टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख असलेले इलॉन मस्क कोण आहेत? त्यांची संपत्ती किती आहे?

    • Author, लिव्ह मॅकमोहन, नॅटली शर्मन, डिअरबेल जॉर्डन आणि ऑसमंड चिया बिझनेस आणि टेक्नॉलॉजी रिपोर्टर्स
  • Published
  • वाचन वेळ: 10 मिनिटे

स्पेसएक्स, टेस्ला, एक्स यांसारख्या कंपन्यांचे प्रमुख आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज इलॉन मस्क हे जगातील पहिले ट्रिलिनियर (खर्वपती) बनले आहेत.

बऱ्याच काळापासून इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत किंवा नेहमी त्या स्थानाच्या खूप जवळ राहिले आहेत.

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2025 मध्ये इलॉन मस्क हे 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले.

यानंतर महिनाभरातच टेस्लाच्या भागधारकांनी इलॉन मस्क यांच्यासाठी असं वेतन पॅकेज मंजूर केलं, ज्याची किंमत 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत जाऊ शकते.

पण जून 2026 मध्ये मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे शेअर्स बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. त्यांची संपत्ती अब्जाधीशांच्या पातळीवरून थेट ट्रिलिनियरच्या स्तरावर पोहोचली. स्पेसएक्सकडे एक्स, ग्रोक आणि स्टारलिंक कंपन्यांचेही मालकी हक्क आहेत.

मात्र, इलॉन मस्क हे केवळ त्यांच्या अफाट संपत्तीसाठीच ओळखले जात नाहीत.

स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क हे त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चालू घडामोडींपासून ते मानवतेच्या भविष्यापर्यंत विविध विषयांवर आपली मतं मांडत असतात.

गेल्या काही वर्षांत इलॉन मस्क यांचा राजकारणातील सहभागही वाढला आहे. 2024 च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मदत केली होती. परंतु, त्यांच्या या भूमिकेमुळे काही गुंतवणूकदार नाराज झाले होते.

त्यानंतर मस्क यांनी ब्रिटनमधील घडामोडींमध्येही रस घेतला. त्यांच्या मतांमुळे आणि 'एक्स' या प्लॅटफॉर्मचा लोकांच्या चर्चांवर व विचारांवर होणाऱ्या प्रभावामुळे पंतप्रधानांसह काही राजकारण्यांनी त्यांच्यावर टीका केली आणि प्रश्नही उपस्थित केले.

जन्म कुठे झाला?

दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे जन्मलेल्या इलॉन मस्क यांनी लहान वयातच आपलं व्यावसायिक कौशल्य दाखवून दिलं. ते आणि त्यांचा भाऊ घरोघरी जाऊन स्वतः बनवलेले चॉकलेट इस्टर एग्ज विकायचे. तसेच, वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी आपला पहिला कॉम्प्युटर गेम तयार केला होता.

इलॉन मस्क यांनी त्यांचं बालपण कठीण गेल्याचं वर्णन केलं होतं. आई-वडिलांचा घटस्फोट, शाळेत होणारा छळ (बुलिंग) आणि 'ॲस्परजर्स सिंड्रोम'मुळे इतरांशी सहज संवाद साधण्यात अडचण येत होती.

संधी मिळताच इलॉन मस्क हे घर सोडून उच्च शिक्षणासाठी आधी कॅनडाला आणि नंतर अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी आयव्ही लीग येथे युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियामध्ये अर्थशास्त्र आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास केला.

मेरी क्लेअरसाठी 2010 मध्ये इलॉन मस्क यांची पहिली पत्नी जस्टिन मस्क यांनी एक लेख लिहिला होता.

मस्क आणि जस्टिन यांची भेट कॉलेजमध्ये झाली होती. नंतर त्यांनी 2000 मध्ये विवाह केला होता. त्यांनी लेखात म्हटलं होतं की, कोट्यवधी डॉलर्स कमावण्यापूर्वीही मस्क 'सहज हार मानणारे नव्हते म्हणजे ते 'नाही' हे उत्तर सहज मान्य करत नसत'.

"व्यवसायात यश मिळवून देणारी स्पर्धा करण्याची आणि नेहमी पुढे राहण्याची किंवा वर्चस्व गाजवण्याची मस्क यांची वृत्ती घरी आल्यावरही बदलत नसत. लग्नात नृत्य करताना मस्क यांनी त्यांना, 'या नात्यात मीच अल्फा (निर्णय घेणारा प्रमुख) आहे,' असं म्हटलं होतं," हे जस्टिन यांनी आवर्जून सांगितलं.

