You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मूल होऊ इच्छिणाऱ्या महिलांचे शोषण करणारे 'स्पर्म डोनर'; बीबीसीच्या तपासात गंभीर गोष्टी उघड
- Author, जेमा डन्स्टन
- Role, बीबीसी वेल्स इन्वेस्टिगेट्स
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
मूल होऊ इच्छिणाऱ्या महिलांना लैंगिक संबंध ठेवण्यासाठी छळल्याचं आणि अशा गरजू महिलांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे, बेकायदेशीर 'स्पर्म सँपल' (शुक्राणूंचे नमुने) ऑनलाईन माध्यमातून विकल्याचे 'यूके'मध्ये उघडकीस आले आहे.
'फर्टिलीटी ट्रीटमेंट' घेऊनही मूल होऊ न शकणाऱ्या महिला सोशल मीडियावरील अनेक वेबसाइट्सचा आधार घेऊन मातृत्वासाठी प्रयत्न करत आहेत.
'टिंडर फॉर स्पर्म'सारख्या या वेबसाइट्स म्हणजे एकप्रकारच्या बेकायदा आणि अनियंत्रित मार्केटचा भाग आहेत. यासंदर्भात अधिक सखोल माहिती घेण्यासाठी 'बीबीसी वेल्स'ने आपला तपास चालू केला.
बीबीसीनं 100 पाऊंड खर्च करून 'नेक्स्ट डे डिलीव्हरी'च्या माध्यमातून अशा वीर्याचे नमुने ऑर्डर केले. एका व्यक्तीनं 'बेबी बॅटर' या नावानं ऑनलाइन माध्यमांवर याची जाहिरात केली होती.
तिथूनच बीबीसीनं हे वीर्य ऑर्डर केल्यानंतर ते एका टोमॅटो पासाटाच्या गोठवलेल्या कार्टनसोबत एका बॉक्समधून पाठवण्यात आले.
मात्र, अशाप्रकारच्या 'शोषण करणाऱ्या डोनर्सकडून' (Predatory Donors) महिलांचं शोषण होण्याचा धोका आहे, असा इशारा यूकेच्या प्रजनन-विषयक नियामक संस्थेनं आधीच दिला आहे.
तपासाचा एक भाग म्हणून, मी ऑनलाइन पद्धतीनं वीर्य मिळवणं किती सोपं आहे, हे पाहण्याचं ठरवलं.
अशा प्रकारची सेवा देऊ करणाऱ्या पुरुषांची अजिबात कमतरता नाहीये, असं मला आढळलं.
वीर्याच्या एका सिरिंजसाठी सुमारे 12 हजार 766 रुपये
मला एका ऑनलाइन जाहिरातीवरून असं समजलं की, पोस्टाद्वारे होणाऱ्या डिलीव्हरीसाठी मी 'जो डोनर' नावाच्या एका व्यक्तीवर विश्वास ठेवू शकते.
मोठ्या प्रमाणावर वीर्यदान करणारी ही व्यक्ती असून, जगभरात नैसर्गिक संबंध व कृत्रिम रेतन (artificial insemination) यांद्वारे आपली 180 मुलं जन्माला आल्याचा दावा ती व्यक्ती करते.
त्याचं मूळ नाव 'रॉबर्ट अल्बॉन' असं असल्याचं 'कार्डिफ'मधील एका खटल्यानंतर उघड झालं. बेकायदेशीर वीर्यदानामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी इशारा देण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्याचं नाव जाहीर केलं होतं.
आम्ही एका टोपणनावाचा वापर करून त्याच्याशी संपर्क साधला.
काही ईमेल्स आणि एका छोट्याशा फोन कॉलनंतर लगेच अगदी दुसऱ्या दिवशी डिलीव्हरी मिळवण्याची व्यवस्था झाली.
ना त्यानं आम्हाला आमची ओळख पटवण्यास सांगितलं, ना त्यानं आम्हाला कोणतेही हेल्थ रिपोर्ट्स पाठवण्यास सांगितले.
त्यानं आमच्याकडून फक्त पोस्टानं पाठवलेल्या वीर्याच्या एका सिरिंजसाठी सुमारे 12 हजार 766 (100 पाउंड) रोख घेतले.
