायकोवरचा राग शांत करण्यासाठी निघाला आणि संचारबंदीचं उल्लंघन केलं म्हणून 485 डॉलर्सचा दंड भरावा लागला. त्याला फानो या शहरात रात्री 2 वाजता पोलिसांनी अडवलं आणि दंड आकारला.

एका स्थानिक वृत्तपत्रात ही बातमी छापून आली आणि बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाली. लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया मिळाल्या.

काहींनी त्याला हिरो म्हणत दंड आकारणं चुकीचं असल्याचं म्हटलं. या व्यक्तीला खरंतर पुरस्कार मिळायला हवा आणि नवीन शूजही, अशी प्रतिक्रिया एकाने दिली.

तर रागाच्या भरात बरेचदा माणसाकडून हिंसक कृत्य घडतं. मात्र, या व्यक्तीने पायी चालून आदर्श घालून दिला आहे, अशी कौतुकाची थापही अनेकांनी दिली.

"आपण गाडी आणलेली नाही. पायी आलोय," असं या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं. रोज जवळपास 60 किमी पायी चालल्याचं आणि रस्त्यात लोकांनीच खायला-प्यायला दिल्याचंही ते म्हणाले.

"चालून-चालून थोडा थकवा आल्याचं" त्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांना ते रात्रीच्या थंडीत कुडकुडत किनारपट्टीवर फिरताना दिसले होते.

ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी डेटाबेसमध्ये या व्यक्तीची माहिती तपासल्यावर त्यांच्या पत्नीने पती हरवल्याची पोलीस तक्रार दिल्याचं पोलिसांना कळलं. पोलिसांनी त्यांच्या पत्नीशी संपर्क साधल्यावर त्या पतीला नेण्यासाठी फोनाला गेल्या.

मात्र, 485 डॉलर्सच्या दंडाविषयी पत्नीची काय प्रतिक्रिया होती, हे मात्र सांगण्यात आलेलं नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)