You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र उष्णतेची लाट : उन्हामुळे दोघांचा मुत्यू, असा करा स्वत:चा बचाव
महाराष्ट्रात पारा वेगाने वर चढत असून उष्णतेची लाट आता राज्यभर पसरतेय. या उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू राज्यात झाल्याची माहिती मिळतेय.
जळगावात जितेंद्र माळी आणि अकोल्यात समाधान शिंदे या दोघांचा उष्माघाताने बळी गेल्याचं समोर येतंय. या उष्णतेचा फटका माणसांसह शेती आणि प्राण्यांना होण्याची भीती व्यक्त होतेय.
वायव्य, मध्य आणि पश्चिम भारतात निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पारा चाळीशीच्याजवळ पोहोचला आहे.
येत्या 2 एप्रिलपर्यंत उन्हाचा पारा कायम राहणार असण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यांनी याबद्दल ट्वीट केलं असून ते या ट्वीटमध्ये म्हणतात, "मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात येत्या 2 एप्रिलपर्यंत उष्णतेचा कडाका जाणवेल."
यंदा मार्च महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. मार्च महिन्यात 21 ते 24 मार्च आणि 29 ते 2 एप्रिलपर्यंतच्या कालावधीत दोन उष्णतेच्या लाटा नोंदवण्यात आल्या आहेत. 30 मार्चपासून राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय झालीय.
मुंबई, कोकण वगळता मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात कमाल पारा चाळिशी गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारीच मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या आसपास होते. मुंबईत तापमानाचा पारा कमी असला तरी उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. तसंच उष्ण वाऱ्यामुळं नाशिककरांची झोप उडाली आहे.
जळगाव, नाशिक जिल्ह्यात 30 मार्च, 1 आणि 2 एप्रिल रोजी उष्णतेची लाट तीव्र असेल.
अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि अकोला या जिल्ह्यात 30 व 31 मार्च आणि 1, 2 एप्रिल रोजी उष्णतेची लाट असेल.
अमरावती, बुलडाणा, 30 आणि 31 मार्च रोजी उष्णतेची लाट तीव्र असेल.
चंद्रपूर जिल्ह्यात 31 मार्च तर, नागपूर जिल्ह्यात 30 मार्च रोजी उष्णतेची लाट सर्वाधिक सक्रीय असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
सोमवारपासून विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान वाढ अधिक जाणवू लागली आहे. मंगळवारी विदर्भ विभागात चंद्रपूरमध्ये 43.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर अकोला येथे 43.1 अंश सेल्सिअस कमाल तापमान होतं.
गडचिरोली वगळता इतर सर्वच केंद्रांवर पारा 40 अंशांच्या आसपास होता. मराठवाड्यातही परभणी आणि नांदेड या दोन्ही केंद्रांवर 41 अंशांहून अधिक कमाल तापमान नोंदलं गेलंय.
मार्च अखेरीस ही स्थिती राज्यात असल्याने एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात असंच वातावरण असेल का? हा प्रश्न आता नागरिकांना सतावतोय.
हे तापमान कशामुळे वाढलं?
गुजरात आणि राजस्थानमध्ये सध्या तापमान वाढलं आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये अनेक ठिकाणी 38 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान नोंदवलं गेलं असून तिथे उष्णतेची लाट आली आहे.
राजस्थानच्या बाडमेरमध्ये तापमान 40 अंश सेल्सियसवर गेलं आहे.
उत्तर तसंच पश्चिमेकडील या परिसरातून उष्ण आणि कोरडे वारे उत्तर कोकणाच्या दिशेनं वाहात आहेत. त्यामुळे या परिसरात तापमानात वाढ झाली आहे.
उष्णतेची लाट म्हणजे काय?
वेगवेगळ्या देशांत तिथल्या भौगोलिक स्थितीनुसार उष्णतेचे वेगवेगळे निकष असू शकतात.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात सलग दोन दिवस 37 अंश सेल्सियसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा सलग दोन दिवस तापमानात नेहमीपेक्षा 4.5 अंशांहून अधिक वाढ झाली, तर उष्णतेची लाट आल्याचं मानलं जातं.
मुंबई आणि रायगड परिसरात अनेक ठिकाणी सध्या या दोन्ही गोष्टी घडताना दिसून येत आहेत. शिवाय हवेतील आर्द्रतेमध्येही काही ठिकाणी घट झाली आहे. त्यामुळे एरवी दमट हवा असणाऱ्या या परिसरात उन्हाची तीव्रता आणखी जाणवते.
कलाम तापमानातील वाढ 6.5 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर त्याला अतिउष्ण लाट किंवा सिव्हीयर हीट वेव्ह (severe heat wave) म्हटलं जातं.
काय काळजी घ्याल?
तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे त्याचे गंभीर परिणाम मानवी शरिरावर होऊ शकतात. सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला अचानक झालेली ही तापमानवाढ सहन करता येऊ शकते.
पण नवजात बालकं, वयोवृद्ध व्यक्ती किंवा जुने गंभीर आजार असलेल्या लोकांवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशा वातावरणात आपण काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांच्या मते,
- उष्णतेची लाट आल्यानंतर आपण थेट ऊन्हाच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे. शरीराचं तापमान शक्य तितकं थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवावं. तहान लागली नाही तरी मुबलक प्रमाणात पाणी प्यावं.
- ORS, लिंबू सरबत, तांदळाची पेज, ताक आदी पेय पिता येऊ शकतात.
- चहा-कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक यांच्यामुळे शरिरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ते टाळायला हवेत.
- हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं टोपी, रुमाल यांनी झाकावं.
- किमान दोनवेळा थंड पाण्याने आंघोळ करावी.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)