You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नितीश कुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आज (27 मार्च) एका तरुणानं अचानक हल्ला केला. सुदैवानं, नितीश कुमार या हल्ल्यातून बचावले आणि त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही.
पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बिहारमधील बख्तियारपूरमध्ये नितीश कुमार त्यांच्या सहकाऱ्यांना भेटत असताना हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाहीय. पीटीआयनं सुद्धा सूत्रांच्या मार्फतच ही माहिती दिलीय.
नितीश कुमार यांचं बख्तियारपूरशी जवळचं नातं आहे. आपलं बालपण त्यांनी याच भागात घालवलं.
स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नितीश कुमार इथं आले होते.
नितीश कुमार यांच्यावरील हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. हल्लेखोर तरुण 20 ते 30 वर्षांच्या दरम्यानच्या वयाचा असल्याचे दिसून येते.
नितीश कुमारांच्या मागून येऊन तरुणानं हल्ला केल्याचं सीसीटीव्हीच्या व्हीडिओत दिसतं. या तरुणाने हल्ल्यासाठी हात उचलताच सुरक्षारक्षकांनी त्याच्यावर झडप टाकत त्याला बाजूला ओढत नेलं.
टी-शर्ट आणि ट्राऊझर परिधान केलेल्या या हल्लेखोर तरुणाला सुरक्षारक्षकांनी पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
दुसऱ्या एका व्हीडिओत पोलीस हल्लेखोराला खेचत बाजूला नेत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर मानसिकदृष्ट्या आजारी आहे.
हल्लेखोर तरुणाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्याची ओळख अद्याप जाहीर करण्यात आली नाहीये.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)