कोरोना व्हायरसची लक्षणं चीनमध्ये ऑगस्टमध्येच दिसली होती?

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

शिस्तबद्ध उपाययोजनांनंतर चीनमध्ये कोरोना विषाणू नियंत्रणात आला होता. मात्र तब्बल 56 दिवसांनंतर चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चीनमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोना व्हायरसचा उद्रेक चीनच्या वुहान शहरात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदा झाला आणि पाहता-पाहता जगभरात या व्हायरसचा संसर्ग झाला.

पण खरंच चीनमध्ये नोव्हेंबरमध्ये या व्हायरसची लक्षणं आढळून आली? एका ताज्या संशोधनातून या माहितीवर संशय उपस्थित केला जातोय.

काही सॅटेलाईट इमेजेसचा अभ्यास केल्यावर हार्वर्डच्या संशोधकांना असं लक्षात आलं की, वुहानमधल्या पाच रुग्णालयांबाहेर वाहनांची वर्दळ ऑगस्टपासूनच अचानक वाढली होती. याच दरम्यान 'cough' खोकला आणि 'Diarrhoea' डायरिया असं ऑनलाईन सर्च करण्याचं प्रमाणही वाढलं होतं. त्यामुळे कोरोनाचा पहिला उद्रेक डिसेंबरच्या बऱ्याच आधी झाला असावा, असं या अभ्यासात म्हटलंय.

चीनने मात्र हा अभ्यास 'मूर्खपणा' असल्याचं सांगत ही फक्त 'वरवरची' माहितीच असल्याचं म्हटलंय.

नोव्हेंबमध्ये प्रथम हा नवीन कोरोना व्हायरस निदर्शनास आल्याचं सांगितलं जातं. मात्र एका अनोळखी कारणामुळे न्युमोनियाच्या अनेक केसेस एकत्र आढळल्याची माहिती चिनी प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटना (WHO)ला 31 डिसेंबर 2019 ला दिली होती.

"हे स्पष्ट आहे की, आपल्याला कोरोनाचा उद्रेक झाल्याचं कळलं, त्याच्या बऱ्याच आधीपासून कोणती तरी मोठी घडामोड या भागात होत होती," असं हार्वर्डच्या या संशोधकांचे प्रमुख डॉ. जॉन ब्राऊनस्टीन यांनी म्हटलं.

या अभ्यासाचं इतर अभ्यासकांनी अद्याप विश्लेषण केलेलं नाही.

काय सांगतं हे संशोधन?

या संशोधनात वुहानच्या पाच रुग्णालयांबाहेरील रहदारीचा उपग्रहांद्वारे अभ्यास करण्यात आला आहे. त्यात 2018च्या उत्तरार्धात असलेल्या ट्रॅफिकची तुलना 2019च्या उत्तरार्धातील ट्रॅफिकशी करण्यात आली आहे.

त्यात तिथल्या तियानयू रुग्णालयाबाहेर ऑक्टोबर 2018 मध्ये 171 गाड्या पार्क होत्या. मात्र एका वर्षाने म्हणजे ऑक्टोबर 2019 मध्ये इथेच 285 गाड्या पार्क होत्या, म्हणजे 65 टक्के जास्त, असं या अभ्यासात म्हटलंय. याच दरम्यान, बायडू या चिनी सर्च इंजिनमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं असलेले शब्द शोधणारे अचानक वाढल्याचंही लक्षात येतं.

"या सगळ्या पुराव्यांकडे एकत्र पाहिलं तर असं लक्षात येतं की त्या दरम्यान वुहानमध्ये काहीतरी सुरू होतं," डॉ. ब्राऊनस्टीन यांनी एबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं.

"साहजिकच नेमकं तिथे काय झालं, हे जाणून घेण्यासाठी आणखी बराच अभ्यास करावा लागेल, जेणेकरून लोकांना कळेल की एखाद्या रोगाचा उद्रेक कसा होतो आणि मग तो लोकांमध्ये कसा पसरतो. त्याचाच हा एक पुरावा आहे."

मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ह्वा चुनयिंग यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. मंगळवारी (9 जून) एका पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, "मला वाटतं हा मूर्खपणा आहे. ट्रॅफिक पाहून असा काही वरवरची घेऊन असे निष्कर्ष काढणं अगदीच मूर्खपणाचं आहे."

मग या संशोधनावर किती विश्वास ठेवावा?

बीबीसीचे बीजिंगस्थित पत्रकार जॉन सडवर्थ यांच्यानुसार या माहितीला मर्यादा आहेत. उदाहरणार्थ-काही फोटोंमध्ये ढग दिसून येतायत, त्यामुळे शास्त्रज्ञांना दोन वर्षांतल्या बरोबर एकाच तारखेच्या सॅटलाईट फोटोंची तुलना करणं शक्य झालंच असेल, असं नाही.

"पण जर त्यादरम्यान खरंच कोरोनाचा उद्रेक झाला असेल आणि तो लक्षात आला नसेल तर मग तेव्हा अनेकांनी वुहानमधून बाहेर उड्डाण केलं असेल. त्यामुळे इतर देशांमध्ये कोरोनाची साथ चीनमध्येही उद्रेक झाल्याचं लक्षात येण्यापूर्वीच पसरल्याचं लक्षात येतं," असं सडवर्थ सांगतात.

ते पुढे सांगतात की, मात्र हा एक पुरावा घेऊन चीनने कोरोनाचा उद्रेक लपवल्याचा आरोप करणं योग्य नाही, कारण कुठलाही रोग समाजात पसरण्यापूर्वी, तो अधिकृतरीत्या जाहीर करण्यापूर्वीच तो इतरत्र पसरलेला असण्याची शक्यता असतेच.

चीनने 31 डिसेंबर 2019ला या अनोळखी न्यूमोनियासदृश रोगाबाबत WHOला कळवलं होतं. त्यानंतर नऊ दिवसांनी या न्यूमोनिया रुग्णांमध्ये एक नवीन कोरोनाव्हायरस सापडल्याचं चीनने सांगितलं होतं. त्याला सुरुवातीला सार्स-CoV-2 असं नाव देण्यात आलं आणि या रोगाला नंतर कोव्हिड-19 (CoronaVirus Disease 2019) असं नाव देण्यात आलं.

30 जानेवारीपर्यंत या रोगाचे चीनबाहेर 82 रुग्ण आढळल्यानंतर WHOने या रोगाला जागतिक चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (Public Health Emergency of Global Concern) म्हणून जाहीर केलं होतं.

बीबीसी आरोग्य प्रतिनिधी हेलन ब्रिग्स यांचं विश्लेषण

कोरोनाने जग वेढून सहा महिने लोटले, तरीही त्याच्या उगमाचा घटनाक्रम अजूनही स्पष्ट नाही. डिसेंबर 2019मध्ये जो पहिला बाधित समूह किंवा क्लस्टर आढळलं होतं, त्यांच्यातला समान दुवा हे वुहानचा मांस बाजार होता, जिथे जंगली प्राण्यांचं मांसही विकलं जायचं.

हा कोरोना व्हायरस कोणत्या प्राण्यातून मानवात आला, हे अजूनही स्पष्ट नाही, तसंच सुरुवातीच्या सर्वच केसेस या मार्केटशी संबंधित नव्हत्या.

काही पुरावे असंही सांगतात की, हा व्हायरस रोगाचा उद्रेक होण्यापूर्वीही अस्तित्वात होता. उदाहरणार्थ-एका फ्रेंच डॉक्टरने दावा केला होता की त्याच्या एका रुग्णाला कोरोनाचं निदान डिसेंबरमध्येच झालं होतं.

आता हा नवीन पुरावा रोचक आहे, पण तो थेट व्हायरस किंवा रुग्णांचा अभ्यास करून नाही तर उपग्रहांच्या मदतीने काढण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याला या व्हायरसचाच आणखी अभ्यास करून, मग तो प्राण्यांमध्ये असो वा मानवांमध्ये, हे कळेल की या रोगाचं मूळ काय. असं असलं तरी कदाचित या व्हायरसचं उगमस्थान हे कदाचित भविष्यातही कधी कळू शकणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)