You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदींचा ताफा जिथे थांबला होता, तिथल्या गावकऱ्यांनी काय पाहिलं?
- Author, सुरिंदर मान
- Role, बीबीसी पंजाबी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
पंजाबमधल्या फिरोजपूर जिल्ह्यातलं प्यारेना गावात शुकशुकाट आहे. मी या गावी पोहोचलो तेव्हा गावकरी आपापसात कुजुबजत होते. मोकळेपणाने बोलायला कोणी तयार नव्हतं.
गावाबाहेर भेटलेल्या एका माणसाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याबाबत विचारलं. तो म्हणाला, "मला माहितेय पण काही बोलणार नाही," असं सांगितलं.
5 जानेवारी रोजी घडलेल्या प्रकारानंतर लोकांना या गावाविषयी कळलं. पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा या गावातूनच परतला होता.
5 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पीजीआय सॅटेलाईट सेंटरच्या भूमीपूजनाकरता फिरोजपूर इथे जात होते. लुधियाना-फिरोजपूर नॅशनल हायवेवर प्यारेना गावाच्या इथून पंतप्रधानांच्या ताफ्याला परतावं लागलं.
प्यारेना गाव फ्लायओव्हरपासून 13 किलोमीटर दूर आहे. पंतप्रधानांची रॅली जिथे होणार होती त्या ठिकाणापासून प्यारेना गाव 8 किलोमीटर अंतरावर आहे.
गावकऱ्यांमध्ये भीती
प्रसारमाध्यमांच्या बरोबरीने पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय तपास यंत्रणा आणि पंजाब सरकारतर्फे चौकशी सुरू आहे. पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा प्यारेना गावातून परतला तेव्हा शेंगा विकणाऱ्या माणसाने ते सगळं पाहिलं.
अब्दुल हनान कामाच्या शोधात दहा वर्षांपूर्वी बिहारहून पंजाबला आले. हल्ली ते भुईमुगाच्या शेंगा विकतात. त्यादिवशी फ्लायओव्हरहून सशस्त्र पोलीस आणि वाहनांचा ताफा जाताना त्याने पाहिला.
"ते सगळं पाहून मी चक्रावून गेलो. पण त्या सगळ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही आहेत हे मला ठाऊक नव्हतं.
पंतप्रधान काय बोलतात हे ऐकण्यासाठी फिरोजपूरला जायची तयारी करत होतो. पोलिसांनी नॅशनल हायवेवरील सगळी दुकानं सुरक्षेच्या कारणास्तव बंद केली होती. मला त्यादिवशी शेंगा विकता येणार नव्हत्या. पंतप्रधान फिरोजपूरहून परत जातील तेव्हा दुकानं उघडण्याची परवानगी मिळेल आणि थोडे पैसे मिळतील अशी आशा होती".
"सुरुवातीला सगळं नेहमीसारखं वाटत होतं. पण कॅमेरामन आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा मला भीती वाटू लागली. त्या ताफ्यात पंतप्रधानांची गाडी होती हे कळलं", असं त्याने सांगितलं.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्याने काय सांगितलं?
यानंतर प्यारेना मध्ये त्यादिवशी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एकाशी झाली. पंतप्रधानांना परतावं लागल्यानंतर पोलीस अटक करतील अशी आंदोलनात सहभागी झालेल्या बलदेवसिंह यांनी भीती वाटते आहे.
बलदेव यांनी सांगितलं, "माझ्या नेतृत्वात दीडशे शेतकरी फिरोजपूरला जात होते. पंतप्रधानांच्या धोरणाविरुद्ध डेप्युटी कलेक्टरांच्या कार्यालयासमोर आम्हाला आंदोलन करायचं होतं".
"आम्ही सगळे प्यारेना गावाशी पोहोचलो तेव्हा नॅशनल हायवेवर पोलिसांनी आम्हाला अडवलं. इथून भाजप कार्यकर्त्यांची बस निघेल असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं. आम्ही त्याला राजी झालो. भाजप कार्यकर्त्यांनी हिंसक मार्ग अवलंबला तेव्हा आता रस्ता खुला होणार नाही", असं आम्ही पोलिसांना सांगितलं.
"पंतप्रधान प्यारेना इथल्या फ्लायओव्हरवरून परत गेले हे आम्हाला ठाऊक नव्हतं. पंतप्रधान मिसरी गावाजवळच्या फ्लायओव्हरशी पोहोचले असतील तेव्हा या रस्त्यावर शेतकरी आंदोलन करत असल्याचं त्यांना समजलं असेल", असं बलदेव यांनी सांगितलं.
अचानक घडलेली घटना- महिला शेतकरी नेत्या
जिल्हा मुख्यालयाच्या इथे आंदोलन करायचं असं आवाहन शेतकऱ्यांना आधीच करण्यात आलं होतं, असं महिला शेतकरी नेत्या सुखविंदर कौर यांनी सांगितलं.
"ही अचानक घडलेली घटना आहे आणि तिला राजकीय रंग देण्यात येऊ नये. लखीमपूर खिरीप्रकरणी दोन शेतकऱ्यांना करण्यात आलेली अटक, दिल्लीत शेतकरी आंदोलन संपताना सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणं यासाठी आंदोलन करण्यात येणार होतं", असं त्या म्हणाल्या.
बरनाला इथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता असं सुखविंदर यांनी सांगितलं. फिरोजपूर इथे आंदोलनासाठी शेतकरी जमले होते. पोलिसांना वाटलं की हे सगळे रॅलीच्या दिशेने जातील.
रस्ता खुला करण्यासाठी पोलीस आले होते
प्यारेना गावाजवळच्या फ्लायओव्हरवर भारतीय किसायन युनियन क्रांतिकारीचे शेतकरी आंदोलन करत होते. या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरजीत सिंह फूल यांनी फोनवर सांगितलं की त्यांच्या संघटनेशी माणसं फ्लायओव्हरवर आंदोलन करत होती.
आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणाहून पंतप्रधानांचा गाड्यांचा ताफा जाणार आहे याची माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
"पंतप्रधानांचा ताफा परतण्याच्या काही मिनिटं आधी पोलीस आंदोलन सुरू होतं तिथे पोहोचले. रस्ता मोकळा करा, पंतप्रधानांना इथून जायचं आहे असं पोलिसांनी सांगितलं.
पण आमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचं म्हणणं गांभीर्याने घेतलं नाही कारण कोणत्याही रस्त्यावर व्हीव्हीआयपी मूव्हमेंट असेल तर अनेक तास आधी रस्ता मोकळा केला जातो. पंतप्रधान येत असताना असं का झालं नाही आम्हाला माहिती नाही".
पंजाबमधील शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते मोदी सरकारद्वारे प्रणित कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत होते. राजधानी दिलेल्च्या सीमेवर वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेल्या आंदोलनामुळेच मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याचं आवाहन या शेतकरी संघटनांना करण्यात आलं होतं. संयुक्त मोर्चात सहभागी 32 शेतकरी संघटना या आंदोलनात नव्हत्या.
भारतीय किसान युनियन उग्रहां, भारतीय किसायन युनियन सिद्धूपूर, भारतीय किसान युनियन क्रांतिकारी, किसान मजदूर संघर्ष समिती, भारतीय किसान युनियन दाकोंडा आणि कीर्ती किसान युनियन यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यात विरोध केला होता.
आमचं आंदोलन पंतप्रधानांविरोधात नव्हतं- सूरजित सिंह फूल
शेतकरी आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परतावं लागलं असं पंजाब सरकार आणि केंद्र सरकार म्हणत आहे. पण हे खरं नाही असं भारतीय किसान युनियन क्रांतिकारीचे अध्यक्ष सुरजीत सिंह फूल यांनी सांगितलं.
"पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही चूक झालेली नाही. पंतप्रधानांच्या विरोधात आम्ही कोणतंही आंदोलन केलं नाही. आम्ही कोणावरही हल्ला केला नाही. यामुळे जे आहे ते स्पष्ट आहे", असं सुरजीत सिंह फूल म्हणाले.
"फक्त भारतीय किसान युनियन क्रांतिकारी संघटनेचे सदस्य आंदोलन करत होते असं नाही. योगायोगाने असं घडलं की पंतप्रधानांचा ताफा आम्ही जिथे आंदोलन करत होतो तिथे आला. बाकी संघटना अन्य ठिकाणी आंदोलन करत होत्या.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले मात्र या कायद्यांविरोधात जे आंदोलन चाललं त्यादरम्यान 700हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. लखीमपूर खिरी घटना ज्यांच्यामुळे घडली ते अजय मिश्र टेणी आजही मोदी सरकारमध्ये आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध चुकीचा नाही".
पोलीस सूत्रांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा फरीदकोटहून फिरोजपूरला बारस्ता तलवंडीमार्गे जाणार होता. तलवंडी भाई चौकात पोहोचण्याआधी जवळच्या मिसरी गावी पोहोचला. तिथे त्यांना रस्ता बंद असल्याचं कळलं. यासंदर्भात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला मात्र कोणीही काहीही सांगण्यास नकार दिला.
फिरोजपूरच्या रॅलीत अपेक्षित गर्दी न आल्याने कार्यक्रमात अचानक बदल करण्यात आला, असं पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितलं.
"पंजाब सरकार पंतप्रधानांना आवश्यक सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरलं. सीमेनजीकच्या भागात पंतप्रधानांना सुरक्षा देता येत नसेल तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. कार्यकर्त्यांच्या बसेसना विविध ठिकाणी रोखण्यात आलं. पंतप्रधानांची रॅली यशस्वी होऊ नये यासाठी हे करण्यात आलं", असं पंजाब भाजपचे अध्यक्ष अश्विनी शर्मा यांनी सांगितलं.
अमृतसर-तरन बायपास, काथू नांगल, हरिके पाटन, श्री मुक्तसर साहिब, माखू अशा विविध ठिकाणी मिळून भाजपच्या 3443 बसेस रोखण्यात आल्या असा दावा पंजाब भाजपने केला आहे.
पंतप्रधान रॅलीसाठी आले नाहीत याचं कारण खराब हवामान आणि जोरदार पाऊस हे होतं असं वृत्तांकनासाठी आलेल्या एका पत्रकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
प्यारेना गावातील आंदोलनाबाबत किसान बलदेव सिंह सांगतात की, "भाजपच्या बस रोखल्याने लोक आले नाहीत असं नाही. लोक स्वत:हूनच रॅलीसाठी आले नाहीत".
पंतप्रधानांचा ताफा जिथून गेला तिथे जवळच राताखेरा नावाचं गाव आहे.
"जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही व्यवस्थेच्या देशाचा प्रमुख छोट्या आंदोलनापायी परत गेला ही मोठी गोष्ट आहे," असं राताखेरा गावचे सरपंच राजदीप सिंह यांनी सांगितलं.
"पंतप्रधान आमच्या भागाकरता मोठी घोषणा करतील अशी अपेक्षा होती. पण शेतकरी आंदोलन एक वर्ष चाललं. त्यामध्ये आम्ही काय कमावलं, काय गमावलं असाही प्रश्न डोक्यात आला.
जे झालं ते व्हायला नको होतं. पण तसं झालं आहे. पंतप्रधान मोठे की लोकशाही व्यवस्था मोठी असा प्रश्न उरतो".
तांत्रिक अडचण
"पंतप्रधानांचा कार्यक्रम ठरला होता मग संबंधित रस्ते आधीच मोकळे का करण्यात आले नाहीत? हा माझा प्रश्न आहे आणि नंतरही असेल", असं महिला शेतकरी सुखविंदर कौर यांनी विचारला. "हे सगळं तांत्रिक होतं. पंतप्रधानांच्या सुरक्षेशी त्याचा संबंध जोडणं चुकीचं आहे. शांततामय पंजाबमध्ये असं होत असेल तर पंतप्रधानांनी त्याची कारणं समजून घ्यावीत".
"हा भाग सीमेनजीक आहे हे खरं आहे पण म्हणून त्याचा संबंध पंतप्रधानांच्या सुरक्षेशी जोडला जाऊ नये. पंजाबमध्ये शांततेचं वातावरण आहे. आम्ही सगळे एकत्र येऊन आमच्या अधिकारांसाठी लढत आहोत. अशावेळी अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा भाजपला सुचू शकतो. देशातला सर्वसामान्य माणूस असा विचार करत नाही", असं सुखविंदर म्हणाल्या.
पंतप्रधानांच्या फिरोजपूर दौऱ्यात सुरक्षेत झालेल्या चुकीसंदर्भात अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण या संवेदनशील विषयावर जवळपास प्रत्येकाने एकच उत्तर दिलं. सगळं काही ठीक आहे, तपास सुरू आहे आणि सगळं काही सुरळीत होईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)