सुप्रिया सुळे : ...तर हात तोडून हातात देऊ #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच मोठ्या बातम्यांचा आढावा

1.हात तोडून हातात देईन-सुप्रिया सुळे

"महागाईच्या मुद्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या भेटीचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हात उगारला. पक्ष किंवा राजकीय विचार काहीही असो; पण महिलांचा अवमान कोणत्याच परिस्थितीत सहन करणार नाही. कुठल्याही पक्षाच्या महिलेवर हात उगारला तर हात तोडून त्याच्या हातात देईन," असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी महागाई विरोधात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी खासदार सुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

"भाजपच्या एका नेत्याने महिलेवर हात उगारला. ही आपली संस्कृती आहे का? यापुढे जर असा कुठेही प्रकार झाला तर आपण स्वत: पुढे येऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू. महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. ही प्रवृत्ती कुठेतरी थांबायला हवी. कायद्याने आपण न्याय मागणार आहोत. जोपर्यंत त्या तिघांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही," असं त्या पुढे म्हणाल्या.

2. आसामात पूर परिस्थिती बिकट, गृहमंत्र्यांचं मदतीचं आश्वासन

आसामात पूर परिस्थिती पाचव्या दिवशीही कायम असून उदलगिरी जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आसाम आपत्ती निवारण संस्थेने दिली आहे. नागाव भागात एक व्यक्ती बेपत्ता आहे. त्यामुळे मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. या पुरामुळे चार लाखापेक्षा अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामाचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांच्याशी बातचीत केली आणि केंद्राकडून शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं.

3. संभाजीराजेंची राज्यसभेची वाट बिकट?

राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. शिवसेनेच्या घोषणेने संभाजीराजेंना मोठा धक्का बसला आहे.

कारण राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी सर्वपक्षीयांनी मला मदत करावी, असं आवाहन मागील आठवड्यात संभाजीराजेंनी केलं होतं.

त्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिसाद दिला होता. पण मंत्री परब यांनी राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार असल्याची घोषणा करून संभाजीराजेंची राज्यसभेची वाट बिकट केली आहे. महाराष्ट्र टाइम्स ने ही बातमी दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह 15 राज्यातील राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या 57 खासदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे.

4. आता मंत्र्याच्या बंगल्यातील वीजपुरवठाही खंडित

गेल्याच आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर मंगळवारी मंत्र्यांच्या घरचा वीजपुरवठा तब्बल दीड तास खंडित झाल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.

मुंबईतील वीजमागणीचा अतिरिक्त ताण बेस्टच्या विद्युत पुरवठा यंत्रणेवर येत असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याचं सांगण्यात येत आहे.

मंगळवारी सकाळी 10 वाजणाच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे वीजरपुरवठा खंडित झाला आणि त्याचा फटका मंत्रालयाच्या समोरच्या बंगल्यांना बसला. यावेळी मंत्र्यांच्या घरी वेगवेगळ्या कामासाठी आलेल्या लोकांची गर्दी होती.

5. राज ठाकरे संतापले

राज ठाकरे सध्या पुण्यात आहेत. मंगळवारी ते पुण्यात एका पुस्तकाच्या दुकानात गेले असता प्रसारमाध्यमातील अनेक लोक तिथे दिसले. तिथले कॅमेरे पाहून राज संतापले आणि उद्वेगाने जगू द्याल का, असा प्रश्न विचारला.

राज ठाकरे हल्ली अनेकदा पुण्याच्या दौऱ्यावर असतात. येत्या 5 जूनला ते अयोध्येला जाणार असून हनुमान चालिसा आणि भोंगे याविषयावर त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवलं आहे. राज ठाकरे यांचा रुद्रावतार पाहून माध्यमांनी लगेच कॅमेरे खाली केल्याचं पहायला मिळालं.

सकाळ ने हा व्हीडिओ प्रकाशित केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)