You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमरीना भट: हलके फुलके विषय घेऊन व्हीडिओ करणाऱ्या काश्मिरी युवतीची गोळ्या घालून हत्या
टेलिव्हिजन अभिनेत्री आणि गायिका अमरिना भट हिची काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात हत्या झाली. सोशल मीडियावर हजारो फॉलोवर्स असलेल्या अमरिनाच्या हत्येमुळे काश्मीरमध्ये खळबळ उडाली असून लोकांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झालं आहे. फ्रीलान्स फोटोजर्नालिस्ट आबिद भट (यांचं अमरीनाशी कोणतही थेट नातं नाही) तिच्या कुटुंबीयांना भेटले. अमरिनाच्या घरचे अजूनही तिच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत.
25 मे रोजी संध्याकाळी, अमरीनाचे मेहुणे झुबेर अहमद शेख काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील एका मशिदीत प्रार्थना करत होते. त्या दरम्यान त्यांना गोळीबार झाल्याचा आणि नंतर आरडाओरड सुरू असल्याचा आवाज आला.
हा आवाज ऐकून झुबेर मशिदीजवळ असलेल्या आपल्या घराकडे धावत सुटले. तिथे त्यांना 30 वर्षांची अमरीना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.
झुबेर यांनी फोटो जर्नालिस्ट अबिद भट यांना घटनास्थळी नेलं. तिच्या खोलीच्या भिंतीकडे बोट दाखवत ते म्हणाले, "इथं सर्वत्र रक्त सांडलं होतं."
अमरिनाची हत्या झाली तेव्हा तिच्या सोबतच असणारा 11 वर्षांचा तिचा भाचा फरहान सांगतो की, दोन पुरुषांनी एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्याच्या बहाण्याने अमरिनाशी संपर्क साधला होता. पण तिने त्या पुरुषांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी बंदूक काढून तिच्यावर गोळ्या झाडल्या.
ती आत पळाली, तेव्हा एकाने तिच्या पाठीमागे जाऊन पुन्हा गोळ्या झाडल्या. या सगळ्या घटनेत फरहानच्या हातालाही गोळी लागली.
अमरिना आणि फरहानला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना गाडी सुद्धा मिळत नव्हतं. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. फरहानला किरकोळ उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
संघर्ष आणि हिंसाचाराने धगधगणारं काश्मीर
मागील अनेक दशकांपासून जगभरात स्वर्ग म्हणून ओळखलं जाणारं काश्मीर राज्य संघर्ष आणि हिंसाचाराने धगधगत आहे. विशेषतः मागील काही आठवड्यांपासून संशयित अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यांपैकी अमरीनाची हत्या ही धक्कादायक आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश काश्मीरच्या संपूर्ण भूभागावर दावा ठोकतात. मात्र या दोन्ही ही देशांचे काश्मीरच्या केवळ काहीच भागांवर नियंत्रण आहे. 1989 पासून या प्रदेशात भारताच्या केंद्रीय सरकार विरुद्ध हिंसक बंडखोरीला सुरवात झाली आहे.
अमरिनावर झालेल्या हल्ल्याच्या काही दिवस आधीचं, काश्मीर मधील अल्पसंख्याक असलेल्या एका हिंदूची हत्या करण्यात आली होती. अतिरेक्यांनी या हिंदू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याची बडगाम जिल्ह्यात त्याच्याच कार्यालयात गोळ्या झाडून हत्या केली.
या आठवड्यात, सरकारी शाळेतील एका महिला शिक्षिकेची देखील अशाच प्रकारे हत्या करण्यात आली. या हत्येचं वर्णन एका माजी मुख्यमंत्र्यांनी "घृणास्पद व ठरवून केलेला हल्ला" असं केलंय.
अमरिनाच्या मृत्यूच्या दोन दिवसांनंतर, काश्मीर पोलिसांनी तिच्या मारेकऱ्यांना ठार केल्याचं सांगितलं. पोलीसांनी हे दोन मारेकरी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं ही सांगितलं. आजवर भारतीय भूमीवर जे काही दहशतवादी हल्ले झाले त्या अनेक हल्ल्यांना या संघटनेला जबाबदार धरण्यात आलं आहे.
पण या संघटनेने अमरिनाला का मारलं याचं कारण त्यांनी अद्यापही दिलेलं नाही.
हल्ला का झाला याची कल्पनाच नाही- अमरिनचे वडील
अमरिनाचे वडील खजीर मोहम्मद भट म्हणतात की, त्यांच्या मुलीवर हल्ला का झाला याची त्यांना कल्पना नाही. अमरिना त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आधार होती. अमरिनाच्या निरर्थक हत्येमुळे आता आपलं भविष्यात कसं होईल ही चिंता भट कुटुंबीयांना लागून राहिली आहे.
खजीर भट सांगतात की, संगीतावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अमरीनने लहानपणीचं शाळा सोडली होती. ते सुरुवातीला त्यांच्या मुलीच्या गाण्याच्या विरोधात होते.
पण 2008 मध्ये पत्नीच्या निधनानंतर त्यांनी आपला विचार बदलला.
"अमरिनाच्या आईने मृत्यूपूर्वी मला सांगितलं होतं की, तुमच्या गाण्याच्या विरोधामुळे अमरिना दुखावली आहे आणि तुम्ही तिला तिची आवड जोपासू द्यावी" असं खजीर सांगतात. आजही ही आठवण सांगताना खजीर भट यांचे डोळे भरून येतात.
कुटुंबियांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्यामुळे अमरिनाने सुरवातीला छोट्या-मोठ्या केबल चॅनेलवर काम सुरू केलं. पण जेव्हा तिने तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली तेव्हा ती लोकप्रिय झाली.
अमरिना जेव्हा मरण पावली तेव्हा तिचे इन्स्टाग्रामवर वर 25,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. या प्लॅटफॉर्मवर ती चित्रपटांमधील गाणी आणि संवाद लिप-सिंक करतानाचे व्हिडिओ अपलोड करायची. तिच्या मृत्यूच्या बातमीनंतर शोकसंदेशांनी भरलेलं तीच प्रोफाइल आता डिलीट करण्यात आलं आहे.
अमरिना यूट्यूबवर देखील सक्रिय होती. तिथे ती लहान स्केचेस अपलोड करायची. सोमवार अखेर पर्यंत अमरिनाच्या युट्युब चॅनेलवर 19,000 पेक्षा जास्त सबस्क्राईबर्स होते. तिच्या व्हिडिओंखालच्या कमेंट्स पहिल्या तर लक्षात येतं की, अमरिनाचे फॅन्स तिच्या अभिनयाची, तिने निवडलेल्या विषयांची प्रशंसा तर करतातच शिवाय काश्मीरमधील वीज टंचाईसारख्या मुद्द्यांवर हलके-फुलके विचार देखील मांडताना दिसतात.
अमरिनाच्या वडिलांचे म्हणणे आहे की, भारताचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यांसारख्या सरकारी कार्यक्रमांमध्ये ही तिने आपला सहभाग नोंदवला होता. आजही तिच्या खोलीत तिला मिळालेले अनेक पुरस्कार ठेवले आहेत.
खजिर भट सांगतात, "ती लोकप्रिय होती आणि प्रत्येकजण तिला ओळखत होता."
विविध पक्षांच्या राजकारण्यांनी तिला आदरांजली वाहण्यासाठी आमच्या घरी भेट दिली.
काश्मीरमधील बहुतेक टेलिव्हिजन कलाकारांप्रमाणे, अमरीनलाही सुरवातीच्या काळात अभिनय क्षेत्रात काम मिळणं कठीण जात होतं. राज्यातील मुख्य प्रसारक असलेली दूरदर्शन वाहिनी हा काही विश्वासार्ह स्रोत नव्हती.
एका दिग्गज स्थानिक अभिनेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, मागील काही वर्षांत अभिनयाच्या संधी कमी झाल्या आहेत. विशेषतः 2019 साली जेव्हा भारत सरकारने कलम 370 रद्द केले तेव्हापासून तर परिस्थिती आणखी बिघडली आहे.
सरकारने गेल्या काही महिन्यापासून कम्युनिकेशन व मोबिलिटीवर देखील निर्बंध लादले आहेत. यानंतर आलेल्या कोव्हिड लॉकडाउनमुळे उपजीविकेवर ही ताण वाढला आहे.
त्यामुळेच कदाचित अमरिनाला आपलं कौशल्य दाखवण्यासाठी सोशल मीडियाकडे वळावं लागलं असेल.
या घटनेत अमरिनाचा भाचा फरहानला गोळी लागल्यामुळे त्याचा एक हात जायबंदी झाला आहे. तो सांगतो, अमरिना ही प्रेमळ आत्या होती. ती त्याच्या शाळेची फी भरायची, त्याला कपडे घेऊन द्यायची, आणि गेम खेळण्यासाठी तिचा मोबाईल फोन वापरण्याची ही परवानगी द्यायची.
फरहान सांगतो, "पुढच्या वर्षी कॉम्प्युटर विकत घेऊन देण्याचं तिने मला वचन दिलं होतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)