You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना महाराष्ट्र : पुण्यात मुंबईपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस, इथे का वाढतोय कोरोनाचा संसर्ग?
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
महाराष्ट्रात सगळ्यात पहिला कोव्हिड-19चा पेशंट पुण्यात सापडला होता. दुबईवरून परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागणं झाल्याचं 9मार्चला कंफर्म झालं होतं.
त्यानंतर आज जवळपास सव्वाचार महिने झालेत आणि पुण्यातलं कोरोना व्हायरसचं संक्रमण थांबायचं नाव घेत नाहीये. 14 जुलैपर्यंत पुणे शहरात कोव्हिड-19च्या 30,751 कंफर्म केसेस आहेत, तर 907 लोकांचा मृत्यू झालाय. पुणे ग्रामीणमध्ये 3985 केसेस आहेत आणि 113 लोकांचा मृत्यू झालाय. तर पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 7356 केसेस आहेत आणि 132 मृत्यू झालेत.
इतकंच नाही, 14 जुलैच्या सरकारी आकडेवारीनुसार पुण्यातल्या अॅक्टिव्ह कोरोना व्हायरसचं संक्रमणाच्या केसेस मुंबईपेक्षा जास्त झाल्यात. पुण्यात या तारखेपर्यंत 23,738 अॅक्टिव्ह केसेस आहेत तर मुंबईत 22,773 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
राज्यात सगळ्यांत आधी कोरोना व्हायरसचा पेशंट या शहरात सापडला, त्यानंतरही गंभीरपणे योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही का? पुण्यात दिवसागणिक पेशंट्सची संख्या का वाढत जातेय? मुंबईपेक्षा आज पुण्यात अॅक्टिव्ह केसेसची संख्या जास्त का आहे? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी बोललो.
प्रशासनाने कडक पावलं न उचलणं आणि लोकांची बेपर्वाई ही दोन मोठी कारणं आहेत ज्यामुळे पुण्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला, असं मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे व्यक्त करतात.
"पुण्याच्या पेठांमध्ये, जिथे दाटीवाटीची वस्ती आहे, तसंच शहरातल्या काही मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने पसरला. तुलनेने शहराचा पश्चिम भाग म्हणजे बाणेर, बावधन, डेक्कन, कोथरूड याभागात प्रसार नियंत्रणात होता. पश्चिम भागात लोकांनी सुरुवातीला कडक लॉकडाऊन पाळला. त्यावेळेस या भागात अगदी तुरळक पेशंट होते. पण पूर्व भागातल्या झोपडपट्ट्यांमध्ये खूप गर्दी असायची, लोक सांगूनही ऐकत नव्हते, त्यामुळे पाटील इस्टेट, कामगार पुतळा, भवानीपेठ, तालिवाला रोड या भागांमध्ये एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रचंड वेगाने त्याचा प्रसार झाला."
पण अनलॉक-1 येतायेता परिस्थिती पालटली असं डॉ भोंडवे नमूद करतात. "जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू झाली. लोकांना असं वाटायला लागलं की आपल्याकडे केसेस नाहीत, त्यामुळे आता आपल्याकडे आता याचा प्रसार होणार नाही आणि आपल्याला काही होणार नाही अशी भ्रामक समजूत तयार झाली. गर्दी वाढली, लोक नियम पाळत नव्हते, प्रशासन त्यांना अटकाव करत नव्हतं. हॉटेल्सच्या नावाखाली वडापावची दुकान सुरू होती, लोक तिथे गर्दी करायचे. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात केसेस वाढल्या," ते सविस्तर सांगतात.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
दुसरीकडे कंटेन्टमेंट झोनमध्ये बाहेरून पत्रे लावले असले आत लोकांचा मुक्त संचार होता. लोक घोळक्याने गप्पा मारत होते, मास्क वापरत नव्हेत त्यामुळे तिथला प्रसारही आटोक्यात येत नव्हता, असंही ते म्हणतात.
डॉ भोंडवे यांच्यामते पुण्यात कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात फैलाव व्हायला 5 गोष्टी कारणीभूत ठरल्या. त्या अशा :
1) लोकांनी नियम न पाळणं आणि त्याबद्दल लोकांमध्ये प्रशासनाने जागृती न करणं, तसंच न नियम पाळणाऱ्यांना दंड किंवा शिक्षा न करणं.
2) पॉझिटीव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नीट न करणं, त्यांना स्वतःहून संपर्क न करणं आणि त्यांच्या टेस्ट न करणं. "माझे असे कमीत कमी 50पेशंट पॉझिटीव्ह होते. त्यांच्या नातेवाईकांनी स्वतःहून प्रशासनाला संपर्क केला तरच त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हायचं, नाहीतर त्यांना प्रशासन स्वतःहून फोन करायचं नाही,"अशी माहिती ते देतात.
3) दाटीवाटीने वस्ती असणाऱ्या भागांमध्ये, झोपडपट्टयांमध्य सॅनिटेशन आणि स्वच्छता योग्य त्या प्रमाणात न करणं. धारावीमधल्या सार्वजनिक शौचालयांमध्ये दिवसातून सहा वेळा स्वच्छता केली जायची, आत जाणाऱ्या/बाहेर येणाऱ्या प्रत्येकाला हात धुवायला लावायचे, तसं पुण्यातल्या झोपडपट्ट्यांमध्ये झालं नाही, आजही होत नाही.
4) शासकीय यंत्रणांमध्ये सुसुत्रतेचा अभाव असणं. शासकीय विभाग आणि प्रशासन काम करतंय या वाद नाही पण त्यांच्यात समन्वय नाही.
5) शहरातून मोठ्या प्रमाणावर लोकांची ये-जा झाली. पहिल्या लॉकडाऊनमध्ये बाहेरगावहून कामासाठी आलेले लोक पुणं सोडून गेले. जून महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा अनलॉक-1सुरू झालं तेव्हा कारखान्यांनी,इंडस्ट्री मालकांनी आपल्या मजुरांना परत बोलावलं. तेव्हा मराठवाडा, कर्नाटक, गुजरात अशा भागांमधून खाजगी वाहनांमधून पुणं सोडून गेलेले लोक परत आहे. पण आता पुन्हा जवळपास 1 महिन्यांचा लॉकडाऊन व्हायची चिन्हं आहेत म्हटल्यावर ही लोक परत गावी जात आहेत. या लोकांचं काही चेकअप होत नाही. अनेकांकडे पास नसतात पण तरीही ये-जा करतात त्यामुळे संक्रमण वाढलं.
'पुणे महानगरपालिकेची तयारी नाही'
एक महिन्यापुर्वी जी मुंबईची अवस्था होती, तसंच काहीसं आता पुण्याचं झालं असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करतात. पुण्यात पुरेसे बेड्स तसंच व्हेंटिलेटर्स नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. डॉ अभिजित मोरे आपचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचं म्हणणं आहे की सरकार मान्य करत नसलं तरी पुण्यात कम्युनिटी ट्रान्समिशन झालं आहे.
"पुण्यात प्रशासन मोठ्या प्रमाणावर टेस्ट करतंय हे अगदी मान्य पण तरी या टेस्ट वाढायला हव्यात कारण पुण्याचा टेस्ट पॉझिटीव्हिटी रेट 16-18 टक्के इतका आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ऑगस्ट महिन्यात पुण्यातल्या केसेसचा पीक येऊ शकतो. त्या अनुषंगाने जर पुणे महानगरपालिकेची तयारी पाहिली तर इथे सध्या 18,000 बेड्स उपलब्ध आहेत. त्यातले आयसोलेशनसाठी 16,000आहेत, ICU बेड580 आहेत आणि व्हेंटिलेटरसाठी फक्त 288 बेड्स आहेत. आताच पेशंट्सला बेड मिळत नाहीयेत. दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या कंट्रोल रूमने आम्हाला स्पष्ट उत्तर दिलं होतं की आता एकही ICU बेड शिल्लक नाही. ही परिस्थिती भयानक आहे."
संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन
वाढत्या संसर्गावर उपाय म्हणून पुण्यात 13 जुलै मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन पुढे वाढून 21 दिवसांचा होण्याचीही शक्यता आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही नागरिक नियमांचं पालन करत नसल्याचं निर्दशनास आल्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य ओळखून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं.
"लॉकडाऊन असलं तरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरूच राहील. कोरोनाचा प्रसार खंडीत करणं, रुग्णांचं विलगीकरण करणं, प्रसाराची साखळी तोडणं, रुग्णवाढीचा वेग नियंत्रित करणं हे लॉकडाऊनचे उद्देश आहेत,"असं पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी लॉकडाऊन लागू करताना म्हटलं होतं.
'लॉकडाऊन हा उपाय नाही'
दुसरीकडे पुण्याच्या व्यापारी महासंघाचा या लॉकडाऊनला विरोध आहे.आधीच्या लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांचं आधीच नुकसान झालंय त्यामुळे हा 10 दिवसांचा लॉकडाऊन अनिच्छेने स्वीकारल्याचं पुणे व्यापारी संघाचे अध्यक्ष फतेचंद राका यांनी म्हटलं होतं.
तर लॉकडाऊन म्हणजे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासन कमी पडतंय आणि त्याची जबाबदारी लोकांवर ढकलतंय असा काहीसा प्रकार असल्याचं डॉ मोरे यांनी म्हटलं.
'आकडे वाढलेत कारण टेस्टिंग वाढलंय'
पुणे शहराचा डबलिंग रेट (रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस) सध्या 19 आहे तर इथला डेथ रेट 2.9टक्के इतका आहे.
मुंबईपेक्षा पुण्यात अॅक्टिव्ह केसेस जास्त का याचं विश्लेषण करताना पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल म्हणतात, "आकडे पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की पुण्यात मागच्या आठवड्यात आम्ही 39 हजार टेस्ट केल्यात तर मुंबईत त्याच काळात 33 हजार टेस्ट झाल्यात. कंफर्म केसेसचे आकडे हे नेहमीच किती मोठ्या प्रमाणावर टेस्ट केल्या गेल्या आहेत यावर अवलंबून असतात."
पुणे महानगर पालिकेच्या तयारीविषयी बोलताना त्या सांगतात की गेल्या काही दिवसात आम्ही आमचं टेस्टिंगचं प्रमाण दुपटीने वाढवलं आहे. आम्ही आता रोज जवळपास 5.5 हजार टेस्ट करतो. येत्या काही दिवसात दिवसाला 7हजार टेस्ट करण्याचं आमचं उदिष्टं आहे.
"तुम्ही अॅक्टिव केसेस म्हणता,पण पुण्याचा रिकव्हरी रेटही जास्त आहे. पुण्यात जवळपास 64 टक्के रिकव्हरी रेट आहे. "पुण्यात ऑगस्ट महिन्यात कोरोना व्हायरसचा पीक येईल,त्यादृष्टीने काय तयारी केली आहे आहे याबद्दल बोलताना त्या म्हणतात, "आम्ही 600 ऑक्सिजन बेडची ऑर्डर दिली आहे, तसंच1500 जंबो बेड मागवले आहे. पुणे शहरात स्वॅब सेंटर्सची संख्या वाढवून 23 केली आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)