हे सिरिंज त्यानं टोमॅटो पासाटाच्या बॉक्समध्ये गोठवलेल्या स्वरूपात पाठवलेली होती.
आम्हाला वीर्याचे हे नमुने मिळाल्याच्या 4 तासांनंतर आम्ही त्या नमुन्यांची तपासणी केली.
एका परवानाधारक क्लिनिकनं या नमुन्यांच्या तपासणीनंतर सांगितलं की, यातील सर्व शुक्रपेशी मृत आहेत.
आम्ही हे वीर्य कशाप्रकारे साठवलं आणि त्याची वाहतूक कशी केली, याबद्दलच त्या व्यक्तीनं अर्थात रॉबर्ट अल्बॉननं प्रश्न उपस्थित केला.
त्यानं असंही सांगितलं की, त्याच्या या पार्सल डिलीव्हरीदरम्यान फलनासाठी पुरेसे शुक्रजंतू सहसा टिकून राहतातच.
शिवाय, त्याने अशाच प्रकारे पाठवलेल्या वीर्यामुळे 'अनेक यशस्वी गर्भधारणा'ही झाल्या आहेत, असंही तो म्हणाला.
महिलांशी संपर्क साधण्यासाठी फेसबुकचा वापर
रॉबर्ट अल्बॉन आणि त्याच्यासारख्या शेकडो इतर पुरुषांनी अशाप्रकारे शुक्राणूंच्या शोधात असलेल्या महिलांशी संपर्क साधण्यासाठी फेसबुकचा वापर केला आहे.
फेसबुकरवच्या अशा काही ग्रुप्समध्ये अगदी 40 हजारपर्यंतही सदस्य आहेत.
मी एका ब्लँक प्रोफाइलसह अशाच एका डोनर ग्रूपमध्ये सामील झाले. तेव्हा मलाही काही मेसेज आले. त्यातले काही मेसेज फारच खरे वाटावेत, असे गरजू होते. त्यातील अनेकांनी मला लैंगिक संबंधाची मागणी केली.
काहींनी वीर्यनमुन्यांसाठी किती पैसे घेणार, हे विचारलं. तर काहींनी खासगी अश्लील फोटोंची मागणी केली. शिवाय, काहींनी भेटण्यासाठी वा व्यवहार करण्यासाठी सतत मेसेजेस पाठवले.
काही पुरुषांनी तर सतत लैंगिक संबंधांसाठी आग्रह धरला आणि तोच सर्वात स्वस्त व प्रभावी पर्याय असेल, असं सांगून मला अशा संबंधांसाठी तयार करण्याचा खूप प्रयत्न केला.
मी एका अशा महिलेलाही पाहिलं जिनं यासंदर्भातच एक इशाराही दिला होता. तिला नॉर्थ वेल्समधील एका पुरुषाकडून अशाच प्रकारे वीर्य मिळालं होतं.
पण, नंतर हा पुरूष लैंगिक गुन्ह्यासाठी दोषी ठरलेला व्यक्ती असल्याचं तिला समजलं.
मानवी प्रजनन आणि भ्रूणविज्ञान प्राधिकरणानं (The Human Fertilisation and Embryology Authority - HFEA) अशाप्रकारचं बेकायदेशीर वीर्यदान हा यूकेमध्ये एक फौजदारी गुन्हा असल्याचंही नमूद केलं आहे.
'मला आई व्हायचं आहे, असं मला नेहमीच वाटत होतं'
साऊथ वेल्समधील टियाना आणि त्यांची पत्नी निक्की यांनी अशाच बेकायदेशीर वीर्यदानाचा मार्ग स्वीकारला.
त्यांनी सांगितलं की, त्या एनएचएस (NHS) निधीसाठी पात्र नव्हत्या. तसेच खासगी उपचारदेखील खूप महाग असल्याचं त्यांना वाटलं.
"मला आई व्हायचं आहे, असं मला नेहमीच वाटत होतं. आमच्या कुटुंबात काहीतरी अपूर्णता आहे, याची आम्हाला जाणीव होती," असं टियाना म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितलं की, त्यांना यातल्या धोक्यांची जाणीव होती. तसेच संभाव्य देणगीदारांकडून येणाऱ्या दबावाबद्दलही ते सावध होते.
"काही विचित्र लोकही यात असतात. ते पूर्णपणे चुकीच्या कारणांसाठी यात आलेले असतात," असंही त्यांनी नमूद केलं.
"एक वेबसाइट आहे, जी कॅटलॉग आणि टिंडर यांच्या मिश्रणासारखी आहे. यात तुम्ही डोळ्यांचा आणि केसांचा रंग यांसारखे निकष लावून (फिल्टर वापरून) तुम्हाला नेमकं हवं तसं व्यक्तिमत्त्व शोधू शकता."
हे जोडपं कृत्रिम रेतनासाठी (artificial insemination) प्रयत्न करत होतं, पण त्यांनी सांगितलं की, अनेकदा लैंगिक संबंध हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं सुचवलं जात असे.
"मला वाटतं, मी आणि माझी पत्नी एकमेकांच्या सोबत होतो ही खूप मोठी मदत ठरली. त्यामुळे आम्हाला नको असलेली गोष्ट करण्यासाठी कुणीही आमच्यावर दबाव आणू शकलं नाही."
"कारण, जेव्हा तुम्हाला फक्त मूल हवं असतं, तेव्हा तुमची अवस्था खूपच संवेदनशील किंवा असुरक्षित झालेली असते," असंही त्यांनी नमूद केलं.
टियाना आणि निक्की यांना अखेरीस 'को-पॅरेंटिंग' (सह-पालकत्व) वेबसाइटवर असा एक डोनर सापडला ज्यांच्याबाबत त्यांना सुरक्षित वाटलं.
त्यानंतर त्यांनी एक करार केला. जेणेकरून संपर्क आणि पालकत्वाचे अधिकार यांबाबतच्या त्यांच्या योजनांची सर्व कल्पना संबंधित पक्षांना असेल.
पण हा काही कायदेशीर करार नाही.
"भविष्यात येऊन तो कदाचित पालकत्वाचा हक्क सांगण्याचा प्रयत्न करू शकतो आणि आम्हाला कायदेशीर लढाईत ओढू शकतो, अशी शक्यता अजूनही आहे," असं टियाना यांनी कबूल केलं.
"पण मला नक्कीच वाटतं की, असं घडू नये म्हणून आपण शक्य तितक्या सर्व उपाययोजना केल्या आहेत आणि माझा मनापासून विश्वास आहे की, तो आपल्यासोबत असं कधीच करणार नाही."
त्यांना आता 1 वर्षाचा मुलगा आहे.
आम्हाला खूप काळापासून आमचं स्वत:चं मूल हवं होतं. साहजिकच, आम्ही एक जोखीम पत्करली. पण ती खरोखरच सार्थ ठरली आहे.
बेकायदेशीर वीर्यदाते विविध प्रकारे सेवा देतात. यामध्ये मोफत लैंगिक संबंध ठेवणार्यांपासून ते कृत्रिम गर्भधारणेसाठी जगभर प्रवास करण्याचा खर्च आकारणाऱ्यांपर्यंत, सर्व प्रकारच्या डोनर्सचा समावेश असतो.
वीर्यदान करणारा डोनर काय म्हणतो?
अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या 25 वर्षीय डॅनियल बायेन यांनी 2025 च्या उन्हाळ्यात 'कृत्रिम रेतन' (artificial insemination) पद्धतीनं बीजदान करण्यासाठी ब्रिटनचा दौरा केला होता.
त्यांच्या मते, या प्रक्रियेतून 4 बाळांचा जन्म झाला.
बीबीसीने डॅनसोबत 3 दिवस चित्रीकरण केलं. तो ऑनलाइन व्हीडिओमध्ये स्वतःला 'सर्वाधिक मानधन घेणारा' आणि 'नफ्यासाठी काम न करणारा डोनर' असल्याचा दावा करतो.
"यासाठी, केवळ प्रवासाचाच नाही, तर माझ्या संपूर्ण आरोग्याचा आणि राहणीमानाचाही सर्व खर्च भागवणं आवश्यक आहे," असंही तो म्हणाला.
"यात कम्यूनिकेशन, आरोग्य, इन्स्टाग्रामवर पोस्ट करणं, माहिती प्रसारित करणं आणि शिक्षण यांचाही समावेश आहे."
त्यानं सांगितलं की, यूकेमध्ये त्यानं लोकांकडून फक्त प्रवास खर्च देण्याची मागणी केली होती. मात्र, काही लोकांनी त्यांना शुक्रजंतू दान करण्यासाठी सुमारे 19 लाख 2 हजार 210 रुपयांपर्यंतची (20,000 डॉलर्स) रक्कम देऊ केली होती.
बीबीसीनं त्याला विचारलं की, ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि ज्यांना डोनर्सची गरज आहे, अशा लोकांचा ते गैरफायदा घेतात का?
त्यावर त्यानं उत्तर दिलं की, इतर लोक काय विचार करतात, याची त्याला फारशी पर्वा नाही.
त्यानं सांगितलं की, ज्या मुलांना आणि कुटुंबांना ते मदत करत आहेत, अशांसाठी काय सर्वोत्तम ठरू शकेल, याकडेच त्यांचं मुख्यत: लक्ष असतं. डॅन स्वतःचं वर्णन 'ओपन डोनर' असं करतात.
याचा अर्थ असा की, डोनरच्या माध्यमातून जन्मलेल्या मुलांना आपली ओळख माहीत असावी, यात त्यांना काहीच अडचण वाटत नाही.
ते आपल्या दैनंदिन जीवनाबद्दलचे व्हीडिओही ऑनलाइन शेअर करतात. तसेच, ते आपल्या आरोग्यविषयक चाचण्यांविषयीची माहितीही जाहीर करतात. तरीही, ते स्वतःबद्दलची सर्वच माहिती सार्वजनिक करत नाहीत.
"एक डोनर म्हणून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, तुमच्या नावावर खूप जास्त मालमत्ता नसावी. जेणेकरून, कुणाला तुमचं किंवा तुमच्या कुटुंबीयांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं असेल, तर ते तसं करू शकणार नाहीत," असंही तो म्हणाला.
"अर्थात, तुमच्या आरोग्याबाबत आणि लैंगिक संक्रमित आजारांच्या तपासणीबाबत तुम्ही खोटं अजिबात बोलू नये. पण काही गोष्टींबद्दल फारशी माहिती न देणंच योग्य ठरू शकतं. जसं की तुम्ही कुठे काम करता, काय करता किंवा ज्यांना तुम्ही मदत केली आहे ते लोक तुमच्यावर कायदेशीर खटला भरू शकतील अशी माहिती, उदाहरणार्थ, तुमचे पूर्ण नाव किंवा पत्ता."
डॅनने पुढे असा दावा केला की, युनायटेड किंगडममध्ये (UK) वीर्यदान करताना त्यानं कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नव्हतं.
HFEA काय सांगतं?
युनायटेड किंगडममधील परवानाधारक क्लिनिक्सचं नियमन HFEA द्वारे केलं जातं. त्यांनी आपल्या संकेतस्थळावर एक विशेष पेज तयार केलं आहे. तिथं लोक यासंबंधीच्या कायद्याची माहिती घेऊ शकतात.
HFEA ने सांगितलं की, त्यांनी मोठ्या संख्येनं शुक्राणूंचं दान करणाऱ्या, परंतु कोणत्याही नियमांच्या अधीन नसलेल्या (अनियंत्रित) डोनर्सची प्रकरणं पोलिसांकडे सोपवली आहेत.
त्यांनी हेदेखील स्पष्ट केलं, "हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे की, अशा बेकायदेशीर डोनर्सची मदत घेणं, हा फौजदारी गुन्हा नाही आणि त्यामुळे असं करताना तुम्ही कायद्याचं उल्लंघन करत नसता. मात्र, डोनर्स किंवा शुक्राणू उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या इतर व्यक्ती मात्र गंभीर गुन्हा करणाऱ्या असू शकतात."
एचएफई कायद्यानुसार, मानवाद्वारे वापरल्या जाणाऱ्या युग्मकांचा (अंडी किंवा शुक्राणू) 'वापर करणं, साठवणं, मिळवणं, तपासणं, प्रक्रिया करणं आणि वितरण करणं', हे सर्वच बेकायदेशीर आहे. जोपर्यंत हे सगळं एचएफईए परवानाधारक क्लिनिकद्वारे केले जात नाही, तो पर्यंत ते बेकायदेशीर आहे.
एचएफईएच्या स्ट्रॅटेजी अँड कॉर्पोरेट अफेअर्सच्या संचालक, क्लेअर एटिंगहाऊसेन म्हणाल्या की, अल्बोनकडून आम्हाला मिळालेली शुक्राणूंची डिलीव्हरी 'धक्कादायक' होती.
"कायदा अगदी स्पष्ट आहे की, एचएफईएच्या परवान्याशिवाय, तुम्ही शुक्राणूंवर प्रक्रिया करू शकत नाही. तुम्ही शुक्राणूंचं वितरण करू शकत नाही. ते पाठवून तो नेमकं हेच करत आहे."
यावर उत्तर देताना, अल्बोन म्हणाला की, हे नियम त्याला लागू होत नाहीत. कारण, त्याच्या मते खासगी दान देणं कायदेशीर आहे. यामध्ये, त्यासाठी शुल्क आकारणं देखील समाविष्ट आहे.
त्याने असंही सांगितलं की, तो कोणत्याही महिलेसाठी 'थेट धोका' नाहीये.
'मेटा' कंपनी काय म्हणते?
एटिंगहॉसेन म्हणाल्या की, फेसबुकची मालकी असलेल्या 'मेटा' या सोशल मीडिया कंपनीमुळे 'कायद्याचं उल्लंघन करण्यास मदत' होत आहे. हा मुद्दा त्यांनी मार्चमध्ये यूके संसदेच्या एका निवड समितीसमोर मांडला होता.
HFEA ने यासंदर्भात मेटाशी थेट संपर्क साधल्याचं सांगितलं. मात्र, एटिंगहॉसेन यांनी हेही स्पष्ट केलं की, त्या याबाबत वास्तववादी दृष्टिकोन बाळगतात. कारण, अशा प्रकारचे सोशल मीडिया ग्रुप्स पूर्णपणे बंद केल्यास, हीच गोष्ट फक्त दुसऱ्या ठिकाणी व्हायला सुरू होईल.
"सतत आरोग्यविषयक इशारे देणं आणि सुरक्षितपणे मदत व उपचार कुठे मिळवता येतील, याचे पर्याय उपलब्ध करून देणं, यामुळे ही समस्या पूर्णपणे सुटणार नाही, तरीही त्यातून नक्कीच मदत होईल."
त्यांनी वैयक्तिक सुरक्षेबद्दलही चिंता व्यक्त केली.
"यापैकी काही डोनर्स फक्त नैसर्गिक गर्भाधारणेची जाहिरात करत आहेत. मूळात काही प्रकरणांमध्ये अशा गोष्टी या महिलांना लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यासारख्या आहेत, ज्यांना कदाचित तशी इच्छाही नसेल."
मेटा कंपनीनं म्हटलं, "आमच्याकडे शेअर केलेल्या ग्रुप्स किंवा पोस्ट्सची तपासणी केली जाईल आणि आमच्या नियमांचं उल्लंघन करणारा कंटेट काढून टाकला जाईल".
"आमच्याकडे नियामकांसाठी एक विशेष तक्रार प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे ते अशा मजकुरावर लक्ष वेधतात जो या धोरणांचं उल्लंघन करत नाही, परंतु, स्थानिक कायद्याचं उल्लंघन करतो. आम्ही या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांसोबत जवळून सहकार्य करत आहोत," असंही त्यात पुढे म्हटलं.
नॅशनल पोलीस चीफ्स कौन्सिलच्या प्रवक्त्यानं सांगितलं, "अनियमित वीर्यदानात अनेक धोके आहेत आणि त्यामुळे सर्वात संवेदनशील व्यक्तींचं शोषण होऊ शकते. आम्ही जनतेला असा सल्ला देतो की, त्यांनी धोके समजून घ्यावेत आणि कायदेशीर मार्गांचाच अवलंब करावा.
"कोणाला काही चिंता वाटत असल्यास, त्यांनी पोलिसांना कळवावं, जेणेकरून आम्ही मदत करू शकू आणि तपास करू शकू," असंही त्यांनी नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)