गेट्स ऑफ हेल : 'हा' देश बंद करत आहे 'नरकाचं द्वार'

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतींनी देशात असलेलं 'नरकाचं द्वार' म्हणजे 'गेटवे टू हेल' बुजवण्याचा आदेश दिला आहे.

तुर्कमेनिस्तानच्या उत्तरेला एक मोठा खड्डा आहे, त्याला 'गेट्स ऑफ हेल' म्हणजे 'नरकाचं द्वार' म्हटलं जातं.

तुर्कमेनिस्तानच्या 70% भागामध्ये काराकुम वाळवंट आहे. 3.5 लाख चौरस किलोमीटरच्या या वाळवंटाच्या उत्तरेकडे गेट क्रेटर नावाचा मोठा खड्डा आहे.

69 मीटर रुंद आणि 30 मीटर खोल असलेल्या या खड्ड्यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून आगीच्या ज्वाळा भडकलेल्या आहेत. मात्र त्याचं कारण एखादा राक्षस नसून यामधून निघणारा नैसर्गिक वायू (मिथेन) हे आहे.

राष्ट्रपती गुरबांगुली बर्डीमुखामेदोव्ह यांना याकडे निसर्ग आणि आरोग्याशी संबंधित कारणांचा विचार करण्याबरोबरच वायूच्या निर्यातीत वाढ करण्याच्या प्रत्नाच्या रुपात पाहिलं जावं असं वाटत आहे.

"आपण महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती गमावत चाललो आहोत. त्यातून आपल्याला मोठा फायदा मिळणं शक्य होतं. आपण याचा वापर लोकांचं जीवन अधिकाधिक चांगलं बनावं यासाठी करू शकत होतो," असं टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आलेल्या एका संदेशामध्ये राष्ट्रपती गुरबांगुली यांनी म्हटलं.

ही आग विझवण्याचा काहीतरी मार्ग शोधा, असा आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

मात्र, तुर्कमेनिस्तान 'गेटवे टू हेल' मध्ये लागलेली ही आग विझवण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच करत आहे असं नाही. यापूर्वी 2010 मध्येही राष्ट्रपतींनी तज्ज्ञांना ही आग विझवण्याचे मार्ग शोधण्यास सांगितलं होतं.

केव्हा तयार झाला हा खड्डा?

अनेक लोकांना असं वाटतं की, 1971 मध्ये सोव्हिएत संघाचे खगोल शास्त्रज्ञ काराकुमच्या वाळवंटात कच्च्या तेलाच्या साठ्याचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना याठिकाणी नैसर्गिक गॅसचा साठा मिळाला. पण अभ्यासादरम्यान त्याठिकाणची जमीन खचली आणि त्याठिकाणी तीन मोठे-मोठे खड्डे तयार करण्यात आले होते.

या खड्ड्यांमधून मिथेन वायूची गळती होऊन तो पर्यावरणात पसरण्याचा धोका होता. त्यामुळं ते रोखण्यासाठी अभ्यासकांनी त्यापैकी एका खड्ड्यात आग लावली, असं सांगितलं जातं. काही आठवड्यांमध्ये मिथेन वायू संपून जाईल आणि आग आपोआप विझेल असं त्यांना वाटलं होतं.

मात्र कॅनडाचे प्रवासी जॉर्ज कोरोनिस यांच्या मते, याला खरं मानायचं झाल्यास त्याबाबतचे काहीही पुरावे मिळाले नाहीत.

2013 मध्ये नॅशनल जियोग्राफिक चॅनलसाठी तयार करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान एक शोधपथक तुर्कमेनिस्तानच्या या परिसरात पोहोचलं होतं. जॉर्ज कोरोनिस याच पथकाचे सदस्य होते. या खड्ड्यात सातत्यानं सुरू असलेली आग नेमकी कधी सुरू झाली हे शोधण्याचा प्रयत्न ते करत होते.

पण त्यांच्या शोधानं त्यांच्या प्रश्नांची पूर्ण उत्तरं देण्याऐवजी आणखी काही प्रश्न उपस्थित केले.

तुर्कमेनिस्तानच्या खगोल शास्त्रज्ञांच्या मते हा मोठा खड्डा खरं तर 1960 च्या दशकात तयार झाला होता. पण 1980 च्या दशकातच यात आग लागली होती.