इलॉन मस्क यांनी इतकी संपत्ती कशी कमावली?

स्टॅनफोर्ड विद्यापीठात भौतिकशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर मस्क यांनी तो अभ्यासक्रम अर्ध्यातच सोडला. त्यानंतर 1990 च्या दशकातील 'डॉट-कॉम बूम'च्या काळात त्यांनी दोन तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप्स सुरू केले.

या कंपन्यांमध्ये एक वेब सॉफ्टवेअर कंपनी आणि एक ऑनलाइन बँकिंग कंपनीचा समावेश होता. हीच ऑनलाइन बँकिंग कंपनी पुढे पेपॅल बनली. 2002 मध्ये पेपॅल ही कंपनी 'ईबे'ला 1.5 अब्ज डॉलर्समध्ये विकण्यात आली.

यातून मिळालेली संपत्ती मस्क यांनी स्पेसएक्स या नवीन रॉकेट कंपनीत आणि टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपन्यांमध्ये गुंतवली.

स्पेसएक्स ही कंपनी त्यांनी नासाला किफायतशीर पर्याय तयार करण्याच्या उद्देशाने सुरू केली होती. तर टेस्लामध्ये ते सुरुवातीला संचालक मंडळाचे अध्यक्ष होते आणि 2008 मध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) झाले.

या दोन्ही कंपन्यांनी आपापल्या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले आहेत. काही वेळा त्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावरही पोहोचल्या होत्या, तरीही त्यांनी उद्योगक्षेत्राला नवी दिशा दिली आहे.

याशिवाय, ऑक्टोबर 2022 मध्ये इलॉन मस्क यांनी टि्वटर (आताचे एक्स) हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतले.

एक्स हे फक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म न राहता अनेक सेवा देणारे 'एव्हरीथिंग ॲप' बनावे, अशी मस्क यांची इच्छा आहे. पण, काही अंदाजांनुसार त्यांनी एक्ससाठी मोजलेल्या 44 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत कंपनीचे मूल्य घसरून सुमारे 9.4 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आले आहे.

मस्क यांच्या काळात काही कंपन्यांनी एक्स प्लॅटफॉर्म सोडले. काही वृत्तांनुसार, एक्सवर द्वेषपूर्ण पोस्ट आणि भाषणांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे काही कंपन्यांना अशा गोष्टींबरोबर स्वतःचं नाव जोडायचं नव्हतं.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय क्षेत्राबाबतही मस्क यांची मोठी महत्त्वाकांक्षा आहे. चॅटजीपीटीची निर्मिती करणाऱ्या ओपनएआयमध्ये ते सुरुवातीच्या गुंतवणूकदारांपैकी एक होते, पण 2018 मध्ये त्यांनी त्या संस्थेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी 'एक्सएआय' ही स्वतःची एआय कंपनी सुरू केली. या कंपनीचा उद्देश 'विश्वाचं खरं स्वरूप समजून घेणं' असा असल्याचे त्यांनी सांगितलं होतं.

फेब्रुवारी 2024 मध्ये मस्क यांनी ओपनएआय आणि त्याचे प्रमुख सॅम ऑल्टमन यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.

मस्क यांचा आरोप होता की, त्यांनी ओपनएआयची स्थापना करताना मदत केली होती. या कंपनीने सुरुवातीच्या ना-नफा आणि ओपन सोर्स (मुख्य स्रोत) तत्त्वांपासून दूर जात मायक्रोसॉफ्टबरोबर हातमिळवणी केली आहे.

पण, मे 2026 मध्ये कॅलिफोर्नियातील एका न्यायालयाने मस्क यांचा हा खटला फेटाळून लावला. त्यांनी खटला दाखल करण्यास खूप उशीर केला होता, असं ज्युरीने म्हटलं.

मस्क यांच्या आवडी-निवडींबद्दल बोलताना पत्रकार ख्रिस स्टोकेल-वॉकर सांगतात की, "उद्या नक्की काय करायचं आहे, याबद्दल त्यांना स्वतःलाच कधी फारशी खात्री असते असं मला वाटत नाही. ते अनेकदा आपल्या मनाच्या आणि अंतःप्रेरणेच्या (इन्सिटिंक्ट) आधारावर निर्णय घेतात."

2015 मध्ये प्रकाशित झालेल्या चरित्रात लेखिका ॲशली वान्स यांनी मस्क यांचं वर्णन अत्यंत अहंकारी आणि "सर्व काही आपल्यालाच माहिती असल्यासारखे वागणारे आणि स्वतःबद्दल मोठा आत्मविश्वास असलेले" असं केलं होतं.

