तुम्ही सांगू शकता का, हे हरिण का वेगळं आहे?

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

अमेरिकेतल्या स्टीव्ह लिंडबर्ग यांना फोटोग्राफीचा छंद आहे. 75 वर्षांचे लिंडबर्ग आपला कॅमेरा घेऊन फोटो काढण्यासाठी जंगलात गेले. 2012 पासून ते आपल्या फेसबुक पेजवर सातत्याने फोटो प्रसिद्ध करत असतात.

सोमवारी ते मिशिगनच्या एका जंगलात गेले आणि तिथं त्यांनी आपल्या कॅमेऱ्याने एका बाराशिंगी हरणाचा फोटो घेतला. आज आपल्याला फार काही मिळणार नाही असंच त्यांना वाटत होतं पण निदान बाराशिंगी हरिणाचा फोटो तरी मिळाला असं म्हणत ते घरी परतले.

घरी आल्यावर आपल्या काँप्युटरमध्ये त्यांनी फोटो लोड केले आणि ते या हरणाकडे पाहत होते. त्यांना त्यात काहीतरी वेगळेपण जाणवलं पण नेमकं काय वेगळेपण आहे हे त्यांना कळत नव्हतं.

तुम्ही सांगू शकता का हे हरिण का वेगळं आहे?

अजूनही नाही ओळखलं. बाराशिंगी हरिण म्हणजे दोन शिंगांना 10 किंवा त्याहून अधिक टोकं असतात. बहुतेक वेळा त्यांना बारा टोकं असतात. म्हणून त्यांना बाराशिंगी हरिण म्हटलं जातं. पण या हरणाच्या डोक्यावर एकूण तीन शिंगं आहेत.

मिशिगनमधील पशुतज्ज्ञ स्टीव्ह एडवर्ड यांनी बीबीसीला सांगितलं की असं हरिण हे 10 लाखातून एक असतं.

पण या हरिणामुळे या फोटोग्राफरला एका वेगळ्या त्रासालाही सामोरं जावं लागलं आहे. स्टीव्ह यांनी जेव्हा हा फोटो फेसबुकवर टाकला तेव्हा अनेकांनी त्यांची स्तुती केली पण काही लोकांनी त्यांच्यावर फोटोशॉप केल्याच्या आरोपही केला. पण ते सांगतात आपण असं काही केलं नाही. हे हरिण कुठे आहे याचं निश्चित ठिकाण मी सांगू शकतो.

स्टीव्ह सांगतात ते पूर्वी शिकार करायचे पण नंतर त्यांनी शिकार करणं सोडलं आणि आता ते फोटोग्राफी करतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)