गोपनीयता

इतिहासकार जेरोनिम पेरोविक म्हणतात की, 'नरकाचं द्वार' याबाबत जे गूढ आहे ते अत्यंत तर्क असलेलं आहे.

"सोव्हिएत संघाच्या काळात काम कशाप्रकारे होत होतं, याकडे इशारा करणारं हे आहे. त्यावेळी केवळ यशस्वी ठरलेल्या मोहिमांचीच माहिती उघड केली जात होती. अपयश आलेल्या मोहिमांबाबत माहिती दिली जात नव्हती. जर स्थानिकांनी काही चुकीचं केलं असेल, तर इतरांना याबाबत समजावं असं त्यांना वाटणार नाही," असं जेरोनिम यांनी बीबीसीला म्हटलं होतं.

आगीचा हा खड्डा वाळवंटाच्या मध्यभागी होता, त्यामुळं यापासून कोणत्याही प्रकारच्या हानीची शक्यता नव्हती, तसंच त्याचा परिणामही फार मोठा नव्हता.

तज्ज्ञांच्या मते, त्या काळात सोव्हिएत संघाच्या जवळ नैसर्गिक गॅस किंवा इंधनाची कमतरता नव्हती. ते दरवर्षी सात लाख क्युबिक मीटर नैसर्गिक गॅसचं उत्पादन करत होते. त्यामुळं हा गॅस जाळणं हाच त्यांच्यासमोरचा व्यवहार्य पर्याय असेल.

"स्वित्झर्लंड सारखा देश दरवर्षी 15 ते 16 हजार क्युबिक मीटर नैसर्गिक गॅसचा वापर करत होता. पण त्याच्या चारपट जाळून नष्ट करणं ही सोव्हिएतसाठी फार मोठी बाब नव्हती. त्यामुळं हा गॅस पाईपलाईनद्वारे इतर ठिकाणी न्यावा असा विचार करण्याऐवजी त्यांनी तो जाळण्याचा निर्णय घेतला असेल. कारण हा गॅस इतर ठिकाणी नेण्यासाठी त्यांना याठिकाणी मोठं काम करावं लागलं असतं," असं तज्ज्ञ सांगतात.

मिथेनला पर्यावरणात मिसळू देण्याचा विचार चुकीचा ठरला असता, त्यामुळं तो जाळण्याचा निर्णय समजू शकतो, असं कोरोनिस यांच्या शोध पथकात समावेश असलेले मायक्रोबायोलॉजिस्ट स्टीफन ग्रीन म्हणाले.

"हे अत्यंत धोकादायक ठरू शकलं असतं. कारण जोपर्यंत आग पेटलेली राहील, तोपर्यंत मिथेन एकाठिकाणी जमा होणार नाही. नसता त्यात वारंवार मोठा स्फोट होण्याचा धोका राहिला असता."

पर्यावरणात कार्बन डायऑक्साईड सोडणं धोकादायक आहे हे खरं आहे, मात्र पर्यावरणात मिथेन सोडणं हे त्याहीपेक्षा अधिक धोकादायक आहे. इराक, ईराण आणि अमेरिकेसारखे अनेक देशही हा वायू जाळण्याचा निर्णय घेतात.

दुर्दैवानं ही एक अशी समस्या आहे, ज्यावर अद्याप काहीही पर्याय सापडलेला नाही, असं जेरोनिम पेरोविक म्हणतात.

अनेक लोक आग पाहायला जातात

हे क्रेटर तुर्कमेनिस्तानच्या सर्वात लोकप्रिय अशा पर्यटन स्थळांपैकी एक आहे. 2018 मध्ये याचं नाव बदलून 'शायनिंग ऑफ काराकोम' असं अधिकृत नाव याला देण्यात आलं होतं.

दरवर्षी सुमारे सहा हजार पर्यटक येणाऱ्या या देशासाठी मिथेन उत्सर्जन होणारा हा खड्डा देशातील सर्वात मोठ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

काराकुम वाळवंटात हा खड्डा रात्रीही अगदी दूरुन दिसतो, आणि पर्यटक ते पाहण्यासाठी जात असतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)