पण, त्यांनी मस्क यांना बेढब नाचणारा आणि सार्वजनिक ठिकाणी बोलताना संकोच करणारा व्यक्ती असंही म्हटलं होतं.

प्रसारमाध्यमांमध्ये मस्क यांना कधी 'वेडा प्रतिभावान' (मॅड जिनियस) तर कधी एक्सवरील सर्वात मोठा ट्रोल असं म्हटलं जातं. मोठी स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा यांच्यासोबतच ते अनेक क्षुल्लक वादांमुळेही चर्चेत राहिले आहेत.

वांशिक भेदभाव, त्यांच्या दाव्यांची विश्वासार्हता आणि इतर काही मुद्द्यांवरून मस्क आणि त्यांच्या कंपन्यांवर नियामक संस्था, गुंतवणूकदार तसेच इतरांकडून कायदेशीर खटलेही दाखल झाले आहेत.

मस्क यांनी आतापर्यंत तीन वेळा घटस्फोट घेतला आहे. विशेष म्हणजे, ब्रिटिश अभिनेत्री तालुलाह रायलीशी त्यांनी दोनदा लग्न केलं आणि दोनदा घटस्फोट घेतला. मस्क स्वतःच्या कमतरतांबद्दलही मोकळेपणाने बोलतात.

2022 मधील टेडवरील मुलाखतीत मस्क म्हणाले होते की, "माझ्या सर्व पापांची यादी केली, तर मी जगातील सर्वात वाईट माणूस वाटेन."

"पण मी केलेल्या चांगल्या कामांचाही विचार केला, तर संपूर्ण चित्र वेगळे वाटेन," असंही मस्क यांनी म्हटलं होतं.

इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती किती आहे?

पण, या सगळ्या वाद-विवाद आणि विरोधाभासांमुळे मस्क यांची संपत्ती वाढण्याचा वेग काही थांबलेला नाही.

अब्जाधीशांच्या संपत्तीचा मागोवा घेणाऱ्या फोर्ब्सच्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2025 मध्ये इलॉन मस्क हे अर्धा ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती ठरले.

मस्क यांची संपत्ती आधीच जगातील अनेक श्रीमंत तंत्रज्ञान (टेक) उद्योजकांपेक्षा जास्त आहे. यात गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन, ओरॅकलचे सहसंस्थापक लॅरी एलिसन, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि फेसबुकचे निर्माते मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे.

परंतु, आता स्पेसएक्स ही कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यामुळे मस्क यांची संपत्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आयपीओ पूर्वीच रॉकेट बनवणाऱ्या या कंपनीने विविध वित्तीय संस्थांकडून 75 अब्ज डॉलर्स निधी उभारला होता.

12 जून रोजी नॅसडॅक शेअर बाजारात स्पेसएक्सचे शेअर्स सूचीबद्ध होण्यापूर्वी मस्क म्हणाले होते की, कंपनीची सुरुवात करताना तिला 'यश मिळण्याची शक्यता 10 टक्क्यांपेक्षाही कमी होती'. पण, ही कंपनी आता 'इतिहासातील सर्वात मोठ्या आयपीओ'पैकी एक होऊन सार्वजनिक होत आहे.

शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर कंपनीच्या शेअरची किंमत 135 डॉलर्सवरून 20 टक्क्यांहून अधिक वाढली.

यामुळे ब्लूमबर्ग आणि फोर्ब्सच्या अंदाजानुसार, इलॉन मस्क यांची संपत्ती 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षाही जास्त झाली आहे.

परंतु, मस्क यांच्या संपत्तीचा मोठा भाग स्पेसएक्सच्या शेअर्समध्ये गुंतलेला असल्याने, कंपनीच्या शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाली तर त्यांचे ट्रिलिनियरचे स्थान बदलू शकते.

टेस्लाकडूनही मस्क हे मोठी कमाई करू शकतात. कंपनीच्या संचालक मंडळाने असा वेतन करार मंजूर केला आहे की, पुढील दशकात ठरवलेली महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे पूर्ण केल्यास त्यांना 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त मूल्याचे वेतन पॅकेज मिळू शकेल.

या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी मस्क यांना टेस्लाचे बाजारमूल्य आठपट वाढवावे लागेल, 10 लाख एआय रोबोट्स विकावे लागतील आणि आणखी 1.2 कोटी टेस्ला कार्सची विक्रीही करावी लागेल.

2024 मध्ये संपूर्ण वर्षभर मस्क टेस्लाकडून मिळणाऱ्या 56 अब्ज डॉलर्सच्या वेतन पॅकेजबाबत कायदेशीर लढाई लढत होते. डिसेंबर 2024 मध्ये डेलावेअरमधील एका न्यायाधीशांनी दुसऱ्यांदा त्यांचा दावा फेटाळला. परंतु, डिसेंबर 2025 मध्ये डेलावेअरच्या सर्वोच्च न्यायालयाने हे वेतन पॅकेज पुन्हा मंजूर केले.

मस्क डिजिटल चलनांचेही समर्थन करतात. ते इतर काही छोट्या कंपन्यांमध्येही सहभागी आहेत, ज्यात बोगदे बनवणाऱ्या 'द बोरिंग कंपनी'चाही समावेश आहे.

मस्क स्वतःला वर्कहोलिक (अतिकामसू) व्यक्ती मानतात आणि ते अभिमानाने तसं सांगतातही. मी केवळ पैसे कमवण्यासाठी व्यवसाय करत नाही, असंही ते अनेकवेळा सांगतात.

मस्क यांचे मित्र आणि टेस्लामधील गुंतवणूकदार रॉस गर्बर म्हणतात की, "इलॉन फक्त तेव्हाच एखाद्या गोष्टीत सहभागी होतात, जेव्हा त्यांना ती समाजासाठी किंवा मानवतेच्या हितासाठी खूप महत्त्वाची वाटते."

इलॉन मस्क यांची राजकीय मतं काय आहेत?

इलॉन मस्क यांनी 2002 मध्ये अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं. त्यांनी बराच काळ आपली राजकीय भूमिका स्पष्टपणे सांगितली नव्हती. ते स्वतःला कधी 'अर्धा डेमोक्रॅट, अर्धा रिपब्लिकन', कधी 'राजकीयदृष्ट्या मध्यममार्गी' तर कधी 'अपक्ष किंवा स्वतंत्र विचारांचा' असे म्हणत आले.

ते म्हणतात की, त्यांनी बराक ओबामा, हिलरी क्लिंटन आणि अनिच्छेने जो बायडन यांना मतदान केलं होतं. हे तिघेही डेमोक्रॅट आहेत.

पण, अलीकडच्या काही वर्षांत त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे.

2024 मध्ये ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नानंतर, मस्क यांनी त्यांना दुसऱ्या कार्यकाळासाठी अधिकृत पाठिंबा दिला. ते ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेतील एक प्रमुख समर्थक आणि प्रभावशाली व्यक्ती बनले.

मस्क यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या काही धोरणांवर टीका केली आहे. विशेषतः अर्थव्यवस्था, स्थलांतर (इमिग्रेशन) आणि शस्त्र नियंत्रण (गन कंट्रोल) या मुद्द्यांवर त्यांचं मत वेगळं आहे. त्यांनी काही धोरणांना 'वोक' असं म्हणून आक्षेपही नोंदवला आहे.

मस्क यांच्या अमेरिका सुपर पीएसीने निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्यांत वाद निर्माण करणारी 10 लाख डॉलर्सची बक्षीस योजना मतदारांसाठी चालवली. त्याचबरोबर ते ट्रम्प यांच्या प्रचार सभांमध्येही सहभागी झाले होते.

निवडून आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मस्क यांची निवड 'डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी'चे (डीओजीई) प्रमुख म्हणून केली. मस्क यांनी स्वतःला 'फर्स्ट बडी' (पहिला मित्र) असंही म्हटलं होतं.

या उपक्रमामुळे सरकारी खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली, आणि त्यामुळे खूप वादही झाले.

परंतु, कर आणि खर्चाच्या एका विधेयकावरून झालेल्या वादानंतर त्यांची मैत्री सार्वजनिकरित्या संपुष्टात आली. अखेरीस त्यांनी स्वतःच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांवर वैयक्तिक स्वरूपाची टीका आणि आरोप करायला सुरुवात केली.

28 मे 2025 रोजी मस्क यांनी व्हाइट हाऊस सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्राध्यक्षांनी त्यांचे संबंध संपल्याचे जाहीर केले.

त्यानंतर दोघांमधील वाद काहीसा निवळल्यासारखा दिसून येतो. कारण चीनच्या एका महत्त्वाच्या दौऱ्यावर ट्रम्प यांच्यासोबत गेलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुखांमध्ये मस्क यांचाही समावेश होता.

अलीकडे मस्क यांनी ब्रिटनमधील राजकीय घडामोडींमध्येही अधिक रस दाखवायला सुरुवात केली आहे.

विशेषतः मस्क यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरून सर किअर स्टार्मर यांच्या लेबर सरकारवर टीका केली आहे. त्यांनी प्रामुख्याने ग्रूमिंग गँग्स आणि स्थलांतर या मुद्द्यांवरील सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मस्क यांनी यूकेतील उजव्या विचारसरणीच्या काही प्रमुख व्यक्तींना पाठिंबा दिला आहे. यात उजव्या विचारांचा कार्यकर्ता आणि गुन्हेगार ठरलेला स्टीफन यॅक्सली-लेनन (टॉमी रॉबिन्सन म्हणूनही ओळखतात) याचाही समावेश आहे.

मस्क यांनी आधी रिफॉर्म यूकेचे नेते नायजेल फाराज यांना पाठिंबा दिला होता. परंतु, 2025 मध्ये त्यांनी आपला पाठिंबा बदलून दुसरे खासदार रूपर्ट लो यांना त्या पक्षाचे नेते म्हणून समर्थन दिले.

2026 मध्ये इंग्लंडमधील स्थानिक निवडणुकांपूर्वी, लो यांनी 'रिस्टोर ब्रिटन' नावाचा नवीन पक्ष तयार केला जो 'रिफॉर्म' पक्षाला टक्कर देणार होता. मस्क यांनी या पक्षाला पाठिंबा दिला आणि एक्सवर लिहिलं की, "हा पक्ष जिंकेल. तो जिंकायलाच हवा. ब्रिटनला वाचवण्यासाठी."

तरीही, मस्क यांच्या ब्रिटनमधील राजकारणावर वारंवार केल्या जाणाऱ्या पोस्ट्सवर सर्व पक्षीय खासदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काही खासदारांनी त्यांच्या हस्तक्षेपाला चुकीच्या माहितीवर आधारित आणि नकोसा हस्तक्षेप असं म्हटलं आहे.

स्टार्मर यांनी मस्क यांच्यावर जूनमध्ये हेन्री नोवाकच्या हत्या प्रकरणावरून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. परंतु, मस्क यांनी एक्सवर पोस्ट करून हे आरोप नाकारले आणि त्यांनी तसेच इतरांनी आंदोलन किंवा दंगली भडकवल्या नाहीत असं स्पष्ट केलं.

स्वतःला 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा निस्सीम पुरस्कर्ता' म्हणणारे मस्क ब्रिटनसह इतर ठिकाणच्या राजकीय मुद्द्यांवर आपली मतं सातत्याने मांडत राहतात.

इलॉन मस्क यांना किती मुलं आहेत?

मस्क यांनी पूर्वी म्हटलं आहे की, ते आपल्या व्यवसायांकडे एक प्रकारची समाजसेवा म्हणूनच पाहतात, कारण ते हवामान बदलासारख्या मोठ्या मानवी समस्यांवर उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.

परंतु, नंतर त्यांनी हवामान बदलाबद्दल आपलं मत थोडंसं बदललं आणि एक्सवर लिहिलं की, "हवामान बदल खरा आहे, पण काही लोक जसं सांगतात तितका तो वेगवान नाही. संथ गतीने घडत आहे."

जरी मस्क यांना एआयमध्ये रस असला तरी, अतिबुद्धिमान एआय भविष्यात मानवासाठी धोका ठरू शकतो, अशी चिंता व्यक्त करणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी ते एक आहेत.

त्यांनी असा दावा केला आहे की, एआयचा वाढता वापर आणि कमी होत जाणारा जन्मदर याच्या एकत्रित परिणामामुळे भविष्यात जगात 'पुरेसे लोक' उरणार नाहीत म्हणजेच लोकसंख्या खूपच कमी होऊ शकते.

मस्क यांना एकूण 14 मुलं आहेत. त्यापैकी 6 मुलं पहिल्या पत्नीपासून, 3 कॅनेडियन गायिका ग्राइम्सपासून, 4 शिवॉन झिलिस यांच्यापासून आणि 1 ॲशली सेंट क्लेअर यांच्यापासून आहेत.

शिवॉन झिलिस यांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर मस्क यांनी एक्सवर लिहिलं होतं की, "मी कमी होत चाललेल्या लोकसंख्येला मदत करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करत आहे."

दरम्यान, ॲशली सेंट क्लेअर यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये मस्क यांच्या मुलाला जन्म दिल्याचे सांगितलं होतं. जानेवारी 2026 मध्ये त्यांनी मस्क यांच्या एक्सएआय कंपनीवर खटला दाखल केला, कारण एक्सवर ग्रोकचा वापर करून त्यांचे लैंगिक स्वरूपाचे 'डीपफेक व्हीडिओ' तयार करण्यात आले होते.

(टॉम एस्पिनर आणि टॉम गेर्केन यांचे अतिरिक्त वार्तांकन)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.