कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना आंदोलनादरम्यान मारहाण; दिपकेंनी काय दिली प्रतिक्रिया?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर आज (15 जून) जयपूर येथे आंदोलन करत असताना त्यांना मारहाण करण्यात आली. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली.

पीटीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमध्ये गर्दीतून जात असताना अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला झाल्याचं दिसत आहे. यानंतर उपस्थित आंदोलकांनी हल्लेखोराचा पाठलाग करत त्याला मारहाण केल्याचंही दिसत आहे.

जयपूरमधील शहीद स्मारक या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू होते. अभिजीत दिपके हे समर्थकांच्या खांद्यावर बसलेले होते. त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर दिपके हे पुन्हा आंदोलनात सक्रिय झालेले व्हीडिओत दिसत आहेत.

मारहाणीवर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके म्हणाले, "शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे लक्षण आहेत. आम्ही शांततापूर्ण मार्गाने आमचा आवाज उठवणे सुरूच ठेवू. मी महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि शांतता व प्रेमाच्या जोरावर हा लढा लढत राहीन."

"धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे," अशीही मागणी त्यांनी केली.

मारहाणीनंतर अभिजीत दिपके यांनी मंचावरूनच हल्लेखोरांना सोडून देण्याची विनंती केली होती.

विधायकपुरी पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) नरेंद्र कुमार यांनी सांगितले की, दिपके यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, 'कॉकरोच जनता पार्टी'चे माध्यम प्रमुख अभिषेक जैन यांनीही बीबीसीला सांगितले की, पोलिसांनी अभिजीत दिपके यांना मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अभिजीत दिपके अजूनही आंदोलनस्थळीच आहेत.

जयपूरमधील मारहाणीचा व्हीडिओ

शॉर्ट व्हीडिओ पाहा

दरम्यान, देशभरात वाढलेल्या पेपरफुटीच्या घटना, परीक्षांमधील गोंधळ आणि निकालातील विलंब यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत कॉक्रोच जनता पार्टी देशभरातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे.

दिल्लीत आंदोलन केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने पुण्यातील आंदोलनात लखनौ, अमृतसर, हैदराबाद आणि जयपूर येथेही आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

तसेच देशभरातील युवकांनी मोठ्या आंदोलनासाठी एकत्र यावे असे आवाहन केलं होतं. या आंदोलनातून देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या आंदोलनाला देशव्यापी रूप देण्याचेही प्रयत्न होत आहे.

शिक्षणाचा जाहीरनामा काय आहे?

पुण्यात झालेल्या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीने शिक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे,

  • पेपर लीक झाल्यावर विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई म्हणून दर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये सरकारने द्यावेत. जर परीक्षेचा निकाल उशिरा लागला तर निकाल लागेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 प्रति महिना द्यावे.
  • 72 तासांच्या आत बॅकचा पर्याय उपलब्ध असला पाहिजे
  • हाताने लिहिलेले पेपर हातानेच चेक करावेत. पेपर ऑनलाईन चेक करू नयेत.
  • परीक्षेच्या सहा दिवस आधी कम्प्युटर ॲाडिट झालं पाहिजे
  • एनसीईआरटी ने जो नकाशा काढलाय पुस्तकात तो परत घेतला पाहिजे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)