अमेरिकेत ट्रंप सरकार ठप्प झालंय, म्हणजे नक्की काय काय बंद पडलंय?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठीचा मुद्दा काँग्रेसमध्येच अडकून पडल्यावर सरकार ठप्प झालं आहे.

भिंतीसाठी अमेरिकन काँग्रेसने निधी मंजूर करत पर्यंत शटडाऊन राहिला तरी चालेल, गरज पडल्यास देशात आणीबाणी लागू करू, असा इशारा ट्रंप यांनी दिला आहे. डेमोक्रटिक पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपली ठाम भूमिका जाहीर केली.

22 डिसेंबर रोजी सरकार ठप्प झाल्यापासून सरकारी खर्चांमध्ये कपात करण्यात आली आहे, त्याचा सुमारे 8,00,000 कामगारांना फटका बसत आहे. हा अंशतः शटडाऊनचा तिसरा आठवडा असून, ट्रंप यांनी हे शटडाऊन "काही वर्षांसाठी" लांबलं तरी चालेल, अशी तयारी दर्शविली आहे.

वॉशिंग्टनमधील रस्त्यांवर, संग्रहालयांमध्ये शुकशुकाट दिसत असून सर्व अनावश्यक खर्च कमी करण्यात आले आहेत.

या स्थितीवर अमेरिकन लोकांनी चिंता आणि संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

विविध प्रकारची बिलं भरण्यात तसेच वैद्यकीय मदत मिळण्यात येणारे अडथळे, यांवर नागरिकांनी सोशल मीडियावर व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे.

घरभाडं भरणं झालं कठीण

प्रशासन अंशतः ठप्प झाल्यामुळे अमेरिकन सरकारचा 25 टक्के निधी गोठवला गेला आहे. त्यामुळे केवळ आवश्यक सेवांमधील कर्मचारीच काम करत राहतील आणि तेही विनामोबदला.

या 'शटडाऊन'चा परिणाम अंतर्गत संरक्षण, विधि, गृहबांधणी, कृषी, वाणिज्य, गृह आणि अर्थ विभागांवर झाला आहे. आठ लाख कामगारांना निधी नसल्यामुळे काही दिवसांची सुटी देण्यात आली आहे किंवा त्यांना विनामोबदला काम करावं लागणार आहे.

सरकारचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर आपल्याला मोबदला मिळेल, अशी अनेक लोकांना आशा वाटते. काही लोकांनी या काळामध्ये दुसऱ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या नोकऱ्या करण्यास सुरुवात केली आहे.

ट्विटरवर #shutdownstories वापरून लोक आपला राग व्यक्त करत आहेत.

ज्युली बर या कर्मचारी 'बीबीसी न्यूजडे'शी बोलताना म्हणाल्या, "मी माझा जवळपास दोन आठवड्यांचा पगार गमावला असून तो मला मिळेल, असं वाटत नाही. मी एकटीच असल्यामुळे मलाच हा फटका सहन करावा लागणार आहे. जर पगाराविना काम करणं सुरू राहिलं तर मला फेब्रुवारीमध्ये घरभाडं देणं शक्य होणार नाही."

त्यांच्याबरोबरच आणखी एक सरकारी कर्मचारी म्हणाल्या, "माझ्यावर कधीही संकट कोसळू शकेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. माझ्या मुलीला ऑटिझम असून तिला सरकारडून वैद्यकीय मदत मिळते. मात्र आता प्रशासन ठप्प झाल्यामुळे आपत्कालीन स्थितीमध्ये वैद्यकीय मदत परवडेल, असं मला वाटत नाही. अर्थात फार काळ प्रशासन बंद राहिलं तर मला दुसरे पर्याय शोधावे लागतीलच. मला माझी नोकरी आवडते, पण मी फार काळ विनापगार नोकरी करू शकणार नाही."

22 डिसेंबरपासून वेतन बंद करून प्रशासनाने फेअर लेबर स्टँडर्ड कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार 4 लाख कर्मचाऱ्यांच्या संघटनेने केली आहे.

इंडियानामध्ये जनगणनेवर परिणाम

प्रशासन ठप्प होण्याचा परिणाम केवळ वाँशिंग्टन नाही तर इतरही प्रदेशात पडला आहे. जनगणना विभागातील 40 टक्के कर्मचाऱ्यांना निधी नसल्यामुळे घरी पाठवण्यात आल्याचं वृत्त 'न्यूज अँड ट्रिब्यून'ने दिलं आहे.

राष्ट्रीय उद्यानांमध्ये कचऱ्याचे ढीग

राष्ट्रीय उद्यानांमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. 21 हजार कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आल्याने सार्वजनिक स्वच्छतागृहं स्वच्छ करणे, कचरा उचलणे, रस्त्यांची व्यवस्था, मदत केंद्रं बंद पडली आहेत.

ही उद्याने लोकांसाठी सुरू ठेवण्यात आली आहेत, मात्र कर्मचाऱ्यांविना त्यांची स्थिती वाईट झाली आहेत.

नॅशनल मॉल आणि व्हाईट हाऊस परिसरातील जागांवरही कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत.

राजधानीचे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक आठवड्याला जिल्हा स्थानिक निधीमधील 46 हजार डॉलर वापरण्याचा निर्णय वॉशिंग्टनचे महापौर म्युरिएल बॉवजर यांनी घेतला आहे.

न्यू यॉर्कमध्ये गव्हर्नर अँड्र्यू क्युओमो यांनी 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' आणि एलिस आयलंड परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज 65 हजार डॉलर्सची तरतूद केली आहे.

मानवी मलमूत्र आणि स्वच्छतागृह साफ न केल्यामुळे योसेमाइटमधील लोकांनी रस्त्यांनाच स्वच्छतागृह बनवल्याचं दृश्य असल्याचं 'द लॉस एंजल्स टाइम्स'ने एका बातमीत सांगितलं आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शास्त्रज्ञांनी कामकाज थांबवले

प्रशासन ठप्प झाल्यावर निधीचा ओघ आटला आणि त्यामुळे नॅशनल सायन्स फाउंडेशन आणि इतर प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञांनी काम थांबवलं आहे. प्रशासन ठप्प झाल्यामुळे संशोधन प्रकल्प रखडू शकतात तसेच संशोधनसंस्थांमधील नव्या संशोधनावर परिणाम होऊ शकतो, असं अमेरिकन असोसिएशन फॉर द अॅडवान्समेंट फॉर सायन्सचे प्रमुख रश होल्ट यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)