You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ खडसेंचा टोला, मोक्काच्या भीतीने गिरीश महाजनांना कोरोना #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. मोक्काच्या भीतीने गिरीश महाजनांना कोरोना-खडसे
"गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भीतीपोटी त्यांना दुसऱ्यांदा कोरोना लागण झाली असावी," असा टोला पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
"गिरीशभाऊ लवकर बरे व्हावे, त्यांची प्रकृती चांगली राहावी यासाठी प्रार्थना करणार आहे. त्यांची समाजाला, महाराष्ट्राला गरज आहे," असा टोलाही त्यांनी लगावला. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
"एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडले असल्याने त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचारांची गरज आहे. ईडीची नोटीस मिळताच एका महिन्यात चार वेळेला कोरोनाचे खोटे सर्टिफिकेट त्यांनी मिळवले. जावई सहा महिन्यांपासून जेलमध्ये आहे. ते स्वत: जेलच्या उंबरठ्यावर आहेत. गृहमंत्र्यांवर दबाव आणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलात. जनता जाणून आहे", असं गिरीश महाजन म्हणाले होते.
2. निवडणूक होणाऱ्या पाच राज्यात लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधानांचा फोटो नसणार
देशातील 5 राज्यांमध्ये निवडणूका जाहिर झाल्यानंतर त्याठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सावध झालंय.
गेल्या वेळच्या निवडणुकांवेळी कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरुन झालेला गोंधळ टाळण्यासाठी सरकारने आता तात्काळ पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
त्यानुसार निवडणूक होत असलेल्या 5 राज्यांमधील कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटवला जाणार आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
गेल्या वर्षी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी याठिकाणी निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधानांचा फोटो हा आदर्श आचारसंहितेचा भंग करणारा आहे असा दावा केला होता.
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ऑब्रिएन यांनीही पंतप्रधान मोदी लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटो हा सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग असल्याची तक्रार केली होती. त्यांनी एक पत्र लिहून निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती.
त्यानंतर नंतर केंद्रीय निवडणुक आयोगाने या संपुर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून निवडणूक नियमावलीचे पालन करणे अपेक्षित असल्याचे म्हटले होते.
आयोगाने आरोग्य मंत्रालयाला सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची जाहिरात करणे हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे असे सांगितले होते. त्यानंतर या 5 ठिकाणीही लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटो हटवण्यात आला होता.
3. भाजपच्या पाठिंब्यामुळे निवडून आलो, शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट
तालुक्यात सेनेला फक्त 1100 मतं होती, भाजपच्याच पाठिंब्यावर निवडून आलो', असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या आमदाराने केला आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
सांगोला तालुक्यात शिवसेनेला फक्त 1100 मते मिळाली होती, पण भाजपच्या पाठिंब्यावर मी निवडून आलो, आमदार झालो. खासदार रणजीत निंबाळकर यांच्यामुळेच मला आमदारकी मिळाली. भाजपचे माझ्यावर चांगले लक्ष होते. कुठे काही कमी पडते का, याबद्दल विचारणा करण्यासाठी त्यांचा फोन येत होता.
माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला साध विचारलं देखील जात नाही. घर की कोंबडी दाल बराबर असं झालंय.
राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अनेक इच्छुकांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार पाटील यांनी देखील आपल्याला मंत्रीपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त केली.
पंढरपूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली.
4. उत्तर प्रदेशात 80 विरुद्ध 20 अशी लढत, योगींच्या वक्तव्यामुळे वाद
"उत्तर प्रदेशची निवडणूक म्हणजे 80 टक्के विरुद्ध 20 टक्के अशी लढत असेल," हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
आमचा पक्ष राष्ट्रवाद, सुशासन आणि विकास या मुद्द्यांवर निवडणूक लढवेल. 80 टक्के समर्थक एका बाजूला असतील, तर विरुद्ध बाजूला 20 टक्के असतील.
80 टक्के जनता सकारात्मक उर्जेसह आगेकूच करेल, तर नेहमीच प्रतिकूल राहणारे 20 टक्के आणखी विरोध करतील. भाजप मात्र सबका साथ-सबका विकास ही मोहीम पुढे नेण्यासाठी आणखी कार्य करेल आणि जिंकेल.
गैरसमजाला बळी पडलेले काही जण लोकसंख्येच्या संदर्भात आपले अस्तित्व लादण्याच्या प्रयत्नात असल्याचे मी ठामपणे सांगू शकतो, असेही विधान त्यांनी केले. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी टक्केवारीबाबत अधिक भाष्य न केल्यामुळे तर्ककुतर्क लढविले जात आहेत. राज्यातील मुस्लिमांची टक्केवारी 20 इतकी आहे.
त्यावरून विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली. त्यामुळे वाद निर्माण झाला. 80 विरुद्ध 20 टक्क्यांच्या विधानामागे निवडणुकीला जातीय रंग देण्याचा डाव आहे, पण जनता त्याकडे दुर्लक्ष करेल. ॉ
"खरे तर भाजपच्या वाट्याला येणाऱ्या मतांचा उल्लेख योगींनी केला आहे, जो 20 टक्के इतका आहे. हिंदू विरुद्ध मुस्लीम असा मुद्दा निर्माण होणार नाही. लोकशाही वाचविण्यासाठी लोक मतदान करतील," असं मत समाजवादी पार्टीचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी मांडलंय.
5. शिवसेनेत तरुणांनाच तिकीट मिळणार?
विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले 2-3 दिवस बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेनेत जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पन्नाशी ओलांडलेल्या उमेदवारांना तिकीट मिळणार का? यासंदर्भात चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेत जुने आणि नवे शिवसैनिक यांच्यात मध्यंतरी काही वाद समोर आले होते.
यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे सक्रिय असतील की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना महापालिका निवडणूक लढवणार का हे काही दिवसातच स्पष्ट होईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)