कोरोना ब्राझीलः मृतांची संख्या एक लाखांहून अधिक

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एक लाखाहून अधिक झालीय. जगभरात कोरोनाच्या मृतांच्या आकडेवारीत अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर ब्राझील आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीच्या तीन महिन्यात 50 हजार जणांचा मृत्यू झाला. मात्र, गेल्या केवळ 50 दिवसात 50 हजार जणांच्या मृत्यूची नोंद झालीय.

ब्राझीलमधील कोरोनाच्या रुग्णसंख्येनं 30 लाखांचा टप्पा पार केलाय. तरीही ब्राझीलमध्ये चाचण्या अजूनही कमी प्रमाणात होत असल्याचं म्हटलं जातंय. जर चाचण्या वाढल्या, तर रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीतीही वर्तवली जातेय.

एकीकडे ब्राझीलमध्ये कोरोनानं थैमान घातलं असताना, ब्राझीलच्या राष्ट्रपती मात्र निर्धास्त दिसतात. त्यांनी दुकानं, रेस्टॉरंट वगैरे सुरू केलेत. अर्थव्यवस्थेला अडचणीत आणणाऱ्या निर्णयांचा त्यांनी विरोध करून एकप्रकारे कोरोनाच्या संकटाला कमी लेखण्याचा प्रयत्न केलाय.

जुलै 2020 मध्ये बीबीसीनं ब्राझीलमधील कोरोनाच्या परिस्थिचा आढावा घेतला होता. तो आढावा खालीलप्रमाणे :

ब्राझीलमध्ये कोरोनाचा थैमान

मार्च महिन्यापासून ब्राझीलमध्ये सुरू असलेला कोरोनाचा कहर थांबण्याचं नाव घेत नाही.

दक्षिण अमेरिकेतील एक महत्त्वाचा देश म्हणून ब्राझीलची ओळख आहे. पण कोरोना व्हायरसमुळे ब्राझीलचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. खालील फोटो पाहिल्यास तुम्हाला ब्राझीलमधल्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.

ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग इतर देशांच्या तुलनेत थोडा उशिराने सुरू झाला.

इथल्या अॅमेझॉन परिसराला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. इथंच सर्वात जास्त कोव्हिड-19 रुग्ण आढळून येत आहेत.

या परिसरात शवपेट्यांची टंचाई निर्माण होऊ शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या मोठी असल्यामुळे मोठ्यामोठ्या स्मशानभूमींची सोय करावी लागत आहे.

अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये या व्हायरसला रोखणं आणखीनच कठीण काम आहे. या परिसरात पूर्वीपासूनच कुपोषण आणि गरीबीने थैमान घातलं होतं.

इथल्या आदिवासी जमातींचा अधिवास असलेल्या परिसरात कोरोनाचा प्रसार सर्वात जास्त झाला आहे. राजधानीत मानूस या जमातीची लोकसंख्या मोठी आहे.

या लोकांची घरं मुख्य शहर आणि आरोग्य केंद्रांपासून लांब आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्य सुविधा लवकर मिळू शकत नसल्याची तक्रार पूर्वीपासूनच होती.

शहराच्या बाहेरील भागात राहणाऱ्या वेंडरलेसिया अॅर्टिगा डोस सँटोन या एक नर्स आहेत. सँटोन या लोकांची मदत करण्यासाठी तयारी करत आहेत. त्या स्वतः या समुदायातल्याच आहेत. या परिसरातील सुमारे 700 कुटुंबांसाठी सँटोन जमेल त्या प्रकारे मदत करत आहेत.

ब्राझीलमध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातील परिसरात लोक शवपेट्या घेऊन जाताना दिसणं हे रोजचंच चित्र बनलं आहे.

देशातील उत्तर भागात असलेल्या पारा या राज्यातही असंच चित्र पाहायला मिळालं. ही शवपेटी पुढे एका स्मशानभूमीमध्ये नेऊन दफनविधी पार पाडला. हा परिसर अॅमेझॉन नदीच्या किनाऱ्याला लागूनच आहे.

पण ब्राझीलच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग नुकताच सुरू झाला आहे.

रिओ दी जानेरिओ आणि साओ पावलोमध्ये व्हायरसचा संसर्ग होण्यास काही आठवड्यांपूर्वीच सुरुवात झाली होती. पण इथल्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त आहे.

मे महिन्यात साओ पावलोच्या महापौरांनी आरोग्य सुविधा योग्य प्रमाणात नसल्याचा इशारा दिला होता. रुग्णलाय आणि बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली होती. अन्यथा संसर्ग वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल, असंही महापौर म्हणाले होते.

हे रुग्णालय एका जिममध्ये तयार करण्यात आलं आहे. पण एकीकडे कोरोनाचा संसर्ग बेसुमार वाढत असूनही देशात लॉकडाऊन लावण्यात आला नाही. अजूनही ब्राझीलमध्ये लॉकडाऊन कर

ण्यात आलेला नाही.

राज्य आणि शहरांनी आपापल्या पद्धतीने नियम बनवले आणि त्यांचं पालन केलं. पण या मुद्द्यावर अनेक ठिकाणी निदर्शनं झाली. आकडे वाढत असल्याचं समोर आल्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली.

ब्राझीलमधील कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढत असल्याचं पाहून राष्ट्राध्यक्ष बोलसेनारो यांनी लोकांना घरीच थांबण्याबाबत आदेश जारी केला. शिवाय काही प्रतिबंधही लागू करण्यात आले.

पण बोलसेनारो यांनी कधीच लॉकडाऊनचं समर्थन केलं नाही. बोलसेनारो हे स्वतः ब्राझिलियामध्ये झालेल्या लॉकडाऊन विरोधी निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.

बोलसेनारो सुरुवातीपासूनच कोरोना व्हायरस साधारण फ्ल्यू असल्याचं सांगत आहेत. व्हायरसला हलक्यात घेतल्याच्या त्यांच्या प्रतिक्रियेबाबत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे.

लॉकडाऊन लावल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होईल, हे नुकसान व्हायरसपेक्षा जास्त असेल, असा त्यांचा दावा होता.

माध्यमंच जास्त भीती पसरवत असल्याचं सांगत बोलसेनारो यांनी माध्यमांवर टीकाही केली आहे.

या कालावधीत बोलसेनारो अनेकांना भेटतानाही दिसून आले. यादरम्यान त्यांनी कधीच मास्क घातला नाही किंवा कधीच कोणती दक्षता घेतली नाही. मार्च महिन्यात त्यांनी या साधारण फ्ल्यूमुळे कोणतीच भीती नाही, आपल्याला काहीच होणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.

पण सध्या बोलसेनारो यांनाच कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांची दुसरी चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे.

एकीकडे अर्थव्यवस्थेबाबत काळजी व्यक्त करण्यात येत असताना कोरोनाला हलक्यात घेणं धोक्याचं असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांचं मत आहे.

ब्राझीलमध्ये याबाबत वाद सुरु असतानाच एका आरोग्य अधिकाऱ्याला त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं. तर एका आरोग्य अधिकाऱ्याने स्वतः राजीनामा दिला आहे.

बोलसेनारो कोरोनाच्या काळातही कशा प्रकारे अमेरिकेचे राजदूत टॉड चॅपमन यांना भेटले, हे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. त्यांना भेटल्यानंतर काही दिवसांनी बोलसेनारो यांच्यात कोरोना संसर्गाची लक्षणं दिसू लागली होती.

20 जूनला ब्राझील कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेला दुसरा देश बनला. त्यावेळी ब्राझीलच्या कोरोना रुग्णांनी 10 लाखांचा टप्पा पार केला होता.

तज्ज्ञांच्या मते, कमी प्रमाणात चाचण्या होत असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते.

पण संसर्ग वाढत असूनसुद्धा ब्राझीलमधलं लॉकडाऊन हटवण्यात आलं आहे. रिओ आणि साओ पावलोमध्ये हॉटेल आणि बार पुन्हा उघडण्यात आले आहेत.

तर, दुसरीकडे ब्राझीलमध्ये हजारोंच्या संख्येत थडगी तुम्हाला फोटोंमध्ये दिसतील. दुसऱ्या ठिकाणची जमीन स्मशानभूमीसाठीच तयार केली जात आहे.

या फोटोंमधून ब्राझीलची परिस्थिती तुम्हाला लक्षात आलीच असेल.

येत्या काही महिन्यात किंवा या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनाची लस बाजारात येईल, अशी अपेक्षा आहे. अॅस्ट्रोजेनेका आणि सिनोवॅक या दोन कंपन्या याबाबत काम करत आहेत. याबाबत संशोधन शेवटच्या टप्प्यात असून लवकरच लस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.

ब्राझीलसाठी हा एक आशेचा किरण असू शकतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)