You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : भारतात जगाला पुरेल एवढ्या प्रमाणात कोरोनाची लस तयार करण्याची क्षमता - बिल गेट्स, #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. सर्व जगासाठीच्या कोव्हिड-19 लशींच्या उत्पादनासाठी भारत सक्षम : बिल गेट्स
भारतातल्या औषध आणि लस उत्पादक कंपन्या जगाला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात औषधांचा पुरवठा करत आल्या असून भारतातल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीत फक्त भारतच नाही, तर जगाला पुरेल इतक्या लशींचं उत्पादन करायची क्षमता असल्याचं मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटलंय.
डिस्कव्हरी प्लस चॅनलच्या 'कोव्हिड 19 - इंडियाज वॉर अगेन्सट द व्हायरस' या डॉक्युमेंट्रीसाठी गेट्स यांची मुलाखत घेण्यात आली, त्यात त्यांनी भारताबद्दलचं हे मत व्यक्त केलंय.
मिंट वर्तमानपत्रानं याविषयीची बातमी दिलेली आहे.
भारतात आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या गोष्टी करण्यात आल्या आहेत आणि आता कोरोना व्हायरसाठीची लस तयार करण्यासाठीही भारतातली फार्मा इंडस्ट्री काम करत असल्याचंही बिल गेट्स यांनी म्हटलंय.
सोबतच भारतातल्या शहरांमधली मोठी लोकसंख्या आणि घनता यामुळे कोव्हिड-19 च्या काळात भारतातल्या आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं राहिल्याचंही ते म्हणाले आहेत.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
2. सीरम इन्स्टिट्यूटनं पुण्यात सुरू केलं अॅस्ट्रा झेनकाच्या लशीचं उत्पादन
ऑक्सफर्डमध्ये ज्या लशीचा प्रयोग सुरू आहे तिचं उत्पादन करण्यासाठी ब्रिटीश - स्वीडिश फार्मा कंपनी अॅस्ट्रा झेनका आणि पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट यांच्यात करार झालेला आहे. अॅस्ट्रा झेनकाच्या या लशीचं पुण्यात उत्पादन सुरू करण्यात आल्याची बातमी लोकमतने दिली आहे.
ऑक्सफर्डमध्ये या लशीच्या पहिल्या टप्प्यातल्या चाचण्या यशस्वी झाल्या असून सध्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याची चाचणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ही लस कोरोनाग्रस्तांच्या शरीरात अँटीबॉडीज आणि टी सेल्स बनवण्यात यशस्वी ठरल्याचं या बातमीत म्हटलंय.
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये या लशीची 1 अब्ज व्हायल्स बनवण्यात येणार असून ही लस कमी उत्पन्न असणाऱ्या देशांनाही पुरवली जाणार आहे. यातल्या 40 कोटी व्हायल्सचं उत्पादन 2020 च्या अखेरपर्यंत करण्याचं उद्दिष्टं ठेवण्यात आलं आहे.
3. सेनेपुढे लोटांगण घालण्यापेक्षा लढा, अन्यथा पक्ष संपेल - संजय निरुपम
महाविकास आघाडीच्या सरकारकडून छापण्यात आलेल्या महाजॉब्सच्या जाहिरातीतून काँग्रेसला वगळण्यात आलंय. यावरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आपल्याच पक्षावर टीका केलीय. काँग्रेस शिवसेनेपुढे किती दिवस लोटांगण घालणार, त्यापेक्षा काँग्रेसने लढावं, नाहीतर पक्षच संपून जाईल, असा सल्ला निरुपम यांनी एका ट्वीटद्वारे दिलाय. ईटीव्ही भारतने याविषयीची बातमी दिलेली आहे.
राज्य सरकारने सुरू केलेल्या महाजॉब्स पोर्टलची माहिती देणाऱ्या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्र्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिसत असले तरी त्यात काँग्रेसच्या एकाही नेत्याचा समावेश नाही.
याबद्दल काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जातेय. काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीही एका ट्वीटद्वारे याविषयीची नाराजी व्यक्त केली होती.
4. नवा ग्राहक कायदा सोमवारपासून लागू होणार
राजीव गांधी यांच्या कार्यकाळात लागू करण्यात आलेला 1986 चा ग्राहक कायदा पूर्णपणे रद्द करून त्याची जागा आता नवा कायदा घेणार आहे. सोमवार 20 जुलैपासून हा कायदा देशभरात लागू होईल. संसदेनं संमत केल्यानंतर गेल्यावर्षी 9 ऑगस्टला या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली होती. लोकसत्तामध्ये याविषयीची बातमी आहे.
यामध्ये ग्राहकांच्या तक्रारींची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे, ग्राहक न्यायालयाचे अधिकारही वाढवण्यात आलेले आहेत. याशिवाय दोषी वा बनावट उत्पादन करणाऱ्याला आता पर्यंतच्या दंड आणि भरपाईऐवजी तुरुंगवासही होऊ शकतो.
शिवाय फसव्या आणि अतिरंजित जाहिरातींबद्दल उत्पादकासोबतच ती जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटीलाही जबाबदार धरण्यात येणार आहे.
5. उद्धव ठाकरेंचे सरकार कोरोनाच्या तिरडीवर - सदाभाऊ खोत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलं असल्याची टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
कोरोना संसर्ग निवारणात सरकार अपयशी ठरलंय, हे सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलंय आणि मंत्री क्वारंटाईन झाले आहेत अशा शब्दांत सदाभाऊ खोतांनी केलेल्या टीकेची बातमी सरकारनामाने दिली आहे.
राज्यातली आरोग्य यंत्रणा कोलमडली असून सरकारने ग्रामपंचातीवर प्रशासक नियुक्तीचा घेतलेला निर्णय चुकीचा असून तो राजकीय फायद्यासाठी घेण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय.
याशिवाय राज्यात क्रांती संघटनेच्यावतीने 1 ऑगस्टला राज्यव्यापी दूध दर आंदोलनही केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)