You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ICC World T-20: भारतात तीन वर्षात दोन वर्ल्डकप
आयसीसी मेन्स ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी भारतातच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणारा ट्वेन्टी-20 वर्ल्डकप आता 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येईल. महिलांचा 50 ओव्हर्सचा वर्ल्डकप आता 2022 मध्ये होणार आहे. आयसीसीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
यंदा होणारा ट्वेन्टी-20 वर्ल्डकप कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्ष पुढे ढकलण्यात आला आहे. पुढच्या वर्षी भारतात ट्वेन्टी-20 वर्ल्डकप होणार होता. आयसीसीने भारताचे वर्ल्डकप यजमानपद कायम ठेवले आहे. भारतात 2023 मध्ये 50 ओव्हर्सचा वर्ल्डकपही होणार आहे. यामुळे दोन वर्षांच्या अंतरात भारत दोन वर्ल्डकपच्या आयोजनाचा मानकरी ठरणार आहे.
ट्वेन्टी-20 वर्ल्डकप दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो. परंतु 2020 आणि 2021 मध्ये सलगच्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करणार असल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं होतं. कोरोनामुळे यंदाचा वर्ल्डकप 2022 मध्ये गेल्याने आता 2021 मध्ये भारतात तर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात असे ट्वेन्टी-20 वर्ल्डकप होतील. त्यामुळे पुढील वर्षभर आयसीसीकडून पुरुष आणि महिलांच्या विभागासाठी कोणत्याही जागतिक स्पर्धेचं आयोजन होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
पात्र संघच 2021 चा ट्वेन्टी-20 वर्ल्डकप खेळतील असं आयसीसीने स्पष्ट केलं. 2020च्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेले सर्व संघ 2021 मध्ये भारतात होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरतील. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांच्यासह नेदरलँड्स, पापुआ न्यू गिनी, आयर्लंड, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान हे संघ खेळतील. 2022 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी नव्याने पात्रता फेरी आयोजित करण्यात येतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)