कोरोना लस : ब्रिटिश कंपनीकडून संभाव्य लशीचं उत्पादन सुरू, पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटशी करणार करार

Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

अॅस्ट्राझेनिका नावाच्या ब्रिटीश औषध उत्पादक कंपनीने कोरोना व्हायरसवरच्या संभाव्य लशीसाठीचं उत्पादन सुरू केल्याचं कंपनीच्या प्रमुखांनी बीबीसीला सांगितलं आहे.

या लशीच्या चाचण्या सध्या घेण्यात येत असल्या तरी यासाठीच्या घटकांची निर्मिती सुरू करण्यात आलेली आहे, म्हणजे लस उपयुक्त असल्याचं सिद्ध झाल्यास त्यासाठी मागणी पूर्ण करणं शक्य होईल, असं कंपनीचे प्रमुख पास्कल सोरायट यांनी बीबीसीला सांगितलं.

"आम्ही आताच लस उत्पादनाला सुरुवात करत आहोत. निकाल हाती येईपर्यंत ही लस वापरण्यासाठी आपल्याकडे तयार असायला हवी," त्यांनी सांगितलं.

या लशींच्या २ अब्ज डोसेसचं उत्पादन करणं आपल्याला शक्य असल्याचं अॅस्ट्राझेनिका कंपनीचं म्हणणं आहे.

निर्मितीची प्रक्रिया आताच का सुरू करण्यात आली, याविषयी बीबीसीच्या 'टुडे' या कार्यक्रमात बोलताना सोरायट म्हणाले, "आम्हाला हे लवकरात लवकर करायचं आहे. अर्थातच असा निर्णय घेण्यामध्ये धोका आहे. पण हा आर्थिक धोका आहे. लस प्रभावी न ठरणं हे आर्थिक संकट ठरू शकतं. असं झालं तर लसीसाठी लागणाऱ्या ज्या घटकांचं आम्ही उत्पादन केलंय, ते सारं फुकट जाईल."

जागतिक साथीदरम्यान या लशीची निर्मिती आणि उत्पादन करताना त्यातून नफा कमावण्याचा कंपनीचा हेतू नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.

ही लस प्रभावी ठरत असल्याचं सिद्ध झाल्यास कंपनी २ अब्ज लशींची निर्मिती करेल. यासाठी दोन करार करण्यात येणार आहेत.

यापैकी एक करार बिल गेट्स यांच्यासोबत करण्यात येईल तर दुसरा पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सोबत करण्यात येणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ही जगभरातली सर्वांत जास्त लसनिर्मिती करणारी संस्था आहे.

लघु आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांना 1 अब्ज लशींचा पुरवठा करण्यासाठीचा करार भारताच्या सीरम इन्स्टिट्यूटसोबत करण्यात येईल. यापैकी 40 कोटी लशी या 2020 वर्षअखेरपर्यंत पुरवण्यात येतील.

बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्या दोन आरोग्यविषयक संघटनांसोबत 750 दशलक्ष डॉलर्सचा करार करण्यात येणार आहे.

कोअलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस इन्होवेशन्स (Coalition for Epidemic Preparedness Innovations) आणि GAVI व्हॅक्सिन्स अलायन्स या दोन संस्था या लसनिर्मितीसाठी मदत करतील आणि लशीच्या 30 कोटी डोसेसचं वितरण करतील. या वर्षाच्या अखेरपासून या लशीची डिलीव्हरी सुरू होणं अपेक्षित आहे.

या अॅस्ट्राझेनिका कंपनीने तयार केलेली AZD1222 लस परिणामकारक आहे वा नाही याविषयीचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत येणं अपेक्षित असल्याचं सोरायट यांनी सांगितलं.

पण ही लस प्रभावी ठरणार नाही, अशीही शक्यता असल्याचं CEPIचे चीफ एक्झिक्युटिव्ह रिचर्ड हॅचेट यांनी म्हटलंय.

असं असलं तरी अॅस्ट्राझेनिका कंपनी जगभरामध्ये या संभाव्य लसीसाठीची पुरवठा साखळी उभारत आहे. आतापर्यंत या लशीच्या 2 अब्ज डोसेसची निर्मिती करता येईल यासाठीची उत्पादन यंत्रणा नक्की करण्यात आलेली आहे.

"आपल्याकडे लस असं एक बाब आहे. पण तिचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणं गरजेचं आहे. आणि हे करणं सोपं नाही," सोरायट म्हणाले.

अॅस्ट्राझेनिका कंपनीने या संभ्याव लशीचे ३० कोटी डोस अमेरिकेला देण्याचं मान्य केलं असून 10 कोटी लसी युकेमध्ये देण्यात येणार आहेत. सप्टेंबरपासून यासाठीची डिलीव्हरी सुरू होणं अपेक्षित आहेत.

आणखी सहा लशींवर काम सुरू

कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यासाठी जगभरात लस शोधण्यासाठीची संशोधनं सुरू आहेत. जाणकारांच्या मते ज्या पद्धतीने जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते असामान्य, अद्भूत, अभूतपूर्व असे आहेत.

एक लस शोधण्यासाठी अनेक वर्ष लागतात, कधीकधी तर काही दशकंसुद्धा जातात.

उदाहरणच द्यायचं झालं तर नुकतीच ज्या आजारावर लस आली आहे त्या इबोलाचं घेता येईल. इबोलाची लस यायला 16 वर्षं लागली.

लस तयार करण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे. त्याचे अनेक टप्पे असतात... टप्प्यांचे उपटप्पे असतात. त्यामुळे लस तयार करायला अनेक वर्षं लागणं स्वाभाविक आहे.

पहिला टप्पा प्रयोगशाळेतला असतो. दुसरा प्राण्यांवर चाचणीचा असतो.

चाचण्यांमध्ये लस सुरक्षित असल्याची खात्री पटली आणि रोगप्रतिकारक शक्ती दिसू लागली की त्या लशीची माणसांवर चाचणी घेतली जाते. याला ह्युमन ट्रायल म्हणतात.

त्या 6 स्पेशल लशी कोणत्या?

माणसांवर लशीची चाचणी घेण्याची प्रक्रियासुद्धा तीन टप्प्यांची असते. पहिल्या टप्प्यात भाग घेणाऱ्या लोकांची संख्या कमी असते आणि ते सुदृढ असतात.

दुसऱ्या टप्प्यात भाग घेणाऱ्यांची संख्या जास्त असते. शिवाय हे कंट्रोल ग्रुप्स असतात. लस माणसांवर किती सुरक्षित आहे, हे या टप्प्यात तपासलं जातं.

कंट्रोल ग्रुप म्हणजे असे लोक जे चाचण्यांमध्ये भाग घेणाऱ्या इतर लोकांपासून वेगळे ठेवले जातात.

लशीची किती मात्रा द्यावी, हे तिसऱ्या टप्प्यात तपासलं जातं.

कोव्हिड-19 च्या लशीवर संशोधन करणाऱ्या जगभरातल्या 90 रिसर्च टीम्सपैकी 6 त्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत, ज्याला एक मोठं लक्ष्य मानलं जातं आणि हा टप्पा आहे ह्युमन ट्रायल्सचा.

आपण याच सहा लसींविषयी जाणून घेणार आहोत.

1. mRNA-1273 व्हॅक्सीन

मॉडर्ना थेरॅप्युटिक्स ही एक अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी आहे. या कंपनीचं मुख्यालय मॅसाच्युसेट्समध्ये आहे. ही कंपनी कोव्हिड-19च्या लसीवर काम करतेय.

व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीला प्रशिक्षित (ट्रेन) करून कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज करणं आणि आजारापासून बचाव करणं, हा त्यांच्या संशोधनाचा उद्देश आहे. हे एक नवीन तंत्रज्ञान आहे.

हे करण्याच्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत, त्यात जिवंत मात्र कमकुवत आणि निष्क्रिय झालेल्या विषाणूंचा वापर करतात.

मात्र, मॉडर्ना थेरपटिक्स कंपनीच्या mRNA-1273 व्हॅक्सीनमध्ये कोव्हिड-19 आजार पसरवणाऱ्या विषाणूंचा वापर करण्यात आलेला नाही.

नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थच्या निधीवर या लशीच्या ट्रायल सुरू आहेत. हे व्हॅक्सीन मॅसेंजर RNA किंवा मॅसेंजर रायबोन्युक्लिक अॅसिडवर आधारित आहे.

शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कोरोना विषाणूचा जेनेटिक कोड तयार केला आहे. त्याचा एक छोटा भाग व्यक्तीच्या शरीरात सोडल्यास त्याची रोगप्रतिकारक शक्ती संसर्गाविरोधात लढण्यासाठी प्रतिक्रिया देईल, असं शास्त्रज्ञांना वाटतं.

2. INO-4800 व्हॅक्सीन

अमेरिकी बायोटेक्नॉलॉजी कंपनी इनोवियो फार्मास्युटिक्लस या कंपनीचं मुख्यालय पेंसिल्वेनियामध्ये आहे. इनोविया कंपनीत देखील संशोधनाच्या नव्या रणनीतीवर काम सुरू आहे.

रुग्णाच्या पेशीमध्ये प्लाज्मिड्जच्या (एक प्रकारची लहान अनुवांशिक रचना) माध्यमातून थेट डीएनए इंजेक्ट करणारी लस तयार करण्याचे प्रयत्न या कंपनीत सुरू आहे. यामुळे रुग्णाच्या शरीरात संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतील, अशी आशा त्यांना आहे.

इनोविया आणि मॉडर्ना या दोन्ही कंपन्यामध्ये सुरू असलेल्या संशोधनात अनुवांशिक रचनेत बदल किंवा सुधार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे नवं तंत्रज्ञान आहे.

अडथळे

डॉक्टर फेलिपे टापिया जर्मनीच्या मॅग्डेबर्गमध्ये मॅक्स प्लँक इन्स्टिट्युटमध्ये बायोप्रोसेस इंजीनिअरिंग ग्रुपचे तज्ज्ञ आहेत.

ते म्हणतात, "यातल्या कुठल्याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आजवर कुठल्याच औषध किंवा उपचाराचा शोध लागलेला नाही. इतकंच नाही तर मानवी वापरासाठी त्यांच्या कुठल्याच संशोधनाला परवानगीही मिळालेली नाही. लोकांना या लशींपासून बऱ्याच अपेक्षा आहेत, हे मात्र खरं."

डॉ. फेलिपे टापिया सांगतात, "मात्र, थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण यापूर्वी कधीही अशा व्हॅक्सीन तयार करण्यात आलेल्या नाहीत.

"स्वतः मॉडर्ना थेरॅप्युटिक्स कंपनीच्या शास्त्रज्ञांनीही हे मान्य केलं आहे की या लशीला उत्पादन आणि मार्केटिंगच्या पातळीपर्यंत नेणं, हे त्यांच्यासमोर सर्वांत मोठं आव्हान आहे, कारण त्यांच्याकडे सध्या तरी मॅसेंजर रायबोन्यूक्लिक अॅसिडवर आधारित लस तयार करण्यासाठी परवाना नाही."

चीनमध्ये काय सुरू आहे?

चीनमध्ये तीन लशींच्या ह्युमन ट्रायल्स सुरू आहेत. यात लस उत्पादनाच्या पारंपारिक पद्धतींचा वापर करण्यात येतोय.

3. AD5-nCoV व्हॅक्सीन

16 मार्च रोजी मॉडर्ना थेरॅप्युटिक्सने लसीच्या ह्युमन ट्रायल्स सुरू केल्या. त्याच दिवशी चीनच्या कँसिनो बायोलॉजिक्स या बायोटेक कंपनीनेदखील चाचण्या सुरू केल्या होत्या.

या प्रकल्पात कँसिनो बायोलॉजिक्ससोबत इन्स्टिट्युट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि चायनीज अॅकडमी ऑफ मिलिट्री मेडिकल सायंसेस देखील सहभागी आहे.

AD5-nCoV या लशीत एडेनोव्हायरसच्या एका विशेष वर्जनचा वापर व्हेक्टर म्हणून करतात. एडेनोव्हायरस ते विषाणू आहेत जे आपले डोळे, श्वसननलिका, फुप्फुसं, आतड्या आणि मज्जासंस्था संक्रमित करतात.

ताप, सर्दी, घसा खवखवणे, डायरिया आणि गुलाबी डोळे ही या विषाणूची लागण झाल्याची लक्षणं आहेत. व्हेक्टर म्हणजे व्हायरस किंवा एजंट जो पेशींपर्यंत डीएनए पोहोचवतो.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना करणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रोटीनला सक्रीय करण्याचं काम हा व्हेक्टर करेल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

4. LV-SMENP-DC व्हॅक्सीन

चीनमधल्याच शेंजेन जीनोइम्युन मेडिकल इन्स्टिट्युटमध्ये LV-SMENP-DC या आणखी एका ह्युमन व्हॅक्सीनवर काम सुरू आहे.

यात HIVसारख्या आजारांसाठी जबाबदार असणाऱ्या लेंटीव्हायरसपासून तयार केलेल्या त्या सहाय्यक पेशींचा वापर केला जातो ज्या रोगप्रतिकारक क्षमता सक्रीय करतात.

5. वुहानमध्येही लसीवर सुरू आहे संशोधन

चीनमध्ये ज्या तिसऱ्या लसीवर काम सुरू आहे त्यात निष्क्रिय व्हायरसची लस देण्याचा प्रस्ताव आहे. वुहान बायोलॉजिकल प्रोडक्ट्स इन्स्टिट्युटमध्ये यावर संशोधन सुरू आहे.

या व्हॅक्सीनसाठी निष्क्रिय विषाणूमध्ये काही असे बदल केले जातात ज्यामुळे विषाणू एखाद्याला आजारी पाडण्याची आपली क्षमता गमावतात.

डॉ. फेलिपे टापिया सांगतात, "लस तयार करण्याची ही सर्वात सामान्य पद्धत आहे. बहुतांश लसी याच पद्धतीने तयार करतात."

"अशाप्रकारच्या लसींना परवानगी मिळवण्यामध्ये फारशा अडचणी येत नाहीत आणि म्हणूनच येत्या 12 ते 16 महिन्यात एखादी लस येणार असेल तर ती याच पद्धतीने तयार केलेली असेल."

6. chAdOx1 व्हॅक्सीन

ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतल्या जेनर इन्स्टिट्युटमध्ये chAdOx1 या व्हॅक्सीनवर काम सुरू आहे. 23 एप्रिल रोजी युरोपात या लशीची पहिली ह्युमन ट्रायल सुरू झाली.

चीनी कंपनी कँसिनो बायोलॉजिक्स ज्या पद्धतीने काम करत आहे त्याच आधारावर या इन्स्टिट्युटमध्येही लस विकसित केली जात आहे.

मात्र ऑक्सफोर्डची टीम चिन्पान्झीपासून घेतलेल्या एडिनोव्हायरसचा वापर करत आहे. मानवी शरीरात या विषाणूने स्वतःचा फैलाव करू नये, यासाठी या व्हायरसमध्ये काही बदल करण्यात आले आहे.

डॉ. फेलिपे टापिया सांगतात, "ते प्रयोगशाळेत विषाणू तयार करत आहेत आणि त्याने काहीही नुकसान होणार नाही. मात्र, त्याच्या पृष्ठभागावर कोरोना विषाणू प्रोटीन आहे. हे प्रोटीन मानवी शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती सक्रीय करेल, अशी आशा आहे."

यापूर्वी या पद्धतीचा वापर झाला आहे. याच पद्धतीने मर्सची लस तयार करण्यात आली होती. या लसीच्या क्लिनिकल ट्रायलचे सकारात्मक परिणाम आल्याचं सांगितलं जातंय.

मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात अडचणी

कोव्हिड-19 आजारावरच्या उपचारांचं संशोधन युद्ध पातळी सुरू असलं तरी यापैकी एखादी तरी लस यशस्वी ठरेलच, याची शाश्वती देता येत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

डॉ. फेलिपे टापिया म्हणतात, "सध्या काहीच सांगता येत नाही. या लसींच्या अनपेक्षित प्रतिक्रिया असतील का किंवा वेगवेगळ्या लोकांवर किंवा वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांवर या लसीचा काय परिणाम होईल, हे आत्ताच सांगता येणार नाही. हे तर कालांतरानेच कळेल."

इतकंच नाही तर परिणामकारक लस विकसित करणं आणि तिला मंजुरी मिळणं, हे पहिलं पाऊल आहे. यानंतर अब्जावधी लोकांसाठी लसीचं उत्पादन करणं आणि लोकांपर्यंत ती पोहोचवणं, हे खरं आव्हान असणार आहे